शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: इस्लामाबाद , रविवार, 19 फेब्रुवारी 2017 (21:28 IST)

हाफिज सईद दहशतवादीच!

पाकिस्तानच्या पंजाब सरकारने मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात उद दावाचा म्होरक्या हाफिज सईद हा दहशतवादी आहे, असे अप्रत्यक्षरित्या मान्य केले आहे. 
  
'पंजाब सरकारने हाफिज सईदसह त्याच्या काझी काशिफ नामक एका विश्‍वासू सहकार्‍याचा दहशतवादविरोधी कायद्याच्या (एटीए) चौथ्या यादीत समावेश केला आहे,' असे वृत्त स्थानिक 'डॉन न्यूज'ने शनिवारी दिले आहे. 'उपरोक्त दोघांसह फैसलाबादेतील अब्दुल्लाह ओबैद तथा मरकज ए तैबा मुरिदके येथील जफर इक्बाल व अब्दूर रहमान अबिद या तिघांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. 'एटीए' कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आलेल्या सईद व अन्य चौघांना यापूर्वीच जागतिक रोषामुळे नजरकैदेत टाकण्यात आले आहे. हे पाचही जण 'जमात उद दावा' (जेयूडी) आणि 'फलाह ए इन्सानियत'चे (एफआयएफ) सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश पाकच्या गृहमंत्रालयाने दहशतवादविरोधी विभागाला दिले होते,' असे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे सईद आणि जेयूडी व 'एफआयएफ'च्या अन्य ३७ नेत्यांची नावे यापूर्वीच एक्झिट कंट्रोल यादीत (ईसीएल) टाकण्यात आलेत. त्यामुळे त्यांना देश सोडणेही शक्य नाही. विशेषत: एटीए कायद्यांतर्गत कारवाई झालेल्या व्यक्तींना प्रवास व सुरक्षेसंबंधीच्या अनेक निर्बंधांना सामोरे जावे लागते. या निर्बंधांचे उल्लंघन करणार्‍याला ३ वर्षांची कैद किंवा दंड अथवा दोन्ही प्रकारच्या शिक्षेला सामोरे जावे लागते. गत आठवडाभरात पाकिस्तानात झालेल्या सलग ८ अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर हाफिज सईदवर कारवाई करण्यात आली आहे.
 
दरम्यान, गत गुरुवारी रात्री सिंध प्रांतातील एका दग्र्यावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात १00 हून अधिक जण ठार झालेत. तद्नंतर चवताळलेल्या पाक सरकारने अतिरेक्यांची धरपकड करून त्यांच्यावर लष्करी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.