रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 21 जून 2023 (14:36 IST)

इलॉन मस्क म्हणतात, ‘मी मोदींचा फॅन’ स्टारलिंकच्या भारतातील गुंतवणुकीवर केला खुलासा

PM Modi with elon musk
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या तीन दिवसांच्या राजकीय दौऱ्यासाठी अमेरिकेत पोहोचले आहेत.
त्यांनी अमेरिकेत पोहोचल्यानंतर अमेरिकेच्या अनेक मोठ्या उद्योगपती आणि मोठ्या व्यक्तींची भेट घेतली. यात एक नाव इलॉन मस्क यांचंही आहे.
 
इलॉन मस्क सोशल मीडिया कंपनी ट्विटर, स्पेस कंपनी स्पेसएक्स आणि इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे मालक आहेत.
 
त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यावर म्हटलं, “मी मोदींचा फॅन आहे.”
यावेळी मस्क यांनी टेस्लाच्या भारतात येण्यासंबंधी अनेक गोष्टीही सांगितल्या
 
त्यांनी पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर पत्रकारांशी चर्चा केली आणि त्यांच्या भेटीबद्दल सविस्तर सांगितलं. त्यांनी हेही सांगितलं की ते भारताचा दौरा कधी करतील.
 
याशिवाय ट्विटरचे संस्थापक आणि माजी सीईओ जॅक डॉर्सी यांनी भारत सरकारवर नुकतेच जे आरोप केलेत त्याबद्दलही त्यांना विचारलं गेलं.
 
काय म्हणाले इलॉन मस्क?
पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर देताना त्यांनी सर्वांत आधी हे म्हटलं की ते भारताच्या भविष्याबद्दल उत्साही आहेत आणि त्यांना वाटतं की सगळ्या जगात भारत असा देश आहे जिथे (प्रगतीच्या) अधिक संधी आहेत.
 
काही दिवसांपूर्वी ट्विटरचे संस्थापक जॅक डॉर्सी यांनी भारत सरकारवर आरोप केला होता की शेतकरी आंदोलनादरम्यान सरकारने ट्विटर बंद करण्याची तसंच त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या घरी छापे मारण्याची धमकी दिली होती.
 
त्यावर मस्क यांनी म्हटलंय की, " स्थानिक कायदे आणि नियमांचं पालन करण्याशिवाय ट्विटरकडे कुठलाच पर्याय नाही. जर स्थानिक कायद्यांचं पालन केलं नाही तर तिथे काम करणं बंद करावं लागेल."
 
पंतप्रधान मोदींबद्दल काय म्हणाले मस्क?
मोदींच्या भेटीबद्दल बोलताना ते म्हणाले, “खरंतर मोदींना भारताची खूप काळजी आहे कारण ते सतत आम्हाला भारतात गुंतवणूक करण्यासाठी प्रेरित करत आहेत. आम्ही ते करूही, फक्त आम्ही योग्य संधीची वाट पाहातोय.”
 
मस्क यांनी म्हटलं की मोदींसोबतची त्यांची बैठक फारच छान झाली आणि या भेटीने सात वर्षांपूर्वी त्यांनी पंतप्रधान मोदींना टेस्ला कारखान्याची सैर घडवली होती त्याच्या आठवणी ताज्या झाल्या.
 
2015 साली पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी कॅलिफोर्नियातल्या टेस्ला मोटर्सच्या कारखान्याला भेट दिली होती.
 
त्यांच्याबद्दल बोलताना मस्क म्हणाले, “ते भारतासाठी चांगल्या गोष्टी करू पाहात आहेत. नव्या कंपन्यांसाठी मोकळेपणाचं धोरण आणून त्यांना मदत करू पाहात आहेत. त्याबरोबरच त्यांना भारताचं हितही जपायचं आहे. माझ्या मते हेच तर त्यांचं काम आहे. मी मोदींचा फॅन आहे हे मला मान्य करावं लागेल.”
 
इलॉन मस्क आधीही हे म्हटलेत की त्यांना भारतीय बाजारात आपली इलेक्ट्रिक कार टेस्ला आणण्यात रस आहे.
 
एक पत्रकाराने त्यांना विचारलं की भारतात गुंतवणूक करण्याबद्दल त्यांच्या काय योजना आहे आणि ते भारतात कोणत्या प्रकारची गुंतवणूक करू इच्छितात?
 
याचं उत्तर देताना मस्क यांनी म्हटलं की, “शाश्वत ऊर्जेच्या क्षेत्रात भारतात खूप संधी आहेत. शाश्वत ऊर्जेचा महत्त्वाचा प्रकार आहे पवन ऊर्जा. त्यासाठी इथे खूप संधी आहेत. पवनऊर्जेतून तुम्ही वीज निर्मिती करू शकता.”
 
त्याबरोबरच मस्क यांनी आपली इंटरनेट कंपनी स्टारलिंक भारतात आणण्याच्या शक्यतांवरही चर्चा केली. ते म्हणाले, “आम्ही स्टारलिंक भारतात घेऊन जाण्याबद्दल विचार करत आहोत. याचा फायदा भारतातल्या त्या दुर्गम भागातल्या गावाखेड्यांना फायदा होईल जिथे इंटरनेट नाहीये किंवा इंटरनेटचा स्पीड खूपच कमी आहे.”
 
मस्क भारतात येणार का? मोदींनी त्यांना भारतात येण्याचं आमंत्रण दिलं का या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले की, “पंतप्रधान मोदींनी त्यांना आमंत्रण दिलं आहे आणि ते पुढच्या वर्षी भारताचा दौरा करतील.”
 
पंतप्रधान मोदी 20 तारखेला रात्री अमेरिकेत पोचले. तिथे पोचल्यानंतर त्यांनी अनेक मोठ्या लोकांच्या भेटी घेतल्या ज्यात नोबल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ, कलाकार, वैज्ञानिक, उद्योगपती आणि आरोग्य क्षेत्रातले तज्ज्ञ होते.
 
मोदी आधी न्यूयॉर्कला गेले, त्यानंतर ते वॉशिंग्टन डीसीला जातील जिथे ते अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांची भेट घेतील. त्याबरोबरच ते अमेरिकन संसदेच्या संयुक्त सत्रालाही संबोधित करतील. त्यांच्या सन्मानार्थ व्हाईट हाऊसमध्ये एक डिनरही आयोजित केला आहे.
 


Published By- Priya Dixit