बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 8 मार्च 2024 (10:20 IST)

जागतिक महिला दिन 2024 : महिला दिन का साजरा करतात, काय आहे या दिवसाचा इतिहास?

women
जागतिक महिला दिनाबद्दल तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, कधी माध्यमांमधून तर कधी आपल्या आसपासच्या लोकांच्या संभाषणातून. पण हा दिवस नक्की काय आहे? हा साजरा करायचा असतो की यादिवशी आंदोलन करायचं असतं. हा जागतिक पुरुष दिनासारखाच असतो का? जवळपास एका शतकाहून जास्त काळ 8 मार्च हा दिवस महिलांसाठी खास समजला जातो. पण का? क्लारा झेटकीन या महिलेने 1910 साली जागतिक महिला दिनाची सुरुवात केली. या दिवसाचा उगम कामगार चळवळीतून झाला. याचं बीज रोवलं गेलं ते 1908 साली जेव्हा 15 हजार महिलांनी न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर मोर्चा काढला. कामाचे कमी तास, चांगला पगार आणि मतदानाचा अधिकार अशा त्यांच्या मागण्या होत्या. यानंतर एका वर्षाने सोशालिस्ट पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाने पहिल्या राष्ट्रीय महिला दिनाची घोषणा केली. हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याची कल्पना पुढे आणली ती क्लारा झेटकीन या महिलेने. त्या साम्यवादी विचारसरणीच्या कार्यकर्त्या होत्या आणि महिला हक्कांच्या पुरस्कर्त्या. त्यांनी ही कल्पना सर्वप्रथम काम/नोकरी करणाऱ्या महिलांच्या परिषदेत कोपेनहेगनमध्ये 1910 साली मांडली होती. त्या परिषदेला 17 देशांमधून 100 महिला उपस्थित होत्या. सगळ्यांनी क्लारा यांची कल्पना एकमुखाने मान्य केली. त्यानुसार पहिला जागतिक महिला दिवस 1911 साली ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झरलँडमध्ये साजरा केला गेला होता. त्याची शताब्दी 2011 साली साजरी झाली. महिला दिवसाला संयुक्त राष्ट्रांची अधिकृत मान्यता 1975 साली मिळाली, तर प्रत्येक वर्षांची खास थीम स्वीकारायला सुरुवात झाली 1996 साली. पहिलं घोषवाक्य होतं – ‘भूतकाळ साजरा करताना भविष्याची धोरणं ठरवणं.’ सध्या जागतिक महिला दिन हा महिलांच्या विविध क्षेत्रातील प्रगतीचे मैलाचे दगड साजरे करण्याच्या उद्देशाने सर्वत्र साजरा केला जातो. तसंच या दिवशी अजूनही समाजात अस्तित्वात असलेल्या असमानतेविरोधात निदर्शनंही केली जातात.
 
8 मार्च हीच तारीख का?
क्लारां झेटकिन यांनी जेव्हा महिला दिवसाची कल्पना मांडली तेव्हा त्यांच्या मनात कोणतीही ठराविक तारीख नव्हती. ती तारीख ठरली 1917 साली. तेव्हा पहिलं महायुद्ध सुरू होतं आणि त्यादरम्यानच रशियन महिलांनी ‘भाकरी आणि शांतता’ अशी मागणी घेऊन संप पुकारला. चार दिवसांनी राजकीय उलथापालथ झाली, रशियन झारना पद सोडावं लागलं आणि त्यानंतर आलेल्या हंगामी सरकारनं महिलांना मतदानाचा अधिकार दिला. रशियात तेव्हा ज्युलियन कॅलेंडर वापरलं जात होतं. ज्युलियन कॅलेंडरप्रमाणे ज्या दिवशी महिलांनी संप पुकारला त्या दिवशी तारीख होती 23 फेब्रुवारी. ग्रेगोरियन कॅलेंडर (जे आज आपण सगळीकडे वापरतो) त्यानुसार ही तारीख होती 8 मार्च. त्यामुळेच त्या ऐतिहासिक संपाची आठवण म्हणून 8 मार्चला जागतिक महिला दिवस साजरा केला जातो.
 
या दिवशी जांभळे कपडे का घालतात?
महिला दिन सुरू झाला, त्यासुमारास अनेक देशांत महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. युकेमध्ये 1918 साली तर अमेरिकेत 1920 साली त्यासंदर्भातला कायदा पास झाला. ब्रिटनमध्ये महिलांना हा अधिकार मिळवून देण्यात विमेन्स सोशल अँड पॉलिटिकल युनियन या पक्षानं महत्त्वाचं योगदान दिलं. या संघटनेच्या ध्वजामध्ये जांभळ्या, हिरव्या आणि पांढऱ्या रंगांचा वापर करण्यात आला होता आणि हेच रंग महिला दिनाचं प्रतीक बनले.
जागतिक महिला दिनाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार “जांभळा रंग न्याय आणि प्रतिष्ठेचं प्रतीक आहे, हिरवा रंग आशेचं प्रतीक आहे तर पांढरा रंग शुद्धतेचं प्रतीक आहे. अर्थात शुद्धता ही संकल्पनाच तशी वादग्रस्त आहे.”
महिला हक्कांच्या आणि समानतेच्या लढ्याशी जांभळ्या रंगाचं नातं असल्यानंच हा रंग महिला दिनाचं एक प्रतीक बनला आहे.
 
जागतिक पुरुष दिवस असतो का?
अर्थातच. जागतिक पुरुष दिवस 19 नोव्हेंबरला साजरा केला जातो. पण याला अजून संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेली नाही. पण जगभरात 80 हून जास्त देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. ‘पुरुष जगासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी ज्या सकारात्मक गोष्टी करतात’ त्या साजऱ्या करण्याचा या दिवसाचा उद्देश असतो. याच्या आयोजकांचं म्हणणं आहे की पुरुषांच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्याबद्दल जागृती करणं, जे पुरुष सकारात्मक आदर्श नवीन पिढी पुढे उभे करतात त्यांना व्यासपीठ देणं आणि एकदंरच भिन्नलिंगी लोकांमधले आपापसातले संबंध सुधरवणं ही मुख्य कार्यं आहेत.
 
महिला दिन कसा साजरा केला जातो?
गेल्या वर्षी युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर जेव्हा युक्रेनमधून महिला आणि मुलं जागतिक महिला दिनाच्या दिवशी युरोपातल्या हंगेरी या राष्ट्रात पोचली तेव्हा त्याचं स्वागत फुलं देऊन करण्यात आलं. जागतिक महिला दिन हा रशियासकट अनेक देशांमध्ये राष्ट्रीय सुटीचा दिवस असतो. रशियात या काळात फुलांची विक्री चौपट होते. चीनमध्ये 8 मार्चला अनेक महिलांना कामाच्या ठिकाणी हाफ डे दिला जातो. इटलीमध्ये जागतिक महिला दिनाला फेस्टा डेला डोना असंही म्हणतात. या दिवशी महिलांना मीमोसाची फुलं दिली जातात. याची सुरुवात कधी झाली हे सांगता येणार नाही पण असं म्हणतात की दुसऱ्या महायुद्धानंतर रोममध्ये याची सुरुवात झाली. अमेरिकेत संपूर्ण मार्च महिना वूमन्स हिस्ट्री मंथ (महिलांच्या इतिहासाचा दिवस) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्राध्यक्षांकडून अमेरिकन महिलांच्या यशाचं कौतुक करणारं मानपत्र काढलं जातं.
 
यंदाच्या महिला दिनाची थीम काय?
2023 सालच्या महिला दिनासाठी संयुक्त राष्ट्रांची थीम – ‘डीजी ऑल : संशोधन आणि तंत्रज्ञानाचा वापर लिंगभाव समानतेसाठी’ अशी आहे. या थीमचा उद्देश आहे की जगभरात ज्या महिला आणि मुली तंत्रज्ञान आणि ऑनलाईन शिक्षणात जे योगदान देत आहेत ते ओळखून त्याचा यथोचित सन्मान करावा. यंदा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डिजिटल लिंग असमानतेमुळे महिला आणि मुलींच्या आयुष्यावर काय परिणाम होतो हेही शोधण्याचा प्रयत्न असेल. संयुक्त राष्ट्रांच्या एका अंदाजानुसार इंटरनेटचा अॅक्सेस नसल्याने कमी आणि मध्यम उत्पन्न गटातल्या देशांच्या जीडीपीला 2025 पर्यंत 1.5 ट्रिलीयन डॉलर्सचा फटका बसू शकतो. पण यंदा इतरही थीम आहेत. जागतिक महिला दिनाच्या वेबसाईटवर त्यांचा उल्लेख तुम्हाला आढळून येईल. यात असं म्हटलं की ‘महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं’ तसंच ‘महिलांबद्दल असलेल्या जुन्या विचारधारांना तोडणं, त्यांना कमी लेखलं जातं याकडे लक्ष वेधणं, आणि त्यांचा सर्वांगिण विकास होईल हे पाहाणं’ अशाही काही थीम यंदा साजऱ्या केल्या जातील.
 
या दिवसाची गरज काय?
गेल्या काही वर्षांत अफगाणिस्तान, इराण, युक्रेन आणि अमेरिकेसारख्या देशांमधल्या महिला आपल्या हक्कांसाठी लढताना दिसत आहेत. अफगाणिस्तानाता तालिबान पुन्हा सत्तेत आल्यामुळे महिलांच्या शिक्षणात बाधा आली आहे, त्यांना कॉलेजमध्ये जाता येत नाही, नोकरी करता येत नाही, पुरुष सोबत्याशिवाय लांबवरचा प्रवास करता येत नाही, तसंच घराबाहेर पडल्यानंतर त्यांनी आपला चेहरा झाकावा असे आदेश आहेत. इराणमध्य 22-वर्षीय महसा अमीनला केस न झाकल्यामुळे इराणच्या पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर झालेल्या मारहाणीत तिच मृत्यू झाला. त्यानंतर इराणमध्ये आंदोलनांची लाट उठली आहे. महिला आणि पुरुष कार्यकर्ते एकत्र येऊन महिला हक्कांची तसंच राजकीय नेतृत्व बदलण्याची मागणी करत आहेत. ‘महिला, आयुष्य, स्वातंत्र्य’ या तीन शब्दांवर जोर देत, घोषण देत आंदोलनकर्त आपल्या हक्कांची मागणी करत आहेत. प्रशासनाने या लोकांना दंगलखोर म्हटलं आहे आणि या आंदोलनात जवळपास 500 हून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. युद्धानंतर युक्रेनमधल्या महिलांना आपल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाला सामोरं जावं लागत आहे. गेल्या वर्षी अमेरिकेसारख्या देशाच्या सुप्रीम कोर्टाने महिलांना गर्भपाताचा हक्क नाकारला. त्यामुळे अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर निदर्शनं आणि आंदोलनं झाली. अनेक अमेरिकन महिला गर्भपातासाठी मेक्सिकोत गेल्या कारण त्या देशात 2021 साली गर्भपात कायद्याने गुन्हा नाही असा निर्वाळा देण्यात आला होता. गेल्या काही वर्षांत काही सकारात्मक बदलही दिसून आले. महिला हक्क संस्थांनी सलग 10 वर्षं दिलेल्या लढ्यानंतर नोव्हेंबर 2022मध्ये युरोपियन संसदेने कायदा केला की पब्लिकली ट्रेडेट कंपन्यांच्या बोर्डांवर जास्तीत जास्त महिलांना प्रतिनिधित्व मिळेल. 2026 पर्यंत हे करण्याचे आदेश दिलेले आहेत. या प्रकरणी युरोपियन युनियनने म्हटलं की, “अनेक महिला उच्चपदांसाठी लायक आहेत. या नव्या कायद्याने त्यांना संधी मिळेल,” अर्मेनिया आणि कोलंबियासारख्या देशांमध्ये पालकत्व रजेच्या कायद्यांमध्ये सुधारणा केली गेली. स्पेनमध्ये मासिक पाळी आरोग्य तसंच गर्भपातासाठी रजेची तरतूद केली गेली. बिजिंग 2022 मध्ये झालेल्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच 45 टक्के महिला खेळाडू होत्या. 2023 साली महिलांचा फिफा वर्ल्ड कप होणार आहे. यात 36 टीम भाग घेतील. या स्पर्धेच्या आधी अमेरिकेच्या फुटबॉल महासंघाने एका करारावर सही करत म्हटलं की आता महिला आणि पुरुष खेळाडूंचं मानधन सारखं असेल.
 
Published By- Dhanashri Naik