1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जुलै 2023 (07:22 IST)

जगातील सगळ्यांत 'भयावह तुरुंग', 'या जेलमध्ये गेल्यावर कैदी बाहेर येतच नाही'

jail
एल साल्वाडोरमध्ये 40 हजार कैद्यांचं तुरुंग बांधलं आहे. त्याला 2 किलोमीटरची भींत आहे. कुख्यात टोळी माफिया एल चापोही तिथून पळू जाऊ शकला नाही.
एल साल्वाडोरमध्ये राहणाऱ्या अँजेलिकाला आपला हरवलेला नवरा डार्विन कुठं असेल, याची तिला आधीच कल्पना होती.
 
त्यातच सरकारने प्रसिद्ध केलेल्या आणि सोशल मीडियावर अपलोड केलेल्या अधिकृत व्हीडिओ फुटेजनं त्यांच्या संशयाला दुजोरा दिला.
 
अँजेलिकाने तो व्हीडिओ फ्रेम बाय फ्रेम पाहिला. 25 मिनिटं फुटेज पाहिल्यानंतर तिने तिच्या पतीला बरोबर ओळखलं.
 
तिचा पती एका सहकारी कैद्याशी हस्तांदोलन करताना दिसत होता. अँजेलिकाने व्हीडिओ तिथेच थांबवला. तो पुन्हा प्ले केला आणि पूर्ण फुटेज पुन्हा पाहिलं.
 
तिचा पती खाली पाहात होता. त्याने पांढऱ्या चड्डीशिवाय काहीही घातलं नव्हतं. पण तोच डार्विन असल्याची अँजेलिकाला काहीच शंका नव्हती.
 
11 महिन्यांपूर्वी अटक झाल्यापासून तिने डार्विनला पाहिलं नव्हतं.
 
डार्विनला एल साल्वाडोरच्या एका मोठ्यात आणि कुप्रसिद्ध तुरुंगात ठेवलं आहे, याचा अँजेलिकाकडे हा पहिला पुरावा होता.
 
त्या तुरुंगाचं नाव होतं सेंटर फॉर द कंफाईंमेंट ऑफ टेररिझम (SECOT).
 
याच वर्षी जानेवारीमध्ये एल साल्वाडोर देशाचे राष्ट्रपती नायब बुकेले यांनी याचं उद्घाटन केलं. देशाची राजधानी सॅन साल्वाडोरपासून 74 किमी दूरवर हे तुरुंग आहे.
 
सेकॉट तुरुंग लवकरच अध्यक्ष बुकेले यांच्या 'टोळ्यांविरोधातील युद्धाचे प्रतीक’ बनले.
 
मार्च 2022 पासून आतापर्यंत किमान 68 हजार लोकांना ताब्यात घेतल्याचं अल साल्वाडोरच्या सुरक्षा मंत्रालयाने अलीकडेच जाहीर केली आहे.
 
साल्वाडोरमधील या तुरुंगात हजारो लोक आहेत ज्यांना अनेक नातेवाईकांशी संपर्क करू दिला जात नाही.
 
अँजेलिकासारखे अनेक कुटुंबीय त्यांच्या नातेवाईकांना अशाच काही व्हीडिओंमध्ये शोधत आहेत.
 
टोळीयुद्धाविरोधात राष्ट्रपती बुकेले यांनी पुकारलेल्या अभियानामुळे देशात आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे.
 
पण एल साल्वाडोरमध्ये ही मोहीम स्थानिक पातळीवर खूप लोकप्रिय आहे. एल साल्वाडोर हा जगातील सर्वांत हिंसक देशांपैकी एक मानला जातो.
 
'टोळी युद्ध संपवणारे राष्ट्राध्यक्ष सगळ्यांत लोकप्रीय'
जानेवारी 2023मध्ये एल साल्वाडोरमध्ये 1,200 लोकांचं सर्व्हेक्षण झालं. त्यामध्ये 92% लोकांनी अध्यक्षांच्या बाजूने आपलं मत व्यक्त केलं.
 
बुकेले यांना नागरिक पसंत करत आहेत. कारण ते सत्तेत आल्यापासून एल साल्वाडोरमधील खुनाच्या घटनांमध्ये कमालीची घट झाली आहे.
 
हा एक लक्षणीय बदल असल्याचं साल्वाडोर लोकांना वाटत आहे.
 
पूर्वी टोळ्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागात जे गुंड नागरिकांना धमकावयाचे तिथे हा बदल ठळक दिसत आहे.
 
आधी टोळ्यांचे म्होरके लोकांना धमकावायचे. म्हणायचे, 'बघा, ऐका पण तोंड बंद ठेवा'.
 
आता सामान्य नागरिक अशा टोळीग्रस्त भागातून कोणत्याही भीती किंवा हिंसाचाराशिवाय फिरू शकतात.
 
सेकोट तुरुंगात सुमारे 40,000 कैदी ठेवले जाऊ शकतात, असं सरकारने सांगितलं आहे.
 
त्याठिकाणी दोन प्रतिस्पर्धी टोळ्यांचे गुंड ठेवले जाऊ शकतात. त्यात मारा साल्वात्रुचा (एमएस-13) आणि बॅरिओ 18 या टोळ्यांचे सदस्य असणार आहेत.
 
दोन टोळ्यांमधील युद्धामुळे एल साल्वाडोरमध्ये अनेक दशकांपासून दहशत आणि रक्तरंजित संघर्ष राहिला आहे.
 
बीबीसीने अनेकदा सेकोटमध्ये प्रवेश मिळावा यासाठी विनंती केली. पण सरकारने ती दिली नाही.
 
तुरुंगाचं उद्घाटन होण्यापूर्वी सरकारने काही व्हीडिओ आणि फोटो प्रसिद्ध केले होते. तसंच बीबीसीने नाव न सांगण्याच्या अटीवर अल साल्वाडोरचे अधिकारी आणि तुरुंगाच्या बांधकामात सहभागी झालेल्या इंजिनअर्सच्या मुलखती घेतल्या. त्या आधारावर हा लेख आहे.
 
'या तुरुंगात गेल्यावर कैदी बाहेर येतच नाही'
सेकॉट तुरुंगात एकूण 256 सेल आहेत. तिथे एकूण क्षमता 40,000 कैद्यांची आहे.
 
जर नवीन ब्लॉक बांधले गेले नाहीत तर एका सेलमध्ये 156 कैद्यांना ठेवलं जाईल.
 
कैद्यांना झोपण्यासाठी लोखंडाने बनवलेले कप्पे आहेत. त्यावर झोपण्यासाठी त्यांना अंथरून पांघरून मिळत नाही.
 
तुरुंगातील सेलवर हिऱ्यांच्या आकाराप्रमाणे जाळी आहे. त्यावर पोलीस सतत गस्त घालतात.
 
कैद्यांना कपडे धुण्यासाठी प्रत्येक कोठडीत दोन वॉश बेसिन आहेत. तर उघड्यावर दोन शौचालयेही आहेत.
 
एल साल्वाडोरमध्ये वर्षभर खूप उष्ण आणि दमट असतं. पण या सेलमध्ये खिडक्या, पंखे किंवा एअर कंडिशनर असं काहीच नाहीये.
 
अधिकाऱ्यांच्या मते, हे कैदी केवळ ऑनलाइन सुनावणी किंवा एकांतवासाच्यावेळीत इथून बाहेर पडू शकतात.
 
एकाच सेलमध्ये राहणाऱ्या प्रत्येक कैद्यासाठी किती जागा आहे, अद्याप माहिती पडलं नाहीये. बीबीसी मुंडोच्या हाती लागलेल्या माहितीनुसार तुरुंगातील प्रत्येक सेल ही 7.4 मीटर रुंद आणि 12.3 मीटर लांब आहे.
 
याप्रमाणे एका सेलमधील एकूण कैद्यांच्या संख्येनुसार प्रत्येक कैद्यासाठी 0.58 चौरस मीटर जागा असू शकते.
 
रेड क्रॉसने आंतरराष्ट्रीय मानक म्हणून प्रत्येक कैद्यासाठी सामायिक सेलमध्ये 3.4 चौरस मीटर जागा देण्याची शिफारस केली आहे.
 
सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेकोट कैद्यांची कधी सुटका होईल, हे कुणीच सांगू शकत नाही.
 
सध्या सेकोटमध्ये किती कैदी आहेत, हे स्पष्ट झालेलं नाही.
 
त्याठिकाणी दोन वेळा कैद्यांच्या स्थलांतराची सरकारने जाहीर घोषणा केली होती. प्रत्येक वेळी दोन हजार कैद्यांना येथे आणण्यात आलं.
 
सेकोटमध्ये मनोरंजनासाठी एकही गोष्ट ठेवली नाही. तर कोणत्याही कैद्याला कुटुंबातील सदस्यांना भेटण्याची परवानगी नाही.
 
हे कैद्यांच्या हक्कांबाबतच्या आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आहे.
 
सेकोटमध्ये कैद्यांना ठेवण्याचे कोणतेही सार्वजनिक निकष नाहीत.
 
याठिकाणी नवीन कैदी ठेवण्यात आले आहेत की इतर कारागृहातून फक्त कैद्यांची बदली करण्यात आली आहे, हेही स्पष्ट झालेलं नाही.
 
कारागृहात कैद्यांना कशाप्रकारे जेवण दिले जाते किंवा त्यांची काळजी कशी घेतली जाते, याबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध आहे.
 
किचन, डायनिंग रूम, दुकान किंवा हॉस्पिटल यासारख्या सुविधांची कोणतीही माहिती किंवा फोटो शेअर केलेले नाहीत.
 
सेकोटमध्ये अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था आहे - प्रवेश करण्यासाठी स्कॅनिंग सिस्टम, अत्याधुनिक शस्त्रास्त्रांव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात पाळत ठेवणारे नेटवर्क असल्याचं अधिकारी सांगतात.
 
“हे तुरुंग काँक्रीट आणि स्टीलचा खड्डा आहे जो फाशीच्या शिक्षेशिवाय लोकांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत आहे," असं युएनच्या छळ प्रतिबंधक उपसमितीचे माजी सदस्य मिगुएल सररे यांनी बीबीसीला सांगितलं.
 
वरिष्ठ न्यायाधीश आणि अध्यक्ष बुकेले यांच्या आणीबाणीच्या शासनावर उघडपणे टीका करणारे अँटोनियो डुरान हेही सररे यांच्याशी सहमत असल्याचे दिसते.
 
कायद्याचं राज्य असलेल्या देशात एखाद्याचं स्वातंत्र्य हिरावून घेणं हा दंडनीय अपराध आहे, असं डुरान यांना वाटतं.
 
एल साल्वाडोर सरकार सेकोटकडे आपल्या कैद्यांसाठी शेवटचा उपाय म्हणून पाहतं.
 
याविषयी एल साल्वाडोरचे कायदा आणि सार्वजनिक सुरक्षा मंत्री, गुस्तावो विलाटोरो यांच्याशी बीबीसीचे प्रतिनिधी विल ग्रँट यांनी चर्चा केली. ते म्हणाले, "आम्ही साल्वाडोरच्या लोकांप्रती वचनबद्ध आहोत. सेकोटमधील कैदी पुन्हा कधीही समाजात वावरणार नाहीत. आम्ही त्यांच्याविरुद्ध आवश्यक खटले तयार करू जेणेकरून ते परत येणार नाहीत."
 
"आमच्यासाठी, सेकोट हे आतापर्यंत बांधलेले न्यायाचे सर्वांत मोठे स्मारक आहे. यात लपवण्यासारखे काहीही नाही" असंही त्यांना सागंतिलं.
 
याआधी अध्यक्ष बुकेले यांनी केलेल्या ट्वीटवरूनही हाच संदेश देण्यात आला होता.
 
"मानवाधिकारावर काम करणाऱ्या सर्व NGO ला सांगा की आम्ही या रक्तरंजित मारेकरी आणि त्यांच्या साथीदारांचा नायनाट करणार आहोत, आम्ही त्यांना तुरुंगात टाकू आणि ते कधीही बाहेर येणार नाहीत," असं बुकेले यांनी ट्वीट केलं होतं.
 
सेकोटमध्ये किती कैदी आहेत आणि त्यांच्यावर काय गुन्हे आहेत याचा तपशील आजही जाहीर केलेला नाही.
 
या तुरुंगात कोणत्या कैद्यांना ठेवले जातं? त्यांना तिथे कोणत्या आधारावर ठेवलं जातं? 40,000 कैदी तिथे राहू शकतील का? कैद्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या हस्तांतरणाची माहिती का देण्यात आली नाही? बीबीसीने हे सगळे प्रश्न एल साल्वाडोर सरकारला विचारले. पण सरकारने यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही.
 
काही आठवड्यांपूर्वी बीबीसीची टीम तुरुंगाच्या शक्य तेवढ्या जवळ गेली.
 
' एल चापोही इथून पळून जाऊ शकला नाही'
तुरुंगात टाकलेल्या कुख्यात मेक्सिकन ड्रग कार्टेलचा संदर्भ देत या भागात तैनात असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने आम्हाला काही माहिती दिली.
 
"मेक्सिकन ड्रग माफिया एल चापोही तिथून पळून जाऊ शकला नाही," असं एका तुरुंग अधिकाऱ्याने बीबीसी सांगितले. एल चापो यापूर्वीही अनेक तुरुंगातून पळून गेला आहे.
 
तुरुंग सुमारे 57 एकरमध्ये पसरलेलं आहे. त्याचे आठ विभाग आहेत, प्रत्येकामध्ये 32 सेल आहेत.
 
या तुरुंगाला जाळीची दोन कुंपणं आहेत. त्यांना इलेक्ट्रिक करंट दिला आहे.
 
याशिवाय कारागृहाला दोन काँक्रीटच्या भिंती आहेत. बाह्य भिंतीची एकूण लांबी 2.1 आहे. त्यावर निगराणीसाठी 19 टॉवर आहेत.
 
एका पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अलिकडच्या काही महिन्यांत त्याचं आयुष्य खूप सुधारलं आहे.
 
"टोळी युद्ध सुरू होतं तेव्हा सर्व प्रकारची जोखीम पत्करून टोळीतील सदस्यांना त्यांच्या घरातून पकडण्यात माझा वेळ जात असे. आता मी चौकींवर दिवस घालवतो. कधी कधी कॉफी पिण्याची वेळ येते," असं ते सांगतात.
 
दरम्यान ज्या भागात टोळीयुद्ध थांबलं आहे तिथले नागरिक राष्ट्राध्यक्ष बुकेले यांच्या धोरणाचे समर्थन करताना दिसतात.
 
सॅन साल्वाडोरच्या बाहेरील ला कॅम्पानेरा येथे राहणारे डेनिस यांनी बीबीसीला सांगितलं, "राष्ट्रध्यक्षांनी ही मोहीम सुरू करेपर्यंत या ठिकाणी अजिबात सुरक्षित नव्हतं."
 
"मला वाटतं की आणीबाणीच्या काळातील हा सर्वोत्तम निर्णय होता. बुकेले हे आतापर्यंतचे सर्वोत्तम राष्ट्रपती आहेत," असं ते म्हणाले.
 
दुसरीकडे, 23 वर्षीय मारिया अगदी वेगळं मत मांडते. आम्ही तिला सेकोटपासून थोड्या अंतरावर असलेल्या एल मनियादेरो येथे तिच्या घरी भेटलो.
 
या कारागृहाच्या बांधकामात त्याच्या आईच्या पार्टनरने सहा महिने काम केलं. पण नंतर त्याला बेकायदेशीर कामात सहभागी झाल्यामुळे अटक करण्यात आली.
 
मारिया म्हणते की ती आता बाहेर जाण्याचा धोका पत्करत नाही. कारण तिची मैत्रीण आणि तीन वर्षांच्या मुलीची आई जेसिका हिला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
 
"आता एल साल्वाडोरमध्ये तरुण असणे गुन्हा आहे," असं मारिया म्हणते.
 
बीबीसीने तथाकथित आणीबाणीच्या स्थितीत ताब्यात घेतलेल्या कैद्यांच्या डझनभर नातेवाईकांशी चर्चा केली. त्या सर्वांनी समान अनुभव सांगितले.
 
ते सांगतात - त्यांच्या नातेवाईकांना कोणत्याही वॉरंटशिवाय त्यांच्या राहत्या घरातून तुरुंगात टाकण्यात येतं. त्यांना सुनावणीआधीच अटक केली जाते. ही प्रक्रिया काही महिने नव्हे तर वर्षानुवर्षे चालू शकते.
 
मोहिमेच्या पहिल्या वर्षात या तुरुंगांत छळ, मारहाण झाली. तिथल्या आरोग्य सेवेच्या अभावामुळे डझनभर कैद्यांचा मृत्यू झाल्याचं, मानवाधिकारांसाठी लढणाऱ्या क्रिस्टोसल या स्वयंसेवी संस्थेने दावा केला आहेत. तसंच त्यांनी मे महिन्यात याविषयी एक रिपोर्टही प्रसिद्ध केला.
 
या अहवालावर सरकारने जाहीरपणे प्रतिक्रिया दिलेली नाही.
 
पण 24 मे रोजी देशाचे मानवाधिकार आयुक्त आंद्रेस गुझमन कॅबलेरो यांनी एका मीडिया कार्यक्रमादरम्यान हा अहवाल 'चिंताजनक' होता, हे कबुल केलं आहे.
 
ते म्हणाले, "जेव्हा कारागृहात दोन-तीन टोळ्यांचे लोक सामील असतात, तेव्हा त्यांचं एकमेकांशी खूप भांडण होतं. त्यामुळे कैद्यांचा मृत्यूही होऊ शकतो. अशा मृत्यूच्या प्रत्येक प्रकरणाचा आढावा घेतला पाहिजे."
 
क्रिस्टोसलच्या अहवालानुसार सेकोट विशेष चिंतेचा विषय आहे कारण तिथली परिस्थिती फार भयानक आहे.
 
“सेकोटमधील परिस्थिती अमानुष आणि अपमानास्पद असू शकते, कारण त्या तुरुंगात कोणालाही प्रवेश नाही," असे एल साल्वाडोरचे माजी पोलीस महानिरीक्षक आणि क्रिस्टोसलचे कायदेशीर प्रमुख झैरा नवास म्हणतात.
 
तिथे कोणताही वकील, लोकपाल आणि मीडिया जाऊ शकत नाही.
 


Published By- Priya Dixit