शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 डिसेंबर 2023 (09:20 IST)

पाकिस्तान: महिलांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चावर अश्रूधुराचा मारा; शेकडोंना अटक

गुरुवारी (21 डिसेंबर) इस्लामाबादमध्ये महिलांच्या नेतृत्वाखाली निघालेली निदर्शनं पांगवण्यासाठी पाकिस्तानच्या पोलिसांनी अश्रूधूर आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा केला.
हा मोर्चा राजधानी इस्लामाबादमध्ये पोहोचताच महरंग बलोच यांच्यासह किमान 200 लोकांना अटक करण्यात आली.
 
बलुचिस्तानमधून कथितरित्या अनेकांना गायब करण्यात आलं आहे आणि याचा निषेध करण्यासाठी मागच्या आठवड्यापासून पाकिस्तानात निषेध मोर्चे काढले जात आहेत.
 
पोलीस कोठडीत असलेल्या एका बलुच व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर देशभर आंदोलनं सुरू झाली होती. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी पोलिसांनी त्याला गोळ्या घालून ठार मारल्याचा आरोप केला होता.
 
त्यांच्या मोर्चावर इस्लामाबाद पोलिसांनी हल्ला केल्याची माहिती महरंग बलोच यांनी 'एक्स' वर पोस्ट करून दिली होती.
डोक्यावर हेल्मेट घालून लाठीमारासाठी सज्ज असणाऱ्या पोलिसांनी या आंदोलकांना इस्लामाबादच्या रेड झोनमध्ये जाण्यापासून रोखलं. या परिसरात बहुतांश प्रशासकीय आणि कार्यकारी इमारती आहेत. इस्लामाबादचे न्यायालयही याच भागात असल्यामुळे हा भाग संवेदनशील मानला जातो.
 
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये पोलीस आंदोलकांना बळजबरीने गाडीत बसवताना दिसत होते. यावेळी झालेल्या गोंधळात अनेक आंदोलक जखमी झाले. काही आंदोलक मोठमोठ्याने रडताना आणि ओरडताना दिसत होते.
 
पाकिस्तानातला सगळ्यांत मोठा प्रांत असलेल्या बलुचिस्तानमधून लोकांचं अचानक गायब होण्याचं प्रमाण वाढलं आहे. यामागे कथितरित्या पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेचा हात असल्याचा आरोप केला जातोय.
 
सरकार अशी कारवाई झाल्याचं स्वीकारत नसल्यामुळे गुप्तचर यंत्रणेने केलेल्या अटकेच्या विरोधात न्यायालयातही दाद मागता येत नाही. बलुचिस्तानातून बेपत्ता झालेल्यांमध्ये राजकीय कार्यकर्ते, पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते आणि काही विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
 
बलुचिस्तानमध्ये 2000 च्या सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी चळवळीला सुरुवात झाली होती. तेव्हापासूनच पाकिस्तानच्या यंत्रणांवर असे आरोप केले जात आहेत.
 
या प्रांतातील महिलांनी मागील काही वर्षांपासून बेपत्ता झालेल्या नातेवाईकांना न्याय मिळावा यासाठी आवाज उठवण्यास सुरुवात केली आणि या मुद्द्याकडे जगाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
 
29 ऑक्टोबरला बलुचिस्तानमध्ये राहणाऱ्या मोला बख्श याला पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. तो त्यावेळी 24 वर्षांचा होता.
 
पोलिसांनी त्याला महिनाभर अटकेत ठेवल्यानंतर त्याच्याकडे स्फोटकं आढळून आल्यामुळे अटक केल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं.
 
न्यायालयात त्याच्या जमीन अर्जावर निकाल दिला जाणार होता. पण सुनावणीआधी एक दिवस म्हणजेच 23 नोव्हेंबरला बलुचिस्तानातील तुर्बत शहरात झालेल्या चकमकीत मोला बख्श आणि त्याचे तीन सहकारी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 
पाकिस्तानात बंदी असलेल्या दहशतवादी गटाचे ते सदस्य असल्याचा आरोपही मोला बख्श आणि त्याच्या मृत सहकाऱ्यांवर करण्यात आलेला होता.
 
पोलिसांनी केलेले दहशतवादाचे आरोप फेटाळूनच लावत मोला बख्शच्या कुटुंबीयांनी त्याचा मृत्यू पोलीस कोठडीतच झाला असल्याचा आरोप केला.
ज्यादिवशी बख्शचा मृत्यू झाला त्याच दिवशी पाकिस्तानात आंदोलनं सुरू झाली. 'बलुचिस्तानात सुरू असलेल्या नरसंहाराविरुद्धचा मोर्चा' असं नाव या आंदोलनांना देण्यात आलं होतं.
 
बलुचिस्तानातील अनेकांना सक्तीने गायब केलं जाणं आणि कथितरित्या पोलीस कोठडीत झालेल्या हत्यांना जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी या आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
 
पोलिसांनी अटक करण्यापूर्वी महरंग बलोच यांनी बीबीसीला सांगितलं की, "आम्ही मागच्या 26 दिवसांपूर्वी हा मोर्चा सुरु केला होता. बलुचिस्तानमधून गायब झालेल्या अथवा हत्या झालेल्या अनेकांच्या हजारो माता, भगिनी, मुली या मोर्चात सहभागी झाल्या आहेत."
 
"[अधिकारी] आम्हाला थांबवण्यासाठी काहीही करतील, पण आम्ही थांबणार नाही. आम्ही सर्व शांतताप्रिय आंदोलक आहोत आणि आम्ही शांतच राहू, त्यांनी (अधिकाऱ्यांनी) आमच्यावर अत्याचार केले तरीही आम्ही शांतच राहू."
 
Published By- Priya Dixit