बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 जुलै 2021 (11:58 IST)

बांगलादेश : 20 इंच उंची आणि 28 किलो वजन असणारी ही चिमुकली गाय पाहिलीत का?

बांगलादेशातल्या एका शेतात सध्या एका गायीला बघण्यासाठी प्रचंड गर्दी होतेय. कारण कदाचित ही जगातली सर्वांत चिमुकली गाय ठरू शकते.या गायीचं नाव आहे -राणी.
 
भुत्ती जातीची किंवा भुतानची ही 23 महिन्यांची गाय अवघी 51 सेंटिमीटर म्हणजे 20 इंच उंच आहे. तर तिचं वजन आहे अवघं 28 किलो.
 
कोव्हिडमुळे बांगलादेशात लॉकडाऊन लावण्यात आलाय. पण असं असूनही जवळपास 15 हजार जणांनी आतापर्यंत राणीला पाहण्यासाठी या फार्मला भेट दिली असल्याचं समजतंय.
 
बांगलादेशची राजधानी ढाका शहरानजीक असलेल्या छारीग्रामजवळ एका फार्ममध्ये ही गाय आहे.
 
जगातली सर्वांत लहान गाय म्हणून आपल्या राणी गायीची 'गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नोंद व्हावी म्हणून फार्मचे व्यवस्थापक हसन हवालदार यांनी अर्ज केला आहे.
 
"मी माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये असं काहीही पाहिलेलं नाही,'' असं याठिकाणी भेट देण्यासाठी आलेल्या रिना बेगम यांनी बीबीसीच्या बांगला सेवेसोबत बोलताना सांगितलं.
 
हवालदार यांनी बांगलादेशाच्या वायव्येला असणाऱ्या नावगाव परिसरातल्या एका शेतामधून गेल्यावर्षी राणीला आणलं होतं.
 
राणीला चालण्यामध्ये काही अडचणी आहेत. तसंच ती इतर गायींना घाबरतेदेखील. त्यामुळं 'शिकोर अॅग्रो फार्म'मध्ये तिला इतर गायी आणि प्राण्यांपासून वेगळं ठेवण्यात आलं आहे, असं हवालदार यांनी सांगितलं.
 
"ती अत्यंत कमी खाते. दिवसातून दोन वेळा थोडा-थोडा कोंडा आणि गवत ती खाते. तिला बाहेर फिरायला आवडतं आणि आम्ही जेव्हा तिला उचलून घेतो तेव्हा तिला प्रचंड आनंद होतो," असंही हवालदार यांनी सांगितलं.
 
सध्या सर्वांत कमी उंचीच्या गायीचा विक्रम हा भारतातील माणिक्यम नावाच्या गायीच्या नावावर आहे. या गायीची खुरापासूनची उंची ही 61.1 सेंटिमीटर आहे.
 
सर्वांत कमी उंचीच्या गायीचा विक्रम राणीच्या नावावर होऊ शकतो का, हे तपासण्यासाठी 'गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड्स'चे अधिकारी यावर्षी भेट देण्याची शक्यता आहे. हवालदार यांनी बीबीसीबरोबर बोलताना ही माहिती दिली.
 
मुस्लीम समाजातील महत्त्वाचा असलेला ईद अल-अधा उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळं कुर्बानीसाठी राणीची विक्री केली जाणार का याबाबतही चर्चा सुरू झाल्या आहेत. पण तसं काहीही करणार नसल्याचं फार्मच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.