रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 27 मार्च 2024 (11:04 IST)

अमेरिकेत 900 फूट लांब जहाजाच्या धडकेने पूल कोसळला, आतापर्यंत काय घडलं?

अमेरिकेतील बाल्टिमोर येथील पॅटापस्को नदीवरील पूल एक जहाज येऊन धडकल्याने कोसळला आहे. पूल कोसळल्याने काही लोक आणि अनेक वाहनं नदीत पडली आहेत.पूल पूर्णपणे पाण्यात कोसळला असून त्याचे अनेक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.ज्या जहाजाची टक्कर झाली त्यावर सिंगापूरचा ध्वज फडकवत असल्याचं समोर आलंय.हे 300 मीटर लांब (अंदाजे - 900 फूट) जहाज कोलंबो, श्रीलंकेच्या दिशेने जात होतं. या जहाजावर खलाशांसह सर्व कर्मचारी भारतीय होते.
 
'जहाजावरील कर्मचारी सुखरूप'
सिनर्जी मरीन ग्रुपच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाल्टिमोरमध्ये जहाजाने धडक दिलेल्या अपघातात जहाज कर्मचाऱ्यांपैकी एकाला किरकोळ जखम झाली आहे.
उपचार घेतल्यानंतर त्याची प्रकृती ठीक आहे. या अपघाताबाबत फेडरल अधिकार्‍यांनी जहाज कर्मचाऱ्यांची चौकशी केली.
 
22 सदस्यांपैकी 16 जणांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क झाला आहे.
उर्वरित सदस्यांच्या कुटुंबांना या अपघाताची माहिती देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या तपास सुरू असल्यामुळे जहाज कर्मचाऱ्यांशी बोलणं शक्य झालं नाही.
पण पुलावर काम करणाऱ्या बांधकाम कर्मचाऱ्यांपैकी सहाजण बेपत्ता आहेत. त्यांना शोधण्यासाठी मोठ्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
 
मेरीलँडमध्ये आणीबाणीची स्थिती
मात्र ही स्पष्टपणे मोठी घटना आहे. आपत्कालीन सेवाही बचावकार्यासाठी दाखल झाल्या असल्याचं बीबीसी अमेरिकन सर्व्हिसने म्हटलंय.स्थानिक वेळेनुसार पहाटे दीडच्या सुमारास एक मोठं कंटेनर जहाज पुलावर आदळलं. पुढे जे घडलं ते व्हीडिओ फुटेज मध्ये दिसत आहे. बऱ्याचदा कंटेनर जहाजांवर वेगवेगळ्या देशांचे ध्वज असतात याचा अर्थ ते अमुक एका देशाचे आहे असं म्हणता येत नाही.फ्रान्सिस स्कॉट की ब्रिज कोसळल्यानंतर गव्हर्नर वेस मूर यांनी मेरीलँड राज्यात आणीबाणीची स्थिती जाहीर केली आहे.ते म्हणाले की, "आम्ही बायडन प्रशासनाकडून त्वरीत सेवा मिळवण्यासाठी इंटरएजन्सी टीमसह काम करत आहोत."पीडितांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व पुरुष आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही प्रार्थना करत असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, ते केंद्र, राज्य आणि स्थानिक संस्थांच्या बचाव पथकांच्या संपर्कात आहेत.
 
 
अपघात कसा घडला?
पुलावर आदळलेलं जहाज चालवणाऱ्या सिनर्जी मरीन ग्रुपचे कम्युनिकेशन्स ऑफिसर पॉल ॲडमसन म्हणाले, "सर्व कर्मचारी भारतीय होते. त्यांच्यासोबत 22 लोक होते."
जहाजातील एका कर्मचाऱ्याच्या डोक्याला जखम झाली आहे. मात्र कोणतीही दुखापत झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं.
त्यांनी नमूद केलंय की, कंपनीच्या अमेरिकन टीमचे दोन सदस्य, मियामी आणि ओक्लाहोमा येथून तपासणीसाठी बाल्टिमोरला आले आहेत.
एका शिपिंग तज्ज्ञाने बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात इंजिनमध्ये बिघाड, स्टिअरिंगमध्ये बिघाड किंवा जनरेटर जळल्यामुळे झाला असावा.
 
 
पाण्यात बुडलेल्या वाहनांचं काय?
बाल्टिमोरचे अग्निशमन प्रमुख म्हणतात, "मी खात्रीने सांगू शकतो की आमच्या सोनार उपकरणांनी पाण्यात बुडलेली वाहने शोधली आहेत."पण नेमकी किती वाहनं बुडाली याची संख्या खात्रीने सांगता येत नसल्याचं त्यांनी सांगितलं.त्यांनी सांगितलं की, काही क्रू मेंबर अजूनही जहाजावर आहे. आम्ही तटरक्षक दलाच्या संपर्कात आहोत.त्यांच्या टीमला सांगण्यात आलंय की, काही कामगार अजूनही पुलावर आहेत, परंतु त्यांची अद्याप पुष्टी झालेली नाही.
 
 
पुलाचं काम करणाऱ्या कंत्राटदारांचं काय झालं?
यूएस कोस्ट गार्डसह मेरीलँड वाहतूक सचिव पॉल विडेफेल्ड यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितलं की, ज्या वेळी पूल कोसळला त्यावेळी काम करणारे कंत्राटदार दुरुस्तीचे काम पाहत होते.
ते म्हणाले की, शोध आणि बचाव कार्य सुरू असल्याने बाल्टिमोर बंदरात आणि बाहेरील जहाजांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
यूएस कोस्ट गार्डच्या प्रवक्त्याने पत्रकारांना सांगितलं की, "जिवंत लोकांचा शोध घेणं हे पहिलं काम आहे. तीन लहान बोटी, एक 87 फूट गस्तीची बोट आणि हेलिकॉप्टर घटनास्थळी शोध मोहीम राबवत आहेत.
आतापर्यंत कोणत्याही जीवितहानीची पुष्टी झालेली नसल्याचं विडेफेल्ड यांनी सांगितलं.
 
बाल्टिमोर पुलाचा इतिहास
बाल्टिमोर पुलाला 'की ब्रिज' म्हणूनही ओळखलं जातं. 19व्या शतकातील अमेरिकन कवी फ्रान्सिस स्कॉट की यांच्या नावावरून या पुलाचं नाव ठेवण्यात आलं आहे.
फ्रान्सिस स्कॉट की यांनी 'स्टार स्पॅन्ग्ल्ड बॅनर' हे अमेरिकन राष्ट्रगीत लिहिले आहे.
1977 मध्ये तो लोकांसाठी खुले करण्यात आला होता.
हा पूल 2632 मीटर लांब होता जो पटापस्को नदीच्या दुसऱ्या टोकाला बाल्टिमोर बंदराशी जोडला होता.
या ठिकाणी ही नदी समुद्राला मिळते.
 
Published By- Priya Dixit