गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2023 (12:18 IST)

अमेरिकेत शेळ्या आगीवर नियंत्रण मिळवतायत, वाचा या प्राचीन प्रयोगाबद्दल

लॉस एंजेलिसमध्ये शेळ्या चरत असल्याचं दृश्य सामान्य बनत चाललंय. जंगलातील आगीवर नियंत्रण मिळवण्याचा हा प्राचीन उपाय खरोखरंच कधीतरी आगीच्या मोठ्या आणि भीषण ज्वाला रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल का?
 
लॉस एंजेलिसमधील हे दृश्य सामान्य आहे. निरभ्र-स्पष्ट, स्वच्छ निळ्या आकाशाखाली प्रशांत महासागर चमकतोय, नजर जाईल तितक्या दूरवर पसरलेले सोनेरी वाळूचे किनारे आणि एका टेकडीवरून शेळ्यांचा कळप त्या कोट्यवधी डॉलरच्या दृश्याचा आनंद लुटतोय.
 
या केवळ शेळ्या नसून कॅलिफोर्नियाच्या जंगलातील आगीविरूद्धच्या लढ्यातील नवीन गुप्त हत्यार आहेत आणि चरण्यासाठी त्यांना राज्यात विविध ठिकाणी सोडण्यात आलंय.
 
शेळीपालक मायकेल चोई म्हणतात, "आम्ही जिथे जातो तिथे त्यांचं खूप सकारात्मक पद्धतीने स्वागत केलं जातं. “मला असं वाटतं ही दोघांसाठीही चांगली गोष्ट आहे."
 
चोई आग रोखण्यासाठी आवश्यक चराई करणाऱ्या शेळ्यांची कंपनी चालवतात. हा त्यांचा कौटुंबिक व्यवसाय आहे.
 
ते शहरातील संस्था, शाळा आणि खाजगी ग्राहकांना टेकड्या आणि भूप्रदेशातील खुरटं गवत स्वच्छ करण्यासाठी शेळ्या भाड्याने देतात. कंपनीकडे 700 शेळ्या आहेत आणि त्यांना अलिकडेच मागणी पूर्ण करण्यासाठी शेळ्यांची संख्या वाढवावी लागली.
 
"मला वाटतं की ही संकल्पना आणि पर्यावरणीय परिणामांबद्दल लोकं जागरूक होत आहेत. खुरटं गवत स्वच्छ करण्यासाठी आणि माळरानाचं आगीपासून संरक्षण करण्यासाठी कोणत्या पद्धती वापरायच्या आहेत याबद्दल ते अधिक जागरूक झालेत. त्यामुळे निश्चितपणे याला मोठी मागणी आहे आणि दिवसेंदिवस ती वाढतेय", असं ते म्हणाले.
 
1980 सालापासून कॅलिफोर्निया हे वारंवार जंगलातील मोठमोठ्या आणि विध्वंसक आगीशी लढण्याचं केंद्रस्थान बनलंय.
 
‘कॅलफायर’ (कॅलिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ फॉरेस्ट्री अँड फायर प्रोटेक्शन, राज्य आग नियंत्रक कंपनी) नुसार, 2021 मध्ये कॅलिफोर्नियाला आगीच्या “अभूतपूर्ण” परिस्थितीचा सामना करावा लागला. फक्त एका आगीत 960,000 एकर (3,885 चौ. किमी) पेक्षा जास्त जंगल जळून खाक झालं. अशा गंभीर परिस्थितीत वेळेवर पडणाऱ्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळू शकतो.
 
2022 मध्ये राज्यातील जंगलातील आगीच्या हंगामाचे वर्णन "सौम्य" म्हणून करण्यात आलेलं - 2.3 दशलक्ष एकर (9,307 चौरस किमी) च्या पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत 300,000 एकर (1,214 चौरस किमी) पेक्षा जास्त जंगल जळून गेलं.
 
कॅलिफोर्नियामध्ये यावर्षी ऑगस्ट महिना सरासरीपेक्षा थंड आणि दमट होता. तरीही सव्वा लाख एकर जमीन जळून खाक झाली असून चार जणांचा मृत्यू झालाय.
 
हवामानातील बदलामुळे उष्ण, कोरड्या परिस्थितीसारखे घटक आगीचा धोका आणि तीव्रता वाढवण्याची प्रमुख कारणं आहेत, असं संशोधन दाखवतं. परंतु जमीनीचं योग्य व्यवस्थापन महत्वाची भूमिका बजावू शकतं, असेही अभ्यास झालेत. कारण मेलेली झाडं आणि सुकलेल्या झुडुपांची संख्या वाढल्याने मोठ्या आणि गंभीर आगी लागण्यासाठीचं धोकादायक इंधन तयार होत असतं.
 
पारंपरिक जमीन व्यवस्थापनामध्ये झुडपांची वाढ नियंत्रणात ठेवणं, सुकलेलं सरपण कमी करणं आणि तणनाशक काढून टाकण्यासारखी अंगमेहनतीची कामं केली जात. परंतु कंपन्या आणि शहर अधिकारी भविष्याच्या दृष्टीने अधिक टिकाऊ आणि स्वस्त पद्धती राबवण्याचा प्रयत्न करत आहेत - उदाहरणार्थ शेळ्या.
 
"कॅलिफोर्निया आणि भूमध्यसागरीय प्रदेशात विशेषतः झुडूपांमुळे शेळ्या अतिशय उपयुक्त आहेत - विशिष्ट प्रकारच्या जबड्यामुळे शेळ्या या कामासाठी सुयोग्य आहेत.” इडाहो विद्यापीठातील इकोलॉजीच्या प्राध्यापक कॅरेन लाँचबॉग यांनी मेंढ्या, शेळ्या आणि गुरं चरण्यासंबंधी विविध अभ्यास केलेत. त्या म्हणतात, "त्यांची निर्मिती केवळ झुडूपं खाण्यासाठीच झालेली आहे."
 
इतर प्राण्यांच्या तुलनेत शेळ्यांचं तोंड अरुंद, निमुळतं असतं ज्यामुळे त्या झाडांमधून झुडुपं सहजपणे निवडून काढू शकतात.
 
मागच्या दोन पायावर उभं राहून सरासरी 6.7 फूट (2 मीटर) उंचीवरील पानं खाण्यासाठी त्यांची जीभ आणि जबडा निपुण असतो. "त्यांच्याकडे संयुगं डिटॉक्सिफाई करण्याची क्षमता देखील असते, त्यामुळे त्या विषारी वनस्पती खाऊ शकतात”, असंही लाँचबॉग सांगतात.
 
लाँचबॉग म्हणतात की, जंगलातील आगीचा धोका कमी करण्याची एक नवीन पद्धत म्हणून मोठ्या संख्येने शहर अधिकारी आणि जमीन व्यवस्थापक शेळ्यांचा वापर करण्याच्या प्रयोगाकडे सकारात्मकतेने पाहत आहेत.
 
"मी खूश आहे कारण जेव्हा आम्ही यावर संशोधन सुरू केले तेव्हा ते कुठवर जाणार आहे याची आम्हाला कल्पना नव्हती आणि आता यामध्ये पुरेसं काम आहे आणि त्यातून लोकांचा उदरनिर्वाह होतोय. शहरं आणि काउंटी त्यासाठी पैसे देण्यास तयार आहेत कारण त्यांना माहितेय की यामुळे फरक पडतो."
 
शेळ्यांचं पोट कधीच भरत नाही आणि ते तण, झुडपं, कमी उंचीवरील पानं आणि कोरडे कुंचले खातात - हे सर्व आगीसाठीचं सरपण आहे.
 
कॅलिफोर्नियाच्या जंगलातील आग नियंत्रण तयारीच्या दृष्टीने रहिवाशांसाठी असलेल्या मार्गदर्शन सूचनांमध्ये सर्व मृत वनस्पती काढून टाकणे आणि चार इंच (10 सेमी) पर्यंत गवत कापण्याच्या सूचनांचा समावेश आहे. - शेळी नैसर्गिकपणे, उत्साहाने आणि स्वत:हून या सर्व गोष्टी करते.
 
शेळ्या अतिउष्णतेमध्ये (100F/37.7C आणि त्याहून अधिक]) दूर चरत असतात, आणि जिथे मजुरांना चढून जाणं कठीण असतं अशा उंच टेकड्यांवर चढण्यात शेळ्यांना कोणतीही अडचण येत नाही.
 
"शेळ्या या नैसर्गिक गिर्यारोहक आहेत. त्या कोणत्याही अडचणीशिवाय उंच टेकड्यांवर चढू शकतात, त्या सर्व कोनाड्यांमध्ये आणि घळींमध्ये प्रवेश करतात जे सामान्यतः मनुष्यासाठी खूप कठीण असतं आणि त्या जवळपास सर्व काही खातात”, चोई म्हणतात.
 
ग्लेनडेल, लॉस एंजेलिस काऊंटीमधील शहरामध्ये 300 शेळ्यांनी वर्दुगो पर्वताच्या कडांवर चराई करून दोन आठवड्यांच्या कालावधीत 14 एकर (5.6 हेक्टर) जमीन स्वच्छ केली.
 
या शहराला “आगीचा मोठा धोका असलेलं" क्षेत्र म्हणून वर्गीकृत केलंय. आगीचा धोका कमी करण्यासाठी ग्लेनडेल अग्निशमन विभागाचे वनस्पति व्यवस्थापन निरीक्षक पॅटी मुंडो यांनी 2018 पासून चोईच्या शेळ्यांचा वापर करायला सुरूवात केली आहे.
 
घरं आणि जमिनीच्या मोकळ्या जागांमध्ये बफर झोन तयार करणे हा त्यांचा उद्देश आहे, जेणेकरून आग लागल्यास तिचा प्रभाव कमी होईल किंवा ती पूर्णपणे रोखता येईल.
 
बफर झोन असल्‍याने घरांचे आगीपासून संरक्षण होण्‍यास मदत होते. ज्‍या राज्यात 60,000 हून अधिक लोकसंख्या आहे, अशा राज्यात वणवा लागल्यास बफर झोन निर्णायक ठरतात.
 
वेस्ट सॅक्रॅमेंटोमध्ये, आग प्रतिबंधक उपायांमध्ये 2013 पासून आग इंधन कपातीचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करण्यासाठी "सर्जनशील आणि पर्यावरणीयदृष्ट्या टिकाऊ पद्धत" म्हणून शेळ्यांचे कळप वापरले जातायत, असं शहराचे पार्क ऑपरेशन्स अधीक्षक जेसन पुओपोलो म्हणतात.
 
शेळ्या वर्षातून दोनदा शहरात येतात - एकदा पावसाळ्यात झालेली वाढ साफ करण्यासाठी हिवाळ्यात आणि एकदा शरद ऋतूतील मऊ सुकलेलं माळरान साफ करण्यासाठी. शेळीपालन कंपनी वेस्टर्न ग्रेझर्सला काम करण्यासाठी गेल्या हंगामात शहराच्या खर्चातून 1,50,000 डॉलर्स देण्यात आले.
 
पुओपोलो म्हणतात, “अवघड प्रदेशात काम करण्याचा संभाव्य धोका कमी करणं आणि दुखापतींना आळा घालणं हा आम्ही पाहिलेला सर्वात मोठा फायदा आहे.” "आमच्‍याकडील टेकड्यांना उतार आहे आणि मोठ्या प्रमाणात जंगल आहे. यावरून पडल्‍यास कर्मचार्‍यांना इजा होऊ शकते पण शेळ्या तो धोका सहज पत्करू शकतात."
 
शेळ्यांनी केलेल्या मेहनतीने इतका लाभ झाला आहे की 2022 मध्ये लागलेल्या आगीत एका गृहसंकुलाला वाचवण्याचे श्रेय शहराच्या अग्निशमन दलाने शेळ्यांच्या कळपाला दिलं.
 
"आमच्या अग्निशमन प्रमुखानं सांगितले की शेळ्यांनी जर त्या शेतात पूर्वी चराई केलेली नसती तर आग खूप गंभीर होऊ शकली असती”, असं पुओपोलो पुढे म्हणाले.
 
"शेळ्यांनी अलिकडेच त्या भागात चराई करून माळरान चार इंचाने (10 सें.मी.) कमी केलेलं, त्यामुळे अग्निशमन दलाला आगीच्या ज्वाळांमध्ये उडी मारण्यास आणि गृहसंकुलास वाचवण्यात यश आलं.”
 
वेगाने वाढणाऱ्या प्रजातींवर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील शेळ्या उपयुक्त आहेत, जसं की मूळची त्या प्रदेशातील नसलेली काळी मोहरी ही वनस्पती. जेव्हा बियाणे शेळीच्या विष्ठेद्वारे बाहेर पडतं तेव्हा ते उपयुक्त नसतं, म्हणजे त्याची पुन्हा वाढ होत नाही – इतर प्राणी ज्याप्रकारे बिया पचवतात त्यापेक्षा हे वेगळं आहे.
 
इटली, ग्रीस आणि स्पेन यांसारख्या युरोपियन देशांमध्ये जमीन स्वच्छ करण्यासाठी शेळ्यांचा वापर करणं ही शतकानुशतकं जुनी प्रथा आहे.
 
भूमध्यसागरीय प्रदेशात शेळी चरणं हे आग रोखण्यासाठी किती प्रभावी आहे याच्या अभ्यासात असं आढळून आलंय की “प्रामुख्याने सरपणाच्या वाढीच्या पायऱ्यांमध्ये व्यत्यय आणण्यासाठी हे पर्यावरणीयदृष्ट्या कदाचित सर्वात योग्य तंत्र आहे." कॅलिफोर्नियामध्ये ही प्रथा फार पूर्वीपासून सुरू नसली तरी आग व्यवस्थापनामध्ये प्राण्यांचा वापर करण्याचे प्रयोग एका दशकाहून अधिक काळापासून होत आहेत.
 
2013 मध्ये, यूएस फॉरेस्ट सर्व्हिस (USFS) ने क्लीव्हलँड नॅशनल फॉरेस्ट, दक्षिणी कॅलिफोर्नियामध्ये 100 एकर (40-हेक्टर) वन-विरळ प्रकल्पात 1,400 शेळ्या वापरण्याचा प्रयोग केला.
 
आजूबाजूचा परिसर आणि जंगल यांच्यातील 300 फूट (91.4 मीटर) अतिरिक्त प्रदेश स्वच्छ करणं हे उद्दिष्ट होतं. “सरपण स्वच्छ करण्यासाठी झाडं कापणारी छोटी मशीन, हँड टूल्स आणि कापलेलं सरपण सुरक्षितपणे जाळण्यासाठी बरीच मानवी शक्ती आणि यंत्रसामग्री लागते.”, असं क्षेत्राचे जिल्हा रेंजर जोन फ्रीडलँडर म्हणाले.
 
यूएस फॉरेस्ट सर्व्हिसच्या म्हणण्यानुसार, जिथे शेळ्यांसाठी प्रति एकर 400-500 डॉलर मोजावे लागतात तेच मनुष्यबळाचा वापर करताना सुमारे 1,200-1,500 डॉलर लागतात. वन व्यवस्थापकांनी चराईपूर्वी आणि चराईनंतरच्या भूखंडांवर देखरेख ठेवण्यासाठी एक योजना आखली आहे, जेणेकरून कालांतराने शेळ्यांच्या परिणामकारतेची आणि परिसरात वापरल्या जाणा-या पारंपारिक पद्धतींशी तुलना करता येईल.
 
जंगलात शेळ्यांच्या वापरावर केलेल्या अभ्यासात असं आढळून आलंय की प्राण्यांनी वनस्पतींचं आच्छादन कमी करण्याचा “विशेष प्रभाव" पडतो - आच्छादनात 87% घट आणि उंची 92% नी कमी होते.
 
माळरान व्यवस्थापन करण्यासाठी शेळ्या हा एकमेव मार्ग असण्याची गरज नाही, परंतु अशा प्रकारे वन्यजीवांचा वापर करणं हे "जेव्हा आपण जंगलातील आगीविरूद्ध लढत असतो तेव्हा अनेक पर्यायांपैकी तो एक असावा", असं लाँचबॉग सांगतात.
 
काही अग्निशमन विभाग स्वतःची जनावरं देखील खरेदी करत आहेत. "त्या सर्व गवत खातात आणि जमिन सपाट करतात, ज्यामुळे या भागातील जंगलातील आग कमी करण्यास मदत होते.”
 
सॅन मॅन्युएल अग्निशमन विभागाचे सहाय्यक प्रमुख ख्रिस नेल्सन म्हणतात, त्यांच्याकडे स्वतःचा 300 शेळ्यांचा कळप आहे. शेळ्यांना जमिनीच्या पुढील तुकड्यावर हलवण्यापूर्वी त्या एकाच वेळी दोन ते पाच एकरांवर काम करतात. शेळ्यांनी चराई केल्यानंतर मागे उरलेल्या झुडपांची स्वच्छता अग्निशमन अधिकारी उन्हाळ्याच्या शेवटी करतात.
 
राज्याची अग्निशमन एजन्सी कॅलफायरने शेळ्या चरण्याच्या चाचण्यांसाठी शहरांना अनेक अनुदानं दिली आहेत.
 
कॅलफायरच्या सरकारी कार्यक्रम विश्लेषक, कारा गॅरेट म्हणतात, "आमच्या अनेक लाभार्थ्यांना विशेषत: इंधन कपात प्रकल्पांच्या देखभालीसाठी चराई हे एक प्रभावी साधन असल्याचं वाटलं."
 
“गवत कापणी यंत्रे, तण खाणारे, झाडं कापणा-या मशिन्स, ट्रॅक्टर आणि ट्रिमर हे सर्व वर्षातील चुकीच्या वेळी वापरल्यास जंगलात आग भडकू शकते आणि संपूर्ण कॅलिफोर्नियामध्ये कामं करणे शिल्लक असताना वनस्पतींना सांभाळण्याच्या दृष्टीने शेळ्यांकडून चराई करून घेणं हा एक सुरक्षित पर्याय आहे."
 
कोणत्याही शहरात शेळ्या वापरण्याची शिफारस पुओपोलो “बेधडकपणे” करतात आणि देशातील विविध लोकांशी त्याच्या फायद्याबद्दल बोलतात, असं असं तरी बोलताना हा कायमस्वरूपी सर्वोत्तम उपाय नसू शकतो याचीही ते सावधगिरी बाळगतात.
 
"सपाट खुल्या भागात जिथे गवत कापणी यंत्रे अधिक जलद आणि कमी खर्चात काम करू शकतात अशा ठिकाणी त्यांचा वापर खर्चिक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर नाही.”
 
लाँचबॉग वर्षभराच्या खर्चावरही प्रकाश टाकतात, पुढील हंगाम येईपर्यंत शेळ्यांची गरज भासत नाही तोपर्यंत त्यांना शेडमध्ये ठेवता येत नाही. “एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेण्यासाठी तुम्हाला पायाभूत सुविधांची गरज आहे आणि प्राण्यांचं व्यवस्थापन कसं करायचं हे जाणून घेणं हे एक कौशल्य आहे, त्यामुळे तुम्हाला अनुभवी मेंढपाळाची गरज लागते”, असं त्या म्हणतात.
 
भूप्रदेशाचा प्रकार देखील एक घटक आहे ज्याचा विचार करणं आवश्यक आहे. लाँचबॉगने तिचे बहुतेक संशोधन ज्या ग्रेट बेसिनमध्ये केलंय तिथे मुख्य समस्या उंच गवत आहे आणि म्हणून ते शेळ्यांऐवजी गायी वापरतात, कारण गायी अधिक कार्यक्षम असतात आणि शेळ्या फक्त कमी उंचीचं गवत खातात.
 
शेळ्या मूळ आणि मूळ नसलेल्या प्रजातींमध्ये फरक करू शकत नाहीत आणि त्या जमिनीसाठी आवश्यक असलेली मूळ झुडपांच्या प्रजातीदेखील खातात.
 
तरिही, ज्यांना कॅलिफोर्नियाच्या माळरानावर चरणाऱ्या बकऱ्यांची पाहायला आवडतात त्यांच्यासाठी हे आर्थिक फायदे आणि परिणामाच्या पलीकडील गोष्ट आहे.
 
चोई म्हणतात, “काही गोष्टींना त्यांच्या नैसर्गिक पद्धतीने पुन्हा लागू करण्याचा हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे आणि त्याहीपलिकडे ते खूप आनंददायक आहे."
 
 





















Published By- Priya Dixit