बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 15 जानेवारी 2022 (20:24 IST)

विमानात जन्मलं 'मिरॅकल' बाळ, डॉक्टरांनी विमानप्रवासात केली महिलेची प्रसुती

युगांडाला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये एका गर्भवती महिलेची डिलीव्हरी झाली आणि एक तान्हुली सुरक्षितपणे या जगात आली. विमानतच ही डिलीव्हरी करणाऱ्या कॅनडाच्या डॉक्टरांनी आनंद व्यक्त केला.
डॉक्टर आयेशा खातीब टोरंटो विद्यापीठात प्राध्यापिका आहेत. कतार एअरवेजच्या दोहा ते एंटेब फ्लाईटमध्ये प्रवास करत असताना विमानात एक घोषणा करण्यात आली.
युगांडामधील एक स्थलांतरीत गर्भवती कामगार सौदी अरेबियाहून घराच्यादिशेने प्रवास करत असताना त्यांना प्रसुती वेदना सुरू झाल्या. ते त्यांचं पहिलं बाळंतपण होतं.
हे बाळ अवघं 35 आठवड्यांचं होतं. मात्र तरीही जन्मामंतर ते सुदृढ होतं. या बाळाचं नाव डॉक्टरांच्या नावावरून 'मिरॅकल आयेशा' असं ठेवण्यात आलंय.
टोरंटोमधल्या कोरोनाच्या अत्यंत थकवून टाकणाऱ्या कामाच्या दगदगीनंतर डॉक्टर खातीब या त्यांच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी आणि विश्रांतीसाठी निघाल्या होत्या.
मात्र, जेव्हा इंटरकॉमवर विमानात एखादा डॉक्टर आहे का? अशी विचारणा करण्यात आली त्यावेळी त्यांनी जराही मागं-पुढं पाहिलं नाही.
"मला पेशंटच्या भोवती लोकांची गर्दी गोळा झालेली दिसत होती," असं डॉक्टर खातीब बीबीसी बरोबर बोलताना म्हणाल्या. हार्ट अटॅकसारखी एखादी आणीबाणीची परिस्थिती असेल असं त्यांना वाटलं होतं.
"मी जवळ जाऊन पाहिलं तर सीटवर एक महिला झोपलेली होती. तिचं डोकं आतल्या बाजूला आणि पाय खिडकीकडे होते. त्यावेळी बाळ बाहेर येऊ लागलं होतं!"
डॉ. खातीब यांना विमानातील इतर दोन प्रवाशांनी मदत केली. त्यापैकी एक परिचारिका आणि एक डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स संस्थेचे बालरोगतज्ज्ञ होते.
बाळ जोरानं रडत होतं, असं त्या म्हणाल्या. बाळाची प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यांनी आणखी सखोल तपासणीसाठी ते बाळ बालरोगतज्ज्ञांकडे पाठवलं.
"मी बाळाकडं पाहिलं ती अगदी स्वस्थ होती. तसंच मी आईकडं पाहिलं तर तीही ठीक होती,"असं डॉ. खातीब म्हणाल्या.
"त्यामुळं मी लगेचच अभिनंदन मुलगी झाली असं म्हटलं. त्यानंतर लगेचच विमानातील सर्व प्रवाशांनी टाळ्या वाजवल्या. तेव्हा मला अचानक लक्षात आलं की, आपण विमानात आहोत आणि सगळे आपल्याकडे पाहत आहेत."