कैलास मानसरोवर यात्रा, 1500हून अधिक भारतीय अडकले
कैलास मानसरोवर यात्रेवर निघालेले 1500हून अधिक भारतीय नागरिक मुसळधार पावसामुळे नेपाळमध्ये अडकले आहेत. नेपाळमधील भारतीय दूतावासाने जाहीर केलेल्या यात्रेकरूंच्या यादीनुसार, भारतातून गेलेले 525 यात्रेकरू सिमीकोट इथे, 550 हिल्सा इथे तर तिबेटच्या मार्गावर 500 यात्रेकरू अडकले आहेत.
कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या 104 यात्रेकरूंना आतापर्यंत वाचवण्यात यश आलं आहे. मात्र आंध्र प्रदेशच्या एका यात्रेकरूचा मृत्यू झाला आहे. या यात्रेकरूचा मृतदेह हाती लागला असून शवविच्छेदनानंतर त्यांचं पार्थिव त्यांच्या गावी रवाना करण्यात येईल. दुसरीकडे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज संपूर्ण परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. भारतीय दूतावासाने नेपालगंज आणि सिमीकोटमध्ये आपले प्रतिनिधी तैनात केले आहेत. बचाव पथकाला सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच यात्रेकरूंच्या भोजन आणि राहण्याची व्यवस्था प्रशासनानं केली आहे.