शुक्रवार, 5 जुलै 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 ऑगस्ट 2023 (15:08 IST)

6 वर्षाच्या मुलाने शिक्षिकेला गोळी घातली, आईला होऊ शकतो 25 वर्षांचा तुरुंगवास

‘मला वाटलं, मी मरणार,’ हे शब्द आहेत एका 25 वर्षीय शिक्षिकेचे जिला तिच्याच विद्यार्थ्याने शाळेत गोळी घातली.
अमेरिकेत विद्यार्थ्यांनी शाळेत बंदूक आणून हल्ले करण्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत, पण ही घटना जास्त धक्कादायक ठरली कारण शिक्षिकेला गोळी घालणाऱ्या विद्यार्थ्याचं वय होतं फक्त 6 वर्षं.
 
अमेरिकेतल्या व्हर्जिनिया राज्यातल्या रिचनिक प्राथमिक शाळेत या वर्षी मार्चमध्ये ही घटना घडली.
 
नक्की काय घडलं?
अॅबिगेल झ्वेर्नर या शिक्षिकेला तो दिवस स्पष्ट आठवतो. एनबीसी या अमेरिकन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणतात, “तसा तो नेहमीसारखाच दिवस होता. मी शाळेत गेले पण तिथे गेल्यावर जे कानावर पडलं ते ऐकून मला भीती वाटायला लागली. एक मुलगा शाळेत बंदूक घेऊन आला आहे अशी कुजबूज होत होती.”
 
आपल्या वर्गात गेल्यानंतर आपल्यावर रोखलेली बंदून झ्वेर्नर यांना स्पष्ट आठवते. “मला त्या मुलाच्या चेहऱ्यावरचे भाव स्पष्ट आठवतात. तो अत्यंत भीतीदायक दिवस होता.”
 
“त्याने झाडलेली गोळी माझ्या हाताच्या पंज्यातून आरपार गेली आणि माझ्या छातीला लागली. आजही माझ्या छातीवर त्याचे व्रण आहेत आणि त्या बंदुकीच्या गोळीचे काही सुक्ष्म अवशेष माझ्या छातीत आहेत,” त्या पुढे म्हणतात.
 
“तो माझ्या टेबलासमोर उभा राहिला, त्याने खिशातून बंदूक काढली आणि गोळी झाडली,” त्यांनी कोर्टात सांगितलं.
एमी कोव्हाक याच शाळेत वाचन विषय शिकवतात. त्यांनी गोळी झाडल्याचा आवाज ऐकला. त्या झ्वेर्नर यांच्या वर्गात धावत गेल्या आणि त्यांनी त्या मुलाला पकडलं आणि बाजूला केलं.
 
असं करत असताना त्याने आपण गोळी झाडल्याची कबुली दिली आणि झ्वेर्नर यांना शिवीही दिली अशी माहिती एमी यांनी कोर्टात दिली.
 
वॉशिंटन पोस्ट या अमेरिकन वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत एमी म्हणतात, “मी वर्गात गेले तेव्हा तो मुलगा हाताची घडी करून उभा होता आणि त्याच्या बाजूला बंदूक पडली होती.”
 
एमी म्हणाल्या की मी मग त्याला हाताला धरून वर्गाच्या बाहेर नेलं आणि अत्यावश्यक सेवांना फोन केला.
 
यावेळी तो मुलगा कथितरित्या एमी यांना म्हणाला, “मी आईची बंदूक घेतली रात्री पण मला त्यात एकच गोळी भरण्याचा वेळ मिळाला.”
 
हा मुलगा बालवाडीत असतानाही असा प्रकार घडला असल्याचं कोर्टात म्हटलं गेलं.
 
एका निवृत्त शिक्षिकेने सांगितलं की तो बालवाडीत असताना त्यांच्या वर्गात होता आणि त्याने त्या शिक्षिकेचा गळा दाबला की त्यांना श्वासही घेता येईना.
 
हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी झ्वेर्नर यांना सांगितलं की या गोळीने त्यांचा जीवही जाऊ शकत होता. पण बंदुकीची गोळी आधी त्यांच्या हाताच्या पंजातून आरपार गेली त्यामुळे गोळीचा वेग कमी होऊन ती छातीत लागली त्यामुळे त्यांचा जीव वाचला.
 
गोळी लागलेल्या अवस्थेतही झ्वेर्नर यांनी आपल्या वर्गातल्या इतर लहान मुलांना बाहेर काढलं, कारण त्यांना त्या मुलांच्या सुरक्षिततेची चिंता होती. यानंतर त्या अँब्युलन्समध्ये बसून दवाखान्यात गेल्या.
 
पोलिसांनी या सहा वर्षांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला नाही. सरकारी वकिलांचं म्हणणं होतं की, “कायद्याची प्रक्रिया समजेल, किंवा नक्की काय घडतंय हे समजेल एवढंही या लहान मुलाचं वय नाहीये.”
 
त्याच्या घरच्यांचं म्हणणं होतं की हा मुलगा ‘स्पेशल चाईल्ड’ म्हणजेच गतिमंद आहे आणि शाळेत कधीही एकटा यायचा नाही. त्याच्या पालकांपैकी कोणी ना कोणी त्याच्यासोबत असायचं. पण ज्या दिवशी त्या मुलाने शिक्षिकेवर गोळीबार केला त्यादिवशी तो शाळेत एकटा आला होता.
 
त्याने ज्या बंदुकीने गोळीबार केला त्याचं लायसन्स त्याच्या आईकडे होतं, आणि ती कायदेशीररित्या विकत घेतली होती.
 
रिचनिक शाळेतल्या शाळा निरीक्षकांना आता नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे तर उपमुख्याध्यापकांनी राजीनामा दिला आहे. शाळेत आता मोठेमोठे मेटल डिटेक्टर्स बसवण्यात आले आहेत तसंच सुरक्षारक्षकही नेमण्यात आले आहेत.
 
अॅबिगेल झ्वेर्नर यांच्या वकील डायान टोस्कानो यांनी आता शाळा आणि जिल्हा प्रशासनावर नुकसानभरपाईची मागणी करत खटला भरला आहे.
 
त्याचं म्हणणं आहे की हा हल्ला रोखता आला असता.
 
वकिलांनी कोर्टात काय म्हटलं?
झ्वेर्नर यांच्या वकील टोस्कानो यांनी कोर्टात सादर केलेल्या निवेदनात खालील मुद्दे मांडले आहेत.
 
घटना घडली त्या दिवशी 12.30 वाजता एका शिक्षकाने म्हटलं की या मुलाच्या स्कूलबॅगची झडती घेतली गेली. त्यांना संशय होता की या मुलाने कदाचित त्याच्या बॅगेत बंदूक आणली असावी. त्यांना बंदूक आढळून आली नाही पण त्यांनी शाळाधिकाऱ्याला सांगितलं की त्या मुलाने कदाचित बंदूक खिशात ठेवली असावी आणि ते शिक्षक बाहेर गेले.

त्या शाळाधिकाऱ्यांनी कथितरित्या म्हटलं की, “त्याचे खिसे छोटे आहेत.”
दुपारी 1.30 वाजता आणखी एका शिक्षकाने शालेय अधिकाऱ्यांना सांगितलं की एका मुलाने शाळेत बंदूक आणली आहे आणि जर त्या शिक्षकाने कोणाला सांगितलं तर गोळी मारेन अशी धमकीही दिली आहे.
शाळेतल्या एका तिसऱ्या कर्मचाऱ्याला त्या मुलाची बॅग तपासण्यास सांगितलं गेलं, पण परत थांबायला सांगितलं कारण शाळा सुटत आली होती.

दुपारी 2 वाजेच्या सुमारास तास चालू असताना या मुलाने झ्वेर्नर यांच्यावर बंदूक रोखली आणि गोळी चालवली.
झ्वेर्नर यांनी आता शाळा आणि जिल्हा प्रशासनाविरोधात 4 कोटी डॉलर्सच्या नुकसानभरपाईचा खटला भरला आहे.
 
कोर्टाच्या कागदपत्रांवरून असंही दिसतं की या मुलाने ‘मी तिला मारून टाकेन’ अशी बढाई शाळेत मारली होती.
 
गोळी झाडल्यानंतर जेव्हा पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलं तेव्हाही तो म्हणाला की, “मीच गोळी मारलीये, मी आईची बंदूक काल रात्री घेऊन ठेवली होती.”
 
या मुलाच्या आईवर, डेजा टेलर यांच्यावर मात्र गुन्हा दाखल झाला आहे. लहान मुलाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी, तसंच लहान मुलाचा जीव धोक्यात येईल अशा निष्काळजीपणाने बंदूक घरात ठेवल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
 
बंदूक विकत घेताना खोटं बोलल्याप्रकरणीही, तसंच ड्रग्स बाळगल्याप्रकरणी मुलाच्या आईवर गुन्हा दाखल झाला आहे.
 
डेजा टेलर यांना या सर्व गुन्ह्यांप्रकरणी 25 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
 



Published By- Priya Dixit