शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 8 फेब्रुवारी 2023 (20:14 IST)

तुर्कीमध्ये भूकंपामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 9 हजारांहून अधिक

तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी (6 फेब्रुवारी) झालेल्या भूकंपामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 9 हजारांहून अधिक झाली आहे. हा आकडा अजून वाढण्याची भीती आहे.
तुर्कीमधील वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार तुर्कीमधील मृतांचा आकडा 6234 आहे. दुसरीकडे सीरियाच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की, सीरियमधील मृतांचा निश्चित आकडा सांगणं कठीण आहे.
मात्र, स्थानिक माध्यमं आणि मदत कार्य करणाऱ्या गटांच्या मते भूकंपामुळे 2500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सीरियन सरकारच्या नियंत्रणात असलेल्या भागात 1250 लोकांचा मृत्यू झाला आहे.
 
सीरियामध्ये बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या भागात मृतांचा आकडा 1280 हून अधिक झाला आहे.
 
दक्षिण तुर्की आणि उत्तर सीरियामध्ये लोकांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पीडितांचे कुटुंबीयही बचाव कार्यात मदत करत आहेत.
 
तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तैय्यप अर्दोआन यांनी देशाच्या दक्षिण भागातील 10 प्रांतात आणीबाणी जाहीर केली आहे. ही आणीबाणी तीन महिन्यांसाठी असेल.
डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्सचे कार्यकारी संचालक नतालिया रॉबर्ट्स यांनी म्हटलं आहे की, सीरियामध्ये त्यांची एक टीम आहे आणि दुर्दैवाने आमच्या एका सहकाऱ्याचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला आहे.
 
त्यांनी म्हटलं, "हा विध्वंसावर विध्वंस आहे. तुर्कीमध्ये ज्या भागात भूकंप झाला आहे, तिथे लाखो सीरियन शरणार्थी राहतात. ते बहुतांशवेळी पक्क्या घरात राहात नाहीत."
 
रॉबर्ट्स यांनी म्हटलं, "खूप जास्त काळ ढिगाऱ्याखाली दबून राहिलेल्या आणि जखमी झालेल्या लोकांना किडनी फेल होण्याचा धोका असतो. येणाऱ्या काही आठवड्यात अशा रुग्णांची संख्या वाढू शकते."
 
नतालिया रॉबर्ट्स पुढे म्हणतात, की अशा कडाक्याच्या थंडीतही लोकांना आपल्या घरी परत जाण्याची भीती वाटतीये.
 
रॉबर्ट्स यांनी म्हटलं की, त्यांच्यासाठी सुरक्षित निवासस्थानाची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर साथीचे रोग पसरण्याचा धोका आहे. भूकंपाचा परिणाम उत्तर सीरियात अनेक महिन्यांपर्यंत दिसून येईल.
 
7.8 रिश्टर स्केलचा भूकंप
सोमवारी सकाळी झालेल्या भूकंपाची तीव्रता 7.8 होती. पहाटेच्या भूकंपानंतर पुन्हा दुपारी भूकंपाचा झटका तुर्कीत जाणवला होता. नव्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.5 इतकी होती.
दुसरा भूकंप हा स्थानिक वेळेनुसार दुपारी 1.24 झाला आहे. पहिल्या केंद्रापासून 80 मैल दूर असलेल्या एल्बिस्टान या ठिकाणी झाला होता.
 
भूकंपाची तीव्रता लक्षात घेऊन अमेरिकेने तुर्कीला मदतीची घोषणा केली आहे. "तुर्कीत अतिशय विनाशकारी असा भूकंप आला. अनेक नागरिकांचा यात मृत्यू झाला आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. तुर्की प्रशासनाच्या आम्ही संपर्कात आहोत. आम्हाला कोणत्या पद्धतीने आणि वेगवान पातळीवर कशी मदत पोहोचवता येईल याचं नियोजन सुरू आहे," असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सांगितलं.
पहिल्या धक्क्यानंतर काही मिनिटांनी दुसरा धक्का जाणवला. यानंतरही अनेकदा धक्के बसत राहिल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.
 
तुर्कीसह लेबनॉन, सीरिया, सायप्रस, इस्रायल या शेजारी देशांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.
 
भूकंपाची झळ बसलेल्या भागातील इमारतींचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती बीबीसी तुर्कीच्या प्रतिनिधींनी सांगितलं.
 
मंगळवार (7 फेब्रुवारी) भूकंपाचा आणखी एक धक्का मध्य तुर्कीमध्ये जाणवला. गोलबासी इथं जमिनीखाली 10 किमीवर याचं केंद्र असल्याचं सांगितलं जात आहे. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणाच्या माहितीनुसार त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.5 इतकी होती.
 
भूकंपाची शक्यता असलेल्या संवेदनशील क्षेत्रात तुर्की मोडतं. गेल्या काही वर्षांपासून तुर्कीत नियमितपणे भूकंप येत आहेत. 2020 जानेवारीत एलाजिग इथे 6.8 रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप आला होता. या दुर्घटनेत 40 लोकांचा मृत्यू झाला होता.
2022 मध्ये एजियन सागरात आलेल्या भूकंपाची तीव्रता 7.0 एवढी होती. यामध्ये 114 लोकांचा मृत्यू झाला होता. हजारहून अधिक नागरिक जखमी झाले होते.
 
1999 साली दूजा इथे 7.4 क्षमतेचा भूकंप आला होता. 17 हजारहून अधिक नागरिकांनी यामध्ये जीव गमावला. हजारहून अधिक लोक इस्तंबूल शहरातच गेले.
 
मदतीसाठी भारताकडून NDRF, श्वानपथके आणि डॉक्टर्सची टीम
भूकंपाची तीव्रता लक्षात घेऊन भारताने सर्वोतपरी मदत देण्याची घोषणा केली आहे. NDRF आणि डॉक्टर्सच्या टीम ताबडतोब पाठवणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.
 
यामध्ये 100 NDRF जवानांच्या दोन टीमचा समावेश असणार आहे. तुर्कीमधील भूकंपग्रस्त भागात बचावकार्य करण्यासाठी हे जवान कार्य करतील. त्यांच्यासोबत श्वान पथकंही असणार आहेत.
 
तसंच सोबत प्रशिक्षित डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ असणार आहे. तुर्की सरकारशी चर्चा करून मदतीच्या सगळे साहित्यही पाठवले जातील, असंही पंतप्रधान कार्यालयाने सांगितलं आहे.
 
तुर्कीतील भूकंपाचे 6 फोटो जे तीव्रता, विध्वंस आणि हाहाःकार दर्शवतात...
या भूकंपांमध्ये हजारो इमारती जमिनदोस्त झाल्या आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
 
ढिगाऱ्याखाली अडकलेले लोक त्यांच्या फोनमधून त्याचं लाईव्ह लोकेशन, व्हीडिओ, फोटो आणि व्हॉईसनोट पाठवत असल्याचं एका तुर्की पत्रकारानं बीबीसीला सांगितलंय.
 
खालील चित्रांमधून तुम्हाला या भूकंपाची तीव्रता, त्यामुळे झालेलं जिवीत आणि आर्थिक नुकसान आणि माजलेला हाहाःकार तुम्हाला दिसेल.
Published By- Priya Dixit