शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 18 जून 2024 (13:07 IST)

व्लादिमीर पुतिन 24 वर्षांत प्रथमच उत्तर कोरियाला भेट देणार, काय असणार उद्देश?

bladimir putin
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन 24 वर्षांत पहिल्यांदाच आज ( मंगळवारी ) उत्तर कोरियाला भेट देणार आहेत.
 
उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगमध्ये उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन आणि पुतिन यांची भेट होईल आणि हे दोन्ही नेते चर्चा करतील.
 
या दोन्ही नेत्यांची शेवटची भेट सप्टेंबरमध्ये रशियाच्या वॉस्तोश्नी कॉस्मोड्रोम शहरात झाली होती, परंतु 2000 सालानंतर पुतिन पहिल्यांदाच प्योंगयांगला भेट देणार आहेत.
 
अमेरिकेने म्हटलंय की, या दोन्ही नेत्यांच्या भेटीने चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
 
पण रशियाने या कार्यक्रमाचे वर्णन "मैत्रीपूर्ण भेट" असं केलं असून रशियन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पुतिन आणि किम यांची ही भेट सुरक्षा मुद्द्यांबाबत असणार आहे. यात दोन्ही देशांच्या भागीदारी करारावर स्वाक्षरी केली जाणार आहे.
 
पुतिन यांच्या भेटीदरम्यान किम इल सुंग चौकात परेड होण्याची शक्यता आहे. तसेच, पुतिन प्योंगयांगमधील एका संगीत कार्यक्रमाला भेट देतील. शिवाय उत्तर कोरियामधील एकमेव ऑर्थोडॉक्स चर्च, लाईफ-गिविंग ट्रिनिटीला भेट देतील अशी शक्यता आहे.
 
पुतिन प्योंगयांगमधील कुमसुसान अतिथीगृहात मुक्काम करणार असल्याचं वृत्त आहे.
 
2019 मध्ये चीनचे नेते शी जिनपिंग यांनी उत्तर कोरियाचा दौरा केला होता. तेव्हा ते याठिकाणी मुक्कामाला होते.
 
या भेटीसाठी पुतिन त्यांचे नवीन संरक्षण मंत्री, आंद्रेई बेलोसोव्ह यांच्यासोबत असतील असं अपेक्षित आहे. तर परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह आणि उपपंतप्रधान अलेक्झांडर नोव्हाक हे देखील शिष्टमंडळाचा भाग असतील.
 
रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या भेटीपूर्वी युक्रेनमधील रशियन युद्धाला "खंबीरपणे पाठिंबा दिल्याबद्दल" उत्तर कोरियाचे कौतुक केले आहे.
 
उत्तर कोरियाच्या सत्ताधारी पक्षाचे मुखपत्र असलेल्या रॉडोंग सिनमुनमध्ये छापलेल्या लेखात त्यांनी "अमेरिकेचा दबाव, ब्लॅकमेल आणि लष्करी धमक्या" असे शब्द वापरले आहेत. आणि तरीही उत्तर कोरियाच्या हितसंबंधांचे रक्षण करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याचे वचन दिले आहे.
 
त्यांनी उत्तर कोरियासोबत युरोपद्वारे नियंत्रित नसलेला व्यापार आणि सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्याचे वचन दिले आहे.
 
किम यांनी गेल्या आठवड्यात असं म्हटलं होतं की, त्यांचे रशियाबरोबरचे संबंध "कॉम्रेड-इन-आर्म्सच्या अतूट नातेसंबंधात विकसित झाले आहेत."
 
गेल्या वर्षी या दोन्ही नेत्यांच्या भेटीदरम्यान पुतिन म्हणाले होते की त्यांनी उत्तर कोरियाशी लष्करी सहकार्यासाठी 'शक्यता' पाहिली आहे. यावर किम यांनी रशियाच्या अध्यक्षांना युक्रेनमध्ये 'विजय' मिळावा अशा शुभेच्छा दिल्या होत्या.
 
व्हाईट हाऊसने आपल्या निवेदनात म्हटलंय की, रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील घनिष्ठ संबंधांमुळे अमेरिका चिंतित आहे.
 
राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, "आम्हाला पुतिन यांच्या दौऱ्याबद्दल कसलीही चिंता वाटत नाही. आम्हाला या दोन देशांमधील घट्ट होत जाणाऱ्या संबंधांची चिंता आहे."
 
2000 मध्ये पुतिन यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीच्या सुरूवातीलाच त्यांनी किमचे वडील, किम जोंग इल यांची भेट घेतली होती. आता रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून या दोन्ही देशांमधील संबंध वाढले आहेत.
 
उत्तर कोरियाने रशियाला दारूगोळा आणि इतर शस्त्रास्त्र पुरवल्याचा आरोप अमेरिका आणि दक्षिण कोरियाने केला होता. अन्न, लष्करी मदत आणि तंत्रज्ञानाच्या बदल्यात ही मदत करण्यात आली होती. मात्र उत्तर कोरिया आणि रशिया या दोघांनीही अशा मदतीचे दावे नाकारले आहेत.
 
उत्तर कोरियानंतर पुतिन व्हिएतनामला भेट देण्याची शक्यता आहे. हे दोन्ही देश व्यापारासारख्या मुद्द्यांवर चर्चा करतील अशी अपेक्षा आहे.
 
Published By- Dhanashri Naik