मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 13 एप्रिल 2022 (12:09 IST)

न्यूयॉर्कमध्ये ब्रुकलिन मेट्रो स्टेशनात गोळीबार, प्रत्यक्षदर्शींनी काय पाहिलं?

अमेरिकेत न्यूयॉर्क शहरात ब्रुकलिन सबवे स्टेशनमध्ये गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार सनसेट पार्क इथे 36 स्ट्रीट स्टेशनात सकाळी साडेआठ वाजता हल्ला झाला आहे. या हल्ल्यात किमान 16 जण जखमी झाले आहेत.
 
या भागापासून दूर राहण्याचा सल्ला स्थानिक प्रशासनाने नागरिकांना दिला.
 
गोळीबारानंतर धुराचे लोट उठल्याने मदतयंत्रणांनी घटनास्थळी पोहोचल्या स्टेशनात अनेक जण रक्ताळलेल्या स्थितीत दिसत असलेले फोटो समोर आले आहेत.
 
स्थानिक प्रसारमाध्यमात सनसेट पार्कमध्ये 36 व्या स्ट्रीट स्टेशनमध्ये स्थानिक वेळेनुसार मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता हा गोळीबार झाला.
 
एनसीबी न्यूज पोलिसांच्या हवाल्याने सांगितलं की सकाळी जेव्हा गर्दीची वेळ होती संशयित हल्लेखोरांनी स्मोक बाँब फेकला आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
 
या घटनेत 10 जणांना गोळ्या लागल्या. त्यापैकी 5 जण गंभीर जखमी आहेत. गोळीबाराने निर्माण झालेल्या धुरामुळे आणि चेंगराचेंगरीमुळे अनेक जण जखमी झाले आहेत.
 
न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक एडम्स यांच्या प्रवक्त्यांनी न्यूयॉर्क च्या लोकांना स्वत:ची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
 
प्रत्यक्षदर्शींनी काय पाहिलं?
सैम कारकामो यांनी असोसिएटेड प्रेसला (AP) सांगितलं, "माझ्या ट्रेनचा दरवाजा जेव्हा उघडला तेव्हा सगळीकडे धूर झाला होता आणि लोक किंचाळत होते."
 
दार उघडताच धुराचे लोट आत आल्याचंही त्यांनी सांगितलं.
 
तर एका दुसऱ्या प्रत्यक्षदर्शीने न्यूयॉर्क पोस्टला सांगितलं की इतका गोळीबार झाला की किती गोळ्या चालवल्या त्याची गणतीच नाही.
 
त्यांनी सांगितलं की आधी हल्लेखोराने आधी एक सिलेंडर फेकलं. आधी असं वाटलं की तो सब वे चाच कर्मचारी असावा.
 
न्यूयॉर्कच्या अग्निशमन विभागाने बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार त्यांना स्टेशनमध्ये धूर झाल्याची माहिती मिळाली होती. मात्र जेव्हा अधिकारी घटनास्थळावर पोहोचले तेव्हा अनेक लोक त्यांनी जखमी अवस्थेत सापडले.
 
स्टेशनच्या आवारात कोणत्याही स्फोटक मिळाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. आधी अशी स्फोटकं मिळाल्याची माहिती समोर आली होती.
 
राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना अटर्नी जनरल मेरिक गारलँड यांनी या घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
 
गेल्या दोन वर्षांत अमेरिकेतल्या अनेक शहरात अशा प्रकारच्या हिंसाचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.