गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 डिसेंबर 2023 (10:56 IST)

प्रागमध्ये विद्यापीठात अंदाधुंद गोळीबार, 15 जणांचा जागीच मृत्यू

shooting
चेक प्रजासत्ताकमधील प्रागमधील चार्ल्स विद्यापीठात एका बंदूकधारी हल्लेखोरानं अंदाधुंद गोळीबार केला. यात 15 जणांचा मृत्यू झाला.प्राग हे चेक प्रजासत्ताक देशातील सर्वांत मोठं शहर असून, या देशाची राजधानीही आहे.
 
रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, या हल्ल्यादरम्यान विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना एका खोलीत राहण्यास सांगितलं गेलं. विद्यार्थ्यांनीही स्वत:ला वर्ग खोलीत बंद करून घेतलं होतं.
 
चेक पोलिसांच्या माहितीनुसार, हल्लेखोर विद्यापीठातील कला शाखेचा विद्यार्थी होता. या हल्लेखोरालाही ठार करण्यात आलं. त्याचा मृतदेह कला शाखेच्या खोलीत आढळला.
 
या गोळीबारात 24 जण जखमी झालेत.
 
पोलिसांच्या माहितीनुसार, विद्यापीठातल्या या घटनेचा कुठल्याही आंतरराष्ट्रीय कट्टरतावादी संघटनेशी किंवा कारवाईशी संबंध सापडलेला नाही.
 
हल्लेखोर 24 वर्षांचा होता आणि प्राग शहरापासून 21 किलोमीटरवरील गावातील रहिवासी होता. या गोळीबाराच्या घटनेपूर्वी त्याच्या वडिलांचा मृतदेहही संशयास्पद अवस्थेत सापडला.
 
चेक प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष पीटर पॉवेल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (पूर्वीचं ट्विटर) लिहिलं आहे की, “या घटनेमुळे धक्का बसला आहे. पीडितांच्या कुटुंबाप्रती माझ्या सहवेदना आहेत.”
 
तसंच, सुरक्षा दलाने जारी केलेल्या निर्देशांचं पालन करण्यासाठी प्रागवासियांचे त्यांनी आभारही मानले.
 
‘गोळीबाराचा आवाज येताच लपण्यासाठी धावाधाव’
ट्रुरोमध्ये राहणारा 18 वर्षीय हेलँड सुट्टीत त्याच्या मित्रांसोबत प्रागमध्ये आला होता. चार्ल्स विद्यापीठात गोळीबार झाला, त्यावेली हेलँड बाजूच्याच रस्त्यावर होता.
 
हेलँड सांगतो, “आम्ही गोळीबाराचा आवाज ऐकला आणि जेव्हा पोलिसांनी सगळ्यांना दूर जायला सांगितलं, तेव्हा आम्ही लपण्यासाठी मेट्रोच्या दिशेनं पळालो. अत्यंत भीतीदायक स्थिती होती.
 
“अचानक सगळीकडे गोंधळ सुरू झाला, लोक सैरावैरा पळू लागले. आम्हाला काहीच कळत नव्हतं की, तिथं काय होतंय. पोलीस वेगानं आपल्याकडे येतायत, हे आम्ही पाहिलं. पोलीस ओरडले, पळा.”
 
लोक अजूनही धक्क्यात
पीए न्यूजच्या माहितीनुसार, प्रागमध्ये हनिमूनसाठी आलेले 34 वर्षीय टॉम लीस आणि त्यांची 31 वर्षीय पत्नी रेचेल हे दाम्पत्या गोळीबाराच्या घटनेवेळी विद्यापीठाशेजारील रेस्टॉरंटमध्ये होते.
 
टॉम सांगतात, “चेक पोलीस त्यांच्या भाषेत ओरडत होते. मी त्यांना इंग्रजीत बोलण्यास सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की, कुणी हल्लेखोर गोळीबार करत आहे, तुम्ही कुठेतरी सुरक्षित ठिकाणी जा.”
 
“ज्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही होतो, तिथल्या कर्माचाऱ्यांनी तातडीनं लाईट्स बंद केल्या. तिथं सर्व शांत होतं. आमच्यासाठी हे सर्व अत्यंत धक्कादायक होतं.”
 
टॉम सांगतात, त्यांची पत्नी अजूनही धक्क्यातच आहे.
 
टॉम म्हणाले की, आम्ही सुरक्षित असल्याचं आमच्या कुटुंबीयांना सांगितलं आहे, पण तरीही आता आम्ही थेट घरी परत जाऊ.
 
प्रागचा इतिहास
बीबीसीचे युरोपचे डिजिटल एडिटर पॉल किर्बी यांच्या माहितीनुसार :
 
चार्ल्स विद्यापीठाची कला विद्याशाखा प्राग शहराच्या मध्यभागी आहे.
 
प्रागमध्ये पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. ख्रिसमसमध्ये तर इथे जगभरातून पर्यटक येत असतात. इथल्या ओल्ड टाऊन स्केअर आणि वेन्सेस्लास स्केअरवर ख्रिसमसची दुकानं लावली जातात.
 
विद्यापीठ आणि इथल्या प्राध्यापकांनाही गौरवशाली इतिहास आहे. याच विद्यापीठातील तत्त्वज्ञानाचा विद्यार्थी असलेल्या जान पलाचने 1969 मध्ये सोव्हिएत वर्चस्वाला विरोध करण्यासाठी स्वतःला पेटवून घेतलं होतं. कला शाखेच्या चौकात त्याचं नावही कोरलं गेलंय.
 
प्रागस्थित चार्ल्स विद्यापीठात जगभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात.
 
चेक प्रजासत्ताक हा देश 30 वर्षांपूर्वी स्वतंत्र झाला आहे. गेल्या 30 वर्षांतील हा सर्वात मोठा आणि प्राणघातक हल्ला मानला जातोय.
 
Published By- Priya Dixit