बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 19 जून 2024 (15:25 IST)

'जसा सिगरेटच्या पाकिटावर धोक्याचा इशारा असतो तसा सोशल मीडिया कंपन्यांनी द्यावा' : विवेक मूर्ती

मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवा, हे नैराश्य आणि मानसिक तणावाचे कारण आहे असं मत अमेरिकेचे सर्जन जनरल आणि विख्यात शल्य चिकित्सक विवेक मूर्ती यांनी मांडले आहे.
 
सिगरेट आणि तंबाखूजन्य पदार्थांवर वैधानिक इशारा दिलेला असतो, तसा इशारा देखील सोशल मीडियावर हवा असं मत देखील मूर्ती यांनी मांडलं आहे.
 
अमेरिकेत सर्जन जनरल हे आरोग्य व्यवस्थेत मोठे पद मानले जाते. सर्जन जनरल हे अमेरिकन आरोग्य मंत्रालयाचे प्रमुख सल्लागार देखील मानले जातात.
 
मूर्ती यांनी न्यूयॉर्क टाइम्स मध्ये लिहिलं आहे की, आजकाल सोशल मीडियामुळे मुलांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच मुलांमध्ये नैराश्य वाढण्याची भीती आहे.
 
आता वेळ आली आहे की सोशल मीडियाच्या धोक्यांबाबत सर्जन जनरलचा वैधानिक इशारा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असावा. यामुळे पालक आणि अल्पवयीन मुलांना सोशल मीडियाच्या धोक्यांची सतत जाणीव राहील.
 
विवेक मूर्तींनी जी शिफारस सुचवली आहे त्याविषयी सोशल मीडिया कंपन्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी बीबीसीने यूट्यूब, टिकटॉक, एक्स आणि मेटा (फेसबुक आणि इंस्टाग्राम) यांच्याशी संपर्क साधला आहे.
 
अमेरिकेमध्ये सिगारेटच्या पॅकेजिंगवर असा वैधानिक इशारा पहिल्यांदा 1966 मध्ये लावण्यात आला होता. तत्कालीन सर्जन जनरल लूथर एल. टेरी यांनी तंबाखू आणि फुफ्फुसांचा कर्करोग यांच्यातील संबंध दर्शवणारा एक अहवाल प्रकाशित केला होता. यानंतर, इतर देशांनीही याचं अनुकरण केलं. तर ब्रिटनने 1971 मध्ये अशा प्रकारचा इशारा सिगारेट पॅकेटवर छापणं बंधनकारक केलं.
 
मूर्ती यांनी असं म्हटलंय की, तंबाखूच्या पाकिटावर असा इशारा छापल्यामुळे धूम्रपानाशी संबंधित धोक्यांविषयी जागरूकता वाढली आहे. त्यांच्या मते, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारचा इशारा दाखवल्यामुळे मुलांच्या आई-वडिलांना आपल्या पाल्यांच्या ऑनलाईन सुरक्षेवर नजर ठेवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
 
'शाळांमधून मोबाईल फोनवर बंदी असावी'
लेखात शाळांमध्ये फोन वापरण्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. जेवताना आणि झोपतानाही पालकांनी मुलांना फोन वापरण्यापासून रोखले पाहिजे, असं मूर्ती यांनी म्हटलंय.
 
2023 मध्ये मूर्ती यांनी सार्वजनिक आरोग्याविषयी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या होत्या. त्यावेळीच अल्पवयीन मुलांचा सोशल मीडियाचा वापर आणि खालावलेल्या मानसिक आरोग्याचा संबंध त्यांनी उलगडून दाखवला होता.
 
सध्याचे त्यांचे वक्तव्य हे त्या पार्श्वभूमीवर आहे. त्यांनी असं म्हटलंय की या प्लॅटफॉर्मच्या प्रभावावर एकमत नाहीये, यावर आणखीन संशोधन करण्याची गरज आहे.
 
ते म्हणाले, "आपत्कालीन परिस्थितीमध्ये तुमच्याकडे योग्य माहितीचे विश्लेषण करण्यासाठी वेळ उपलब्ध नसतो."
 
"तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या तथ्यांचं विश्लेषण करता आणि आलेल्या निकालावर तत्परतेने काम करता."
 
"किशोवयीन मुलांमध्ये मानसिक आरोग्याचं संकट वाढलं आहे आणि सोशल मीडियाचा यात मोठा वाटा. सोशल मीडियाचा जास्त वापर मानसिक आरोग्यासाठी हानिकारक आहे."
 
मनोचिकित्सक आणि हाऊ टू एम्प्टी युवर स्ट्रेस बकेटच्या लेखक जिन लाली यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "वैधानिक इशाऱ्यामुळे मानसिक आरोग्य चांगलं राखण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल असेल."
 
त्यांनी सांगितलं की, सोशल मीडियाचे बरेच फायदे असू शकतात, परंतु यात जोखीमही आहे. जसं की सायबर बुलिइंग आहे किंवा यातून समोरच्या व्यक्तीला त्रास दिला जाऊ शकतो.
 
यातून चिंता, नैराश्य, आणि मानसिक आरोग्याच्या समस्या तयार होते असं मूर्ती सांगतात.
 
ते पुढे म्हणाल्या की, या वैधानिक इशाऱ्यामुळे होईल असं की, सोशल मीडियावर कधी बंद करायचा ते मुलांना समजेल.
 
ते म्हणाल्या की, मला असं वाटतं की हे वैधानिक इशारा पालकांसाठीही खूप फायदेशीर असल्याचे दिसते. वैधानिक इशाऱ्यासारखी एखादी सोय असेल तर त्यांना मुलांच्या वापरावर अधिक नियंत्रण ठेवता येईल.
 
तरुणांवर सोशल मीडियाचा होणारा परिणाम याबाबत सतत चर्चा झडत असतात.
 
काही संशोधनांमध्ये मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर आणि किशोरवयीनांच्या मानसिक आरोग्यावर होणारा नकारात्मक परिणाम यांच्यात संबंध आढळून आला आहे.
 
परंतु, 2023 च्या एका अभ्यासात फेसबुकचा जागतिक प्रसार आणि व्यापक मानसिक हानी यांचा संबंध जोडणारा कोणताही पुरावा आढळलेला नाही.
 
तर इतर संशोधनात असं दिसून आलंय काही मुलांना आधीच ऑफलाइन माहीत असलेल्या मित्रांशी ऑनलाइन बोलण्यात वेळ घालवण्याचा फायदा होतो.
 
यावर अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन म्हणते की, "सोशल मीडिया फायदेशीर किंवा हानिकारक असं ठरवता येणार नाही. पण हानिकारक गोष्टींना प्रोत्साहन देणारं कंटेट काढून टाकणं गरजेचं आहे."
 
यात असंही म्हटलंय की, सोशल मीडियाचा वापर करताना 14 वर्षाखालील मुलांचं निरीक्षण करण्यात यावं.
 
यूकेमध्ये, 2025 मध्ये ऑनलाइन सुरक्षा कायदा लागू होणार असून, मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी तंत्रज्ञान कंपन्यांना अधिक कारवाई करावी लागणार आहे.
 
मीडिया रेग्युलेटर ऑफकॉमने मे मध्ये टेक फर्मसाठी नवीन नियम लागू केले आहेत. यात त्यांनी वय-तपासणीचे ठोस उपाय आवश्यक असल्याचं आणि मुलांना हानिकारक गोष्टींपासून दूर ठेवणं आवश्यक असल्याचं म्हटलंय.
 
परंतु हानिकारक ऑनलाइन सामग्रीच्या संपर्कात आल्यानंतर मृत्यू झालेल्या मुलांच्या पालकांना वाटतं की नियम आणखीन कडक असेल पाहिजेत.
 
Published By- Dhanashri Naik