गुरूवार, 3 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : रविवार, 25 ऑगस्ट 2024 (16:35 IST)

तेलाचं राजकारण, 45 कोटी डॉलर्सचं तैलचित्र आणि सत्तेचा थरार; सौदीच्या युवराजाच्या उदयाची थरारक कहाणी

Mohammed bin Salman
2015 चा जानेवारी महिना. सौदी अरेबियाचे राजे अब्दुला 90 व्या वर्षी रुग्णालयात मृत्यूशय्येवर आपल्या अखेरच्या घटका मोजत होते.मृत्यूनंतर त्यांचे सावत्र भाऊ सलमान सौदीचे नवे राजे बनण्यासाठी सज्ज होते. त्याचवेळी सलमानचे लाडके सुपुत्र मोहम्मद बिन सलमान सगळी सत्ता हस्तगत करण्याकरिता हात पुढे सरसावत होते.
 
सौदी अरेबियाचे युवराज त्यांच्या नावाच्या सुरुवातीच्या अक्षरांवरून एमबीएस (MBS) म्हणून प्रसिद्ध आहेत.
एमबीएस त्यावेळी फक्त 29 वर्षांचे होते. पण इतक्या कमी वयातही त्यांची महत्त्वाकांक्षा अमाप होती. एकहाती सत्ता काबीज करून आपल्या मनाप्रमाणे राज्य हाकण्याची मोठी तयारी त्यांनी आधीच करून ठेवली होती.
सौदीच्या इतिहासात कधी कल्पनाही न केल्या गेलेल्या योजना घेऊन ते राज्य चालवायला सज्ज झाले होते. पण ऐनवेळी आपल्याच राजघराण्यातील लोक खोडा घालतील, प्रसंगी काटा काढतील, याची त्यांना भीती होती.
 
त्यामुळे त्याच महिन्यातील एका मध्यरात्री त्यांनी राजघराण्यातील एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यासोबत खासगी बैठक बोलावली. त्यांचा विश्वास संपादन करून सत्ताग्रहण करण्याचा मार्ग सुकर करावा, असा युवराजांचा हेतू होता.
 
ज्याच्यासोबत बैठक बोलावली होती, त्या सुरक्षा अधिकाऱ्याचं नाव होतं साद अल-जाब्री.
 
बैठकीच्या खोलीत शिरण्याआधी जाब्री यांना त्यांचा मोबाईल फोन बाहेरच्या टेबलावर ठेवण्यास सांगितलं गेलं. खुद्द एमबीएस यांनीही आपला फोन बाहेरच ठेवला होता.
 
बैठकीच्या खोलीत फक्त ते दोघेच हजर होते. राजवाड्यात जागोजागी गुप्तहेर पेरल्याची शंका नव्हे तर खात्रीच युवराजांना होती. त्यामुळे ते कायमच जास्त सजग असायचे. खोलीत आल्यावर त्यांनी तिथल्या लँडलाईन टेलिफोनचंही सॉकेट काढून फेकलं. मगच बैठकीला सुरुवात झाली.
निराशेच्या गर्तेत अडकलेल्या राज्याला या दलदलीतून बाहेर काढत जागतिक पातळीवर सौदीचा नावलौकिक वाढवण्यासाठी एमबीएस यांनी काय योजना तयार केली आहे, यावर आमच्या गप्पा झाल्याचं जाब्री सांगतात.
 
तेलावरील अवलंबित्व कमी करत सौदीच्या अर्थव्यवस्थेला स्वायत्त आणि सर्वसमावेशक बनवण्याची मोहम्मद बिन सलमान यांची इच्छा होती. त्यासाठी आरामको या सरकारी तेल कंपनीतील गुंतवणूक काढून घेऊन तो पैसा सिलीकॉन व्हॅलीमध्ये गुंतवण्याची योजना युवराजांनी तयार केली होती. विशेष म्हणजे त्यावेळी आरामको ही जगातील सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्यांमधील एक होती.
 
सौदी अर्थव्यवस्थेतील हे अब्जो रुपये सिलीकॉन व्हॅलीमधील उबरसारख्या तांत्रिक कंपन्यांमध्ये गुंतवायचा सलमान यांचा मानस होता.
 
शिवाय, सौदी अरेबियातील महिलांवरील नोकरीची बंदी उठवत देशात 60 लाख नवीन रोजगार निर्माण करण्याचा आपला इरादाही सलमान यांनी जाब्रींसमोर बोलून दाखवला.
 
युवराजांची योजना आणि उत्साह पाहून अचंबित झालेल्या जाब्री यांनी त्यांना एकच सवाल केला - “ही तुमची महत्वकांक्षा कुठे जाऊन थांबणार आहे?"
 
या प्रश्नावर युवराज सलमान यांनी उलट प्रतिप्रश्न करून उत्तर दिलं - “अलेक्झांडर द ग्रेटचं नाव ऐकलंय?"
 
या एकाच प्रश्नात (की उत्तरात?) एमबीएस यांनी भविष्याची चाहूल दिली होती.
 
एमबीएस आणि जाब्री यांची चर्चा शेवटी संपली.
 
अर्ध्या तासासाठी बोलवलेली ही मध्यरात्रीची बैठक तीन तासांपेक्षा जास्त वेळ चालली. बैठक आटपून खोली सोडल्यावर जाब्री यांनी आपला मोबाईल उघडला. सहकाऱ्यांचे अक्षरशः शेकडो मिस्ड कॉल येऊन गेलेले होते. इतका वेळ अचानक गायब झालेल्या जाब्री यांच्या सुरक्षेच्या चिंतेनं हे त्यांचे सहकारी ग्रासले होते.
 
जगाला तेल पुरवणाऱ्या सौदी अरेबियाच्या गादीवर या युवराजाने कसा कब्जा केला, याची गोष्ट मोठी रंजक आणि तितकीच थरारक आहे.
 
युवराज पद बळकावण्यासाठी त्यांनी अक्षरशः आपल्या शेकडो प्रतिस्पर्धींना साम-दाम-दंड-भेद वापरून मात दिली होती.
गेल्या वर्षभरापासून आमची एक विशेष टीम एमबीएसवर माहितीपट बनवण्याची तयारी करत आहे. त्याचाच भाग म्हणून सौदी युवराज यांच्याबद्दल जमेल तितकी माहिती गोळा केली जात आहे. त्यासाठी एमबीएस यांचे सौदीतील मित्र, शत्रू, हितचिंतक आणि टीकाकार अशा सगळ्यांच्या मुलाखती आम्ही घेतल्या.
 
सोबतच पाश्चात्य देशांमधील वरिष्ठ गुप्तहेर आणि अधिकाऱ्यांसोबतही गप्पा मारल्या. जेणेकरून सौदीच्या युवराजांचा जीवनपट तुमच्यासमोर उलगडता येईल.
 
बीबीसीने बनवलेल्या माहितीपटात आणि तुम्ही वाचत असलेल्या या लेखातून मोहम्मद बिन सलमान यांच्यावर काही आरोप आणि टीका झालेल्या आहेत.
 
निष्पक्ष आणि सर्वसमावेशक राहण्याच्या हेतूने या आरोपांना प्रत्युत्तर देण्याची संधीही आम्ही त्यांना देऊ केली. पण सौदी सरकारने आमच्या या माहितीपटासाठी कुठलीही प्रतिक्रिया अथवा प्रत्युत्तर देण्यास नकार दिला.
साद अल-जाब्री हे कोणे एके काळी सौदी सुरक्षा यंत्रणेत उच्चपदस्थ अधिकारी होते. अधिकारी असताना अगदी अमेरिकेची गुप्तचर संघटना सीआयए (CIA) आणि ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा एमआय-6 च्या प्रमुखांसोबत त्यांची थेट उठबस असायची.
 
सौदी सरकारमधील त्यांचा प्रभाव आणि दरारा वादातीत होता. पण नंतर सौदी सरकारनेच जाब्री यांना घरचा आहेर दिला.
 
आज ते सौदी सरकारचे पहिल्या क्रमांकाचे टीकाकार आणि ज्या यंत्रणेत ते वरिष्ठ अधिकारी होते त्यांच्याच यादीतील प्रमुख गुन्हेगार आहेत.
 
सौदी सरकार आणि राजघराण्याची सगळी अंतर्गत इत्यंभूत माहिती त्यांना आहे. सौदी अरेबियाच्या युवराजावर उघडपणे टीका करणाऱ्या आणि टीका करून अजूनही जिवंत असणाऱ्या मोजक्या लोकांपैकी ते एक आहेत.
 
त्यांनी आम्हाला दिलेल्या सविस्तर मुलाखतीत सौदी राजघराण्यातील अनेक गुपितांचा भांडाफोड केला. सौदी सरकारचा कारभार आणि तिथली यंत्रणा आतून पाहिलेली, अनुभवलेली असल्याने त्यांनी केलेले खुलासे हे जितके महत्वाचे तितकेच विस्फोटकही आहेत.
 
मोहम्मद बिन सलमान यांना अनेक वर्षांपासून वैयक्तिकरित्या ओळखत असलेल्या लोकांशी आम्ही प्रत्यक्षात बोललो.
 
2018 साली केलेली अमेरिकन पत्रकार जमाल खशोगी यांची हत्या असो की येमेनविरोधात सुरू केलेलं नृशंस युद्ध एमबीएस हे आधीपासून त्यांच्या धक्कादायक आणि निर्दयी कार्यपद्धतीसाठी (कु)विख्यात आहेत.
 
तर अशा या वादग्रस्त सौदी युवराजांचा आजवरचा तुलनेनं अंधारात राहिलेला प्रवास आम्ही या माहितीपटातून समोर आणलाय.
 
मोहम्मद बिन सलमान यांचे वडील वार्धक्यामुळे गेल्या बऱ्याच वर्षांपासून पडद्यामागेच आहेत. इस्लामची जन्मभूमी असलेल्या आणि जगाला तेल पुरवणाऱ्या या सौदी साम्राज्याचे आजचे नायक किंबहुना सर्वेसर्वा खऱ्या अर्थानं 38 वर्षीय मोहम्मद बिन सलमानच आहेत. त्यांचे वडील हे फक्त नावापुरते प्रमुख उरले आहेत.
साद अल-जाब्री यांना वैयक्तिक बैठकीत सांगितलेल्या अनेक क्रांतीकारी योजना युवराजपद मिळाल्यावर एमबीएस यांनी प्रत्यक्षात राबवल्या.
या महत्वकांक्षी योजना राबवण्याबरोबरच अनेक नकारात्मक गोष्टींमुळे सुद्धा एमबीएस कायम चर्चेत राहिलेले आहेत.
 
मग ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असो की भरमसाठ मृत्यूदंडाच्या सुनावण्या अथवा महिला अधिकारांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा तुरूंगवास, मानवाधिकारांचं उल्लंघन केल्याचा आरोप मोहम्मद बिन सलमान यांच्यावर सातत्यानं होत आलेला आहे.
 
अडथळ्यांनी भरलेली सुरुवात
सौदी अरेबियाचे जे पहिले राजे होते, त्यांना एकूण 42 मुलं झाली. एमबीएस यांचे वडील सलमान हे त्यापैकीच एक.
 
राजाचा मुकुट हा पारंपारिकरित्या कायम वरिष्ठ भावंडांच्या शिरावरच सजलेला असायचा. पण 2011 आणि 2012 साली दावेदार असलेल्या दोन मोठ्या भावंडांचा अचानक मृत्यू झाल्याने एमबीएस यांचे वडील सलमान यांची सौदीच्या गादीवर वर्णी लागली.
 
शीतयुद्धाच्या काळात ज्या पद्धतीने पश्चिमात्य गुप्तचर यंत्रणा सोव्हियत रशियातील बदलत्या सत्ताकारणाचा मागोवा घेत असत तसंच सौदीबाबत आज घडतंय. सौदी राजघराण्यातील सत्तासंघर्ष या पाश्चात्त्य यंत्रणा जवळून पाहत असतात.
 
सौदीचा पुढचा राजा कोण असेल, याचा छडा लावत असतात. पण इतक्या तरुण वयात मोहम्मद बिन सलमान सौदी अरेबियाच्या गादीवर राज्य करतील, याचा अंदाज या पाश्चात्य गुप्तचर यंत्रणांनाही त्यावेळी आला नव्हता. असा कोणी दावेदार आहे हे त्यांच्या खिजगणतीतही नव्हतं.
 
“एमबीएसचं बालपण आणि तारूण्य हे तुलनेनं पडद्यामागेच झाकोळलं गेलं. तो कोणाच्या नजरेत येईल अशी कुठली गोष्ट तेव्हा घडली नाही. मुळात एमबीएस सौदीचा पुढचा सत्ताधारी असेल हे कोणाच्या ध्यानीमनीही नव्हतं,” असं सर जॉन सेव्हर्स सांगतात. सर जॉन सेव्हर्स 2014 पर्यंत एमआय 6 चे प्रमुख होते.
सौदी राजघराण्याचा हा युवराज ज्या वातावरणात लहानाचा मोठा झाला, ते पाहता त्यांच्यात असलेला एक प्रकारचा अहंकार साहजिकच म्हणावा लागेल.
राजघराण्यात जन्माला आल्यामुळे काहीही केलं तरी आपल्याला सगळं माफ आहे, अशी धारणा त्यांच्यात लहानपणापासून विकसित होत गेली.
आज गादी चालवताना परिणामांची चिंता न करता ते घेत असलेल्या अतार्किक आणि धोकादायक निर्णयांकडे या अनिर्बंध संगोपनाच्या पार्श्वभूमीतून पाहता येईल.
 
पौगंडावस्थेत असताना मोहम्मद बिन सलमान यांच्यासोबत घडलेली ही घटना येणाऱ्या काळाची नांदीच म्हणावी लागेल.
 
पिढीजात मालमत्तेच्या मालकी हक्कावरून सुरू झालेला वाद न्यायालयात पोहोचल्यावर अवघ्या 17-18 वर्षांच्या सलमान यांनी त्यावेळी थेट न्यायाधीशाला धमकावण्यासाठी बंदुकीची गोळी असलेलं पाकीट त्यांच्या टेबलावर पाठवलं होतं, अशी एक आख्यायिका आहे.
 
“आधीपासूनच त्याच्यामध्ये एक प्रकारचा निर्दयीपणा ठासून भरलेला होता. कोणी आपल्या विरोधात गेलेलं त्याला चालायचं नाही. त्यामुळेच की काय आधीचे कुठलेही सौदी राजे करू शकले नाहीत असे धाडसी आणि प्रसंगी जनमता विरोधी जाणारे निर्णय एमबीएस बेधडकपणे घेताना दिसतात,” असं एक निरीक्षण सर जॉन सेव्हर्स यांनी आमच्याशी बोलताना नोंदवलं.
मोहम्मद बिन सलमान यांच्या या धाडसी आणि बेदरकार कार्यपद्धतीचे काही फायदे देखील पाहायला मिळतात.
 
याचंच एक उदाहरण आहे सौदीमधून बाहेरील मदरसे आणि इतर धार्मिक स्थळांना जो निधी पुरवला जायचा तो एमबीएस यांनी सत्तेत आल्यावर थांबवला. ही धार्मिक स्थळं इस्लामिक जिहादी दहशतवादाचे अड्डे बनले होते, असा त्यांचा दावा होता.
त्यांना पुरवली जाणारी ही आर्थिक रसद तोडल्याचा मोठा फायदा पाश्चात्य जगाला झाला. पाश्चात्य जगाला असलेला दहशतवादाचा धोका यामुळे बऱ्यापैकी कमी झाला.
 
मोहम्मद बिन सलमानची आई फाहदा ही बेडूअन नावाच्या आदिवासी जमातीतून येते. वडील सलमान यांच्या चार पत्नींपैकी फहादा ही सर्वात लाडकी पत्नी होती.
एमबीएस यांच्या वडिलांना फार आधीपासून व्हस्क्युलर डिमेन्शन (vascular dementia) नावाचा दुर्धर आजार सुरू झाला होता.
या आजारामुळे त्यांची स्मरणशक्ती हळूहळू कमजोर होत गेली. त्यामुळे वरचेवर राजकारभार हाकणं त्यांना जड जाऊ लागलं. तेव्हा मदतीसाठी ते पहिल्यांदा एमबीएसकडेच वळले, असं पाश्चात्य देशातील परकीय धोरणांचे अभ्यासक व अधिकारी मानतात.
 
अनेक सनदी अधिकारी सलमान यांच्यासोबतच्या बैठकीत त्यांच्या सोबतीला एमबीएस देखील हजर असल्याची आठवण सांगतात.
बैठकीत राजा पुढे काय बोलेल, हे युवराजच त्यांना आयपॅडवरून सांगत असायचे, ही गोष्ट या सनदी अधिकाऱ्यांच्या नजरेतून सुटली नाही. त्यामुळे एका अर्थाने बऱ्याच काळापासून सौदीचा कारभार आणि सगळे निर्णय एमबीएसच घेत आलेले आहेत, असं म्हणता येईल.
लॉर्ड किम डेरोच यांनीसुद्धा हीच गोष्ट बोलून दाखवली.
तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीचे सदस्य म्हणून काम करताना अशा अनेक बैठकींना डेरोच यांनी हजेरी लावली होती.
 
“आता पुढचं वाक्य काय बोलायचं हे एमबीएस वडिलांना आयपॅडवर लिहून पाठवयाचे. मग आपल्या आयपॅडवर आलेला तो संदेश आपली प्रतिक्रिया म्हणून सलमान वाचून दाखवायचे, अशी शंका मला अनेक वेळा आली,” असं डेरोच सांगतात.
आपल्या वडिलांना गादीवर बसवण्यासाठी युवराज इतके उतावीळ झाले होते की त्यावेळचे राजे म्हणजे स्वतःचे काका अब्दुलांची हत्या करायचा विचार एमबीएस यांनी सूचवला होता, असं म्हणतात.
त्यासाठी खास रशियातून एक विषबाधा करणारी अंगठीदेखील आणायची योजना मोहम्मद बिन सलमान यांनी आखली होती.
साद अल - जाब्री या घटनेचे साक्षीदार आहेत. काकांचा काटा काटायची योजना युवराजांनी त्यांच्यासमोरच मांडली होती.
 
आता ते हे खरंच करणार होते की फक्त दबावतंत्राचा तो एक भाग होता, हे जाब्री यांना खात्रीनं सांगता आलं नाही.
पण “आम्ही ही योजना त्यांच्या सांगण्यानुसार प्रत्यक्षात राबवायला सुरुवात केलीच होती," असं जाब्री म्हणतात.
एमबीएस हा कट रचत असल्याची एक गुप्त चित्रफीत देखील आपण पाहिल्याचा दावा त्यांच्या एका माजी वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने आमच्याजवळ केला. त्यामुळेच पुढच्या काही काळासाठी न्यायालयातून आणि राजाशी हात मिळवायला देखील एमबीएस यांच्यावर बंदी घालण्यात आली होती.
 
पण हा कट प्रत्यक्षात उतरवण्याआधीच राजाचं नैसर्गिक कारणानं निधन झालं. 2015 ला एमबीएस यांचे वडिल सलमान गादीचे वारसदार बनले.
 
एमबीएस यांची संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. लागलीच कुठलाही वेळ न दवडता मोहम्मद बिन सलमान यांनी मग येमेन विरूद्ध युद्धाची घोषणा केली.
 
येमेन युद्ध
संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पुढच्या दोनच महिन्यात युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी आखाती देशांची युती स्थापन करून हुती बंडखोरांविरोधात युद्ध पुकारलं.
या हुती बंडखोरांनी पश्चिम येमेनवर ताबा मिळवला होता. आपला प्रादेशिक शत्रू इराण हुती बंडखोरांना रसद पुरवत असल्याची एमबीएसला शंका होती. त्यामुळे इराणचा वचपा काढण्यासाठी एमबीएसने हे युद्ध सुरू केलं. या युद्धामुळे येमेनची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली.
या भीषण युद्धामुळे येमेनवर अभूतपूर्व संकट ओढावलेलं आहे. येमेनमधली जनता आजही उपासमारीने ग्रस्त आहे.
“युद्धात उतरण्याचा निर्णय काही शहाणपणाचा नव्हता,” असं सर जॉन जेन्किन्स म्हणतात. येमेन युद्धाला सुरुवात झाली, तेव्हा जेन्किन्स ब्रिटनचे राजदूत होते.
 
अमेरिकन लष्करातील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने आम्हाला सांगितलं की, “फक्त 12 तास आधी त्यांना युद्धाची पूर्वसूचना दिली गेली. इतक्या तातडीने ऐनवेळी युद्ध पुकारण्याचा प्रघात नसतो.”
हे युद्ध पुकारून एका रात्रीत युवराज एमबीएस सौदीचे राष्ट्रीय नायक बनले. पण आपल्या कार्यकाळात आजतागायत एमबीएसने ज्या अक्षम्य धोरणात्मक चुका केलेल्या आहेत, येमेन युद्ध ही त्यातली पहिली चूक होती, हे खुद्द एमबीएस यांचे अनेक मित्र व हितचिंतक मान्य करतात.
 
ज्या पद्धतीने सौदीची धोरणं राबवली जात होती, त्यातून एमबीएस यांचा धसमुसळा स्वभाव आणि अताताईपणा समोर येत होता.
संयम आणि सार्वमतावर आधारलेली पारंपारिक निर्णय पद्धती टांगणीला लावून मनाला वाटेल तसे तडकाफडकी निर्णय घ्यायला एमबीसने सुरूवात केली.
प्रसंगी आपलाच मित्रराष्ट्र असलेल्या अमेरिकेचा दबाव झुगारून स्वतःचा वेगळा दबदबा निर्माण करण्याचा त्याचा मानस होता.
 
सौदी आणि अमेरिका या भागीदारीत दुय्यम खेळाडू बनून खेळणं एमबीएस यांना मान्य नव्हतं.
एमबीएसच्या युद्धखोरीवर टीका करताना जाब्री यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. येमेन युद्ध सुरू होताना कागदोपत्री का होईना वडिल सलमान राज्याचे प्रमुख होते.
तेव्हा एमबीएसने आदेशाच्या राजपत्रावर वडिलांची खोटी सही मारून सैन्याला युद्धाच्या आरोपात उतरवलं, असा दावा जाब्री करतात.
व्हाईट हाऊसमध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असलेल्या सुझन राईस यांच्यासोबत जाब्री यांनी चर्चा केली होती. येमेनमध्ये युद्ध सुरू करायला अमेरिकन सरकार फारसं उत्सुक नव्हतं.
त्यामुळे एमबीएस यांनी युद्ध सुरू केल्यास हवाई हल्ल्याशिवाय इतर कुठल्याही मदतीची अपेक्षा आमच्याकडून ठेवू नका, असा स्पष्ट इशाराच राईस यांनी दिल्याचं जाब्री सांगतात.
पण एमबीएस युद्ध सुरू करायला इतके उतावीळ झाले होते की त्यांनी अमेरिकेच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून येमेनमध्ये आपलं सैन्य घुसवलं.
 
“येमेनच्या भूमीवर सैन्य उतरवण्यास राजाने होकार कसा दिला, याचंच आम्हाला आश्चर्य वाटत होतं. कारण असा अताताई युद्धखोरपणा त्यांच्याकडून अपेक्षित नव्हता. नंतर राजपत्रावर खोटी सही केली गेल्याचं समोर आल्यावर सगळं चित्र स्पष्ट झालं. राजाची मानसिक स्थिती वयोमानानुसार वरचेवर बिघडत चालली होती आणि त्याचाच फायदा उठवून एमबीएसनं आपली युद्धाची खुमखुमी भागवली,” असा सरळ आरोप जाब्री करतात.
 
आणि जाब्री करत असलेला हा खळबळजनक आरोप अगदीच निराधार म्हणता येणार नाही. कारण हे सगळं होत असताना सौदीच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाचे ते प्रमुख म्हणून काम करत होते.
 
अमेरिकेच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून युद्धाला सुरुवात केल्याबद्दल रियाधमधील सीआयएच्या प्रतिनिधीने जाब्री यांच्याजवळ उघड नाराजी व्यक्त केली होती.
मुळात येमेनमध्ये घुसखोरी करण्याची काही गरजच नाही, अशी अमेरिकेची आधीपासून स्पष्ट भूमिका होती.
 
“आता एमबीएसने आपल्या वडिलांची खोटी सही केली की नाही हा वादाचा विषय आहे. या आरोपांची मी पुष्टी करू शकत नाही. पण इतकं मात्र खात्रीने सांगू शकतो की येमेनमध्ये सैन्य घुसवणं हा पूर्णतः एमबीएसचा आग्रह होता. त्याने येनकेन प्रकारे आपल्या वडिलांना हा निर्णयात सामिल करून घेतलं. सौदी राजाने स्वखुशीने नव्हे तर मुलाच्या आग्रहापुढे झुकून युद्धाला हिरवा कंदील दाखवला,” असं एमआय 6 चे प्रमुख सर जॉन सेव्हर्स आमच्याशी बोलताना म्हणाले.
एमबीएसला राजघराण्यात म्हणावी तितकी मान्यता नव्हती. त्यामुळे सौदी सत्तेच्या वर्तुळात स्वतःचं एक वेगळं अस्तित्व आणि प्रभाव निर्माण करण्यासाठी एमबीएस जिद्दीला पेटला होता.
कोणाचं म्हणणं ऐकून घेण्याचा आज्ञाधारकपणा त्यांच्या स्वभावात कधीच नव्हता. माझाच आदेश अंतिम या आवेशातच ते कायम वावरत राहिले.
एमबीएस यांच्या या स्वभावाबाबत बोलताना क्रिस्टन फॉन्टरोझ सांगतात, ”त्यांचं व्यक्तिमत्व समजून घेण्याचा अपयशी प्रयत्न सीआयएनेसुद्धा केला. पण त्यांच्या अनिश्चित अतार्किक स्वभावाचा अंदाज लावणं सीआयएमधील निष्णात मानसशास्त्रज्ञांनाही जमलं नाही. कारण युवराजांचं संपूर्ण आयुष्य असाधारण परिस्थितीत घडलेलं आहे. त्यांच्याकडे अमर्याद संसाधनं आहे. त्यांना कोणीही ‘नाही’ म्हणूच शकत नाही. इतक्या तरूण वयात इतकी ताकद हातात असल्यावर कोणाचंही डोकं फिरणं साहाजिकच आहे. एमबीएसही याला अपवाद नाहीत.”
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना राष्ट्रीय सल्लागार समितीत फॉन्टरोझ यांनी काम केलेलं आहे.
 
नियम धाब्यावर बसवणारे युवराज
कोणाच्या खिजगणतीतही नसताना 2017 साली एमबीएस यांनी विक्रमी दराने लिओनार्डो द विंचीचं साल्वाटोर मुंडी हे ऐतिहासिक तैलचित्र विकत घेतलं.
 
अशाप्रकारे स्वतः जवळील सत्ता, पैसा आणि प्रभावाचं प्रदर्शन करत खासकरून आपल्या पाश्चात्य सहकाऱ्यांना एक छुपा संदेश देणं हा त्यांचा यामागचा उद्देश होता. हे खरं तर ख्रिश्चन धर्मातील जिझसचं प्रसिद्ध चित्र आहे.
 
पण तरीही निव्वळ लहर आली म्हणून पाश्चात्य देशांना दाखवून देण्यासाठी इतक्या अव्वाच्या सव्वा किंमतीत एका मुस्लीम राष्ट्राच्या प्रमुखाने ते विकत घेतलं‌. यासाठी त्यांनी तब्बल 45 कोटी डॉलर्स इतकी किंमत मोजली.
 
या तैल चित्राच्या विक्रीसाठी खरं तर 2017 ला न्यूयॉर्कमध्ये लिलाव भरवण्यात आला होता. थेट 45 कोटी डॉलर्सची बोली लावून सौदीच्या युवराजाने सगळ्यांनाच गारद केलं.
 
ही कलाक्षेत्रातील आजतागायत जगातली लावली गेलेली सर्वात मोठी बोली आहे. लिओनार्डो द विंचीने पृथ्वी आणि स्वर्गाचा सर्वेसर्वा जिझस असल्याचं या चित्रात दाखवलेलं आहे.
 
आज हे तैलचित्र विकलं जाण्याला 7 वर्ष उलटून गेलेली आहेत. पण लिलावानंतर ते आजतागायत कोणी पाहिलेलं नाही. एमबीएसच्या स्वभावाचा अंदाज या घटनेतून तुम्हाला लावता येईल.
सौदी युवराजाने आपल्या राजवाड्यात हे चित्र ठेवलेलं आहे, असं बरेच जण मानतात.
 
पण प्रिन्सटन विद्यापीठातील प्राध्यापक आणि सौदी युवराजचे निकटचे मित्र बनार्ड हेकेल सांगतात की, “हे तैल चित्र एमबीएसने स्वित्झर्लंडमधील जिनीवामध्ये जपून ठेवलेलं आहे. सौदीची राजधानी रियाधमध्ये एक जागतिक दर्जाचं भव्य संग्रहालय बांधण्याचा एमबीएसचा मानस असून ते बांधून झाल्यावर या संग्रहालयात हे तैलचित्र लावण्यात येणार आहे.’’
 
“मला एक भव्य संग्रहालय आपल्या रियाधमध्ये बनवायचं आहे. या संग्रहालयासाठी मला एक अशी कलाकृती हवी आहे जी जगभरातील लोकांसाठी आकर्षण बनेल. मोनालिसाप्रमाणे साल्वाटोर मुंडी पाहायला जगभरातून लोक आपल्याकडे येतील,” असं एमबीएस मला एकदा बोलताना म्हणाल्याची आठवण हेकेलनी सांगितली.
 
कलाक्षेत्राप्रमाणेच इतरही क्षेत्रातील पाश्चात्य देशांची सद्दी मोडून काढत स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्याची महत्त्वकांक्षा एमबीएस बाळगून आहेत.
 
त्यासाठी प्रसंगी इतरांची नाराजी ओढावून घेण्याची तयारीही ते बाळगून आहेत. क्रीडा क्षेत्रात सौदी अरेबियाने सुरु केलेला गुंतवणुकीचा सपाटा हेच दर्शवतो.
2034 चा फिफा विश्वचषक आपल्या देशात भरवण्यासाठी सौदी अरेबियाने विक्रमी बोली लावून यजमानपद पटकावलं‌.
टेनिस आणि गोल्फच्याही मोठ-मोठ्या स्पर्धा सौदी अरेबियात भरवल्या जात असून त्यासाठी खोऱ्याने पैसा ओतला जातोय.
जागतिक क्रीडाक्षेत्राचं केंद्र पश्चिमेकडून पूर्वेकडे हलवण्याच्या या प्रक्रियेला अभ्यासकांनी ‘स्पोर्ट्सवॉशिंग’ असं नाव‌ दिलंय.
 
सौदी अरेबियाचं पर्यायानं स्वतःचं वर्चस्व जगावर प्रस्थापित करण्यासाठी जे काही करावं लागेल ते सगळं करण्याची तयारी एमबीएसने ठेवलेली आहे.
 
सौदी अरेबिया वेगवेगळ्या क्षेत्रात आक्रमकपणे करत असलेली गुंतवणूक याचा पुरावा आहे.
 
“या सगळ्यामागे एक ताकदवान नेता म्हणून स्वतःला जागतिक स्तरावर प्रस्थापित करणे हा एमबीएसचा हेतू आहे. सौदीला पर्यायाने स्वतःला जागतिक महासत्ता बनवण्याच्या इराद्याने ते झपाटलेले आहेत,” असा दावा एमआय 6 चे माजी प्रमुख सर जॉन सेव्हर्स यांनी केला.
सौदी सरकार मध्ये 40 वर्ष काम करत आलेल्या साद अल-जाब्री यांना एमबीएस सत्तेत आल्यावर मात्र सेवेतून पायउतार व्हावं लागलं.
 
किंबहुना, त्यांना तसं भाग पाडलं गेलं. एमबीएस युवराज बनण्याआधी मोहम्मद बिन नायफ तिथले युवराज होते. जाब्री यांनी मोहम्मद बिन नायफ यांचे निकटचे सहकारी म्हणून काम केलं होतं.
 
एमबीएस स्वत:कडे सत्ता एकटवत असताना जाब्रींनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मायदेशातून पलायन केलं.
 
आपल्या जीवाला आता धोका आहे, अशी पूर्वसूचना त्यांना परदेशी गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली होती.
 
जाब्री सांगतात की यानंतर बऱ्याच दिवसांनी अचानक मला एमबीएसकडून एक संदेश आला. “मायदेशी परत या. तुम्हाला आम्ही तुमची जुनी नोकरी सन्मानाने परत देऊ,” असा संदेश त्यांना युवराजांनी पाठवला होता.
 
“अर्थातच मी नकार दिला. कारण ही एक चाल होती. मला कसंही करुन सौदी अरेबियात परत बोलवण्याची. एकदा का मी त्यांना सापडलो तर माझा छळ करून मला एकतर तुरूंगात टाकतील किंवा सरळ मारुन टाकतील. माझं जिवंत असणं एमबीएसला रूचणारं नाही. आत्तापर्यंत माझ्या हत्येचे अनेक प्रयत्न झालेले आहेत. पुढेही होत राहतील. मला मेलेलं पाहिल्याशिवाय एमबीएस काही शांत बसणार नाही,” आमच्यासमोर जाब्री यांनी आपली भीती बोलून दाखवली.
 
जाब्रींना वाटणारी ही भीती अगदीच अनाठायी नाही. पलायन आणि भ्रष्टाचाराच्या नावाखाली सौदी अरेबियाच्या सरकारनं जाब्रीच्या मुलांना तुरुंगात डांबून ठेवलंय.
 
ओमार आणि सारा ही त्यांची दोन मुलं अनुक्रमे फक्त 18 आणि 19 वर्षांची आहेत. माझ्या मुलांवर लावलेले सगळे आरोप धादांत खोटे आहेत, असा दावा जाब्री करतात. जाब्रीच्या मुलांना सोडण्यात यावं, असं अपील एमबीएसकडे खुद्द संयुक्त राष्ट्र संघाकडून करण्यात आलेलं आहे.
 
कॅनडात राजाश्रय घेऊन बसलेल्या जाब्रींना परत आणण्यासाठी सौदी अधिकारी बऱ्याच काळापासून आटापिटा करत आहेत.
 
त्यांच्या प्रत्यारोपणासाठी सौदीने इंटरपोलचा आश्रय घेत अनेक वेळा अर्ज केले. पण अद्याप त्यांना यश आलेलं नाही.
 
सौदी सरकारमध्ये मंत्री म्हणून कार्यरत असताना जाब्री यांनी कोट्यावधींचा भ्रष्टाचार केलेला असून त्यासाठी आम्हाला त्यांचा ताबा हवा आहे, असा दावा एका बाजूला सौदी सरकार करतंय. तर दुसऱ्या बाजूला ‘अल कायदाच्या दहशतवादी कारवायांना खीळ लावून आमचा बचाव केल्याबद्दल साद अल - जाब्रींचे आम्ही ऋणी आहोत,’ असं म्हणत सीआयए आणि एमआय 6 त्यांचं कौतुक करते.
 
खाशोगींची हत्या
2018 साली इस्तांबुल मधील सौदी अरेबियाच्या वाणिज्य दूतवासात पत्रकार जमाल खाशोगींची निघृण हत्या करण्यात आली. या धक्कादायक घटनेनं सगळ्यांनाच हादरा बसला. अमेरिकेसह जगभरातून एमबीएसवर टीका झाली. ही हत्या इतकी क्रूर आणि उघड होती की आरोपांना नकार देणंही एमबीएस यांच्यासाठी अवघड होतं.
 
एमबीएस यांचे 15 सहकारी आणि शरीररक्षक घटनेच्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचे पासपोर्ट स्वतः सौदी युवराजांनीच पारित केले होते. पत्रकार जमाल खाशोगी वेळोवेळी आपल्या लिखाणातून एमबीएस यांच्या धोरणांवर टीका करत आलेले होते.
 
अचानक एमबीएसच्या सहकाऱ्यांनी घेरलेल्या सौदी दूतवासातून ते गायब झाले. त्यांचं मृत शरीरही नंतर मिळालं नाही. एमबीएसने त्यांच्या शरिराचे तुकडे करून विल्हेवाट लावली, असा कयास आहे. एका अमेरिकन पत्रकाराची अशी उघडपणे हत्या करणं सौदी युवराजाला नंतर फार महागात पडलं.
 
या हत्येनंतर एमबीएस यांच्यासोबत व्हाट्सअपवर झालेला संवाद प्राध्यापक हेकेल यांनी आमच्या समोर उघड केला. “एमबीएस असं काही करतील, हे मलाही वाटलं नव्हतं. कदाचित हत्येनंतरची प्रतिक्रिया इतकी तीव्र असेल याचा अंदाज एमबीएसला आला नसावा.’’
 
काहीच दिवसांनी अमेरिकेचे राजदूत डेनिस रॉस यांनी एमबीएसची भेट घेतली. “ही हत्या मी केली नाही. पण सौदी दूतवासातच हे सगळं घडल्यानं आमच्या बाजूने चूक झाली हे मान्य करावंच लागेल,” असं एमबीएस म्हणाल्याचं डेनिस सांगतात.
 
“हत्या मी केली नाही असं एमबीएस म्हणतात खरं पण त्यावर विश्वास ठेवणं अवघड आहे. थेट एका वरिष्ठ अमेरिकन पत्रकाराची इतकी उघड हत्या करण्याचं धारिष्ट्य आणि ताकद एमबीएसशिवाय दुसरं कोणी दाखवणं शक्यच नाही,” डेनिस या घटनेवर आपलं मत व्यक्त करताना म्हणाले.
हत्येच्या आरोपांना एमबीएस कायम नाकारत आलेले आहेत. पण 2019 साली पहिल्यांदा त्यांनी याची नैतिक जबाबदारी घेतली. “हा सगळा प्रकार माझ्या अखत्यारितीत म्हणजेच सौदी दूतवासात घडल्यामुळे मी ही चूक मान्य करतो,” असं आपल्या निवेदनात एमबीएस म्हणाले होते.
 
“या सर्व प्रकरणातून एमबीएसला मोठा धडा मिळाला. आपण काहीही केलं तरी ते खपवून घेतलं जाईल, हा त्याचा भ्रम गळून पडला. सदर घटनेनंतर सौदी अरेबियाची झालेली नाचक्की आणि बदनामी एमबीएससाठी मोठा धक्का होता. पण मला खात्री आहे की अशी चूक किंवा गाफिलपणा आता त्याच्याकडून होणार नाही,” असं हेकेल सांगतात.
 
खाशोगींची हत्या आणि त्यामुळे झालेल्या बदनामीने एमबीएसला मोठा धडा शिकवला, हे सर जॉन सेव्हर्स देखील मान्य करतात.
 
“यापुढे असा अतातायिपणा करण्याआधी युवराज 10 वेळा विचार करतील. खाशोगींची हत्या करणं एमबीएसला फार महागात पडलं. यामुळे ते अधिक सजग झालेत हे खरंय. पण त्यांचा मूळ स्वभाव बघता त्यांच्या कार्यपद्धतीत फारसा फरक पडेल असं मला वाटत नाही,” असं काहीसं संमिश्र मत सेव्हर्स यांनी आमच्याशी बोलताना व्यक्त केलं.
 
एमबीएस आतातरी फक्त युवराज आहेत. त्यांचे 88 वर्षांचे वडिल अधिकृतरित्या सौदी गादीवर बसलेले आहेत.
 
एकदा त्यांचा मृत्यू झाल्यावर एमबीएस सौदीच्या गादीवर अधिकृतरित्या विराजमान होतील. त्यांचं तरुण वय आणि वाढती महत्वकांक्षा बघता पुढची 50 वर्षे ते आरामात सौदी अरेबियावर राज्य करतील.
 
इतकी सगळी ताकद हातात एकवटलेली असली तरी सौदीच्या या अनभिषिक्त सम्राटाला एक चिंता मागच्या काही काळापासून सतावत आहे. ती म्हणजे मारलं जाण्याची.
 
इस्त्रायलसोबत जवळीक वाढवण्याचे एमबीएसने चालवलेले प्रयत्न अनेकांना रूचलेले नाहीत. त्यामुळे राजघराण्यातीलच अनेक जवळचे लोक एमबीएसवर दात धरून आहेत.
 
जवळचाच कोणी माझा काटा काढू शकतो, अशी भीती युवराजांनी माझ्याजवळ वेळोवेळी व्यक्त केल्याचं हेकेल सांगतात.“अनेक लोकांना एमबीएसला मेलेलं बघायचं आहे आणि एमबीएसलाही हे चांगलंच ठाऊक आहे,” हेकेल म्हणाले.
 
दगाफटका होण्याची ही भीती मनामध्ये बसल्यामुळे एमबीएस कायमच अति दक्ष असतात. त्यामुळे धोक्याची टांगती तलवार सतत वर लटकलेली असूनही ते आजतागायत सुरक्षित आहेत. एमबीएस बाळगत असलेल्या अतिदक्षतेचे साक्षीदार जाब्री देखील आहेत.जाब्रीसोबतच्या आपल्या पहिल्याच बैठकीत टेलिफोन वायरची सॉकेटच उखाडून फेकल्याची आठवण ते आवर्जून सांगतात.
 
त्यावेळी तर एमबीएस आत्ता कुठे सत्तेची पायरी चढत होते. कारकीर्द नुकतीच सुरू होत असल्यामुळे त्यांच्या जीवाला त्यावेळी तितकासा धोकाही नव्हता. तरीही एमबीएस घेत असलेली आत्मसुरक्षेची काळजी नजरेत भरणारी होती.
 
आपल्या देशाला आधुनिक बनवणं हे एमबीएसचं अंतिम लक्ष्य आहे. याआधी असा प्रयत्न अथवा हिंमत कोणत्याच राजानं केली नाही. कारण सौदी अरेबिया हा देश आणि तिथली जनता पारंपारिकदृष्ट्या अतिशय धार्मिक व प्रतिगामी विचारसरणीची राहिलेली आहे.
 
कुठल्याही विरोधाला न जुमानता मनाला वाटेल तेच करण्याचा अट्टाहास सौदीच्या युवराजामध्ये बऱ्याच प्रमाणात दिसून येतो.
 
जगाचा इतिहास उकरून पाहिल्यास प्रत्येक हुकूमशाहामध्ये ही आत्ममग्न प्रवृत्ती तुम्हाला सारखीच आढळून येईल. स्वत:ची ताकद आणि दरारा निर्माण करण्यात ते इतके मश्गूल होऊन जातात की आपलं काही चुकतंय, याची जाणीव देखील त्यांना होत नाही.
 
आणि त्यांना ही जाणीव करून द्यायची हिंमत त्यांचे हितचिंतकही जीवाच्या भीतीने दाखवू शकत नाही. एमबीएसही या एकहाती सत्तेसोबत मिळणाऱ्या शापाला अपवाद नाहीत.
 
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
Published By- Priya Dixit