शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. इंटरव्ह्यू टिप्स
Written By
Last Updated : गुरूवार, 29 डिसेंबर 2022 (20:04 IST)

नोकरीसाठी मुलाखत असो वा 'स्टार्ट अप आयडिया पिच', 'स्टार' पद्धतीने सादर करा तुमची कौशल्यं

नव्या नोकरीसाठी मुलाखत असो किंवा तुमच्या स्टार्टअपसाठी निधी जमवण्यासाठी ( फंड रेजिंग) साठी तुम्हाला गुंतवणूकदारांसमोर पिच द्यायचे असो तिथे नेमकेपणाला, मोजकेपणाला अत्यंत महत्त्व असते.
 
केवळ याच ठिकाणी नाही तर जेव्हा तुम्ही काम करत असता तेव्हा देखील वार्षिक मूल्यांकनावेळी आपल्याला आपण काय काम केलं हे आपल्या वरिष्ठांसमोर सांगायचं असतं.
 
बऱ्याचदा आपण चांगलं काम करूनही हवा तो परिणाम मिळत नाही. योग्य अनुभव असूनही तुमची निवड होत नाही तेव्हा मनात नकारात्मकता तयार होते.
 
आणि अगदी तुम्ही यशाच्या जवळ आले असतानाच हाती घेतलेलं काम सोडावं वाटतं, असं का होतं, त्यासाठी अनेक कारणं असू शकतात. पण तुम्हाला जर सांगितलं की या सर्वावर एक उपाय आहे तर?
 
तुम्हाला एक अशी पद्धत सांगितली की ती वापरून तुम्ही जलद गतीने प्रगती साधू शकलात तर? ती पद्धत काय आहे आणि या पद्धतीने तुमची कौशल्यं सादर करण्याचे सोप्पं तंत्र तुम्हाला आम्ही या लेखातून सांगणार आहोत. बीबीसी बिटसाईजने याविषयी माहिती दिली आहे.
 
या पद्धतीचा वापर तुम्ही मुलाखत, अॅन्युअल रिव्ह्यू, फंड रेजिंग किंवा इतर मीटिंग दरम्यान देखील करू शकता.
 
कामाच्या ठिकाणी ऑफिसात उपयोगी पडतील अशी कौशल्यं आपल्या सगळ्यांकडे असतात. पण आपण नेमके कोणत्या गोष्टीत पारंगत आहोत हे तटस्थ माणसाला सांगणं आव्हानात्मक असतं.
 
जे नोकरी देणार आहेत त्यांना नवीन माणसाकडून जे अपेक्षित आहे त्यासाठी तुम्हीच चपखल माणूस आहात हे तुम्ही कसं समजावून सांगता?
 
स्टार प्रणाली
बऱ्याचदा आपल्याकडे आपल्या विषयाशी निगडित ज्ञान असतं पण ते मुलाखतीदरम्यान थोडक्यात कसं मांडावं याचं तंत्र आपल्याकडे नसतं.
 
कधीकधी आपल्याला वाटतं की स्वतःबद्दल चांगलं सांगणं म्हणजे फुशारकी मारण्यासारखं आहे. पण तसं स्वतःला न वाटू देता आपल्या इंटरव्यूवरला आपल्या बद्दल पुरेशी माहिती कशी मिळेल याकडे आपला कल असायला हवा. त्या डेटावर ते निर्णय घेऊ शकतील इतका पुरेसा डेटा त्यांना आपण आपल्याबद्दल पुरवायला हवा.
 
स्वत:बाबत चांगल्या गोष्टी सांगण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यापैकी एक म्हणजे स्टार प्रणाली. सीव्ही म्हणजे मुलाखतीवेळी तुम्ही तुमच्याबद्दल लिखित स्वरूपात जे सांगता त्यावेळी उपयोगी पडू शकतं.
 
तुम्ही विविधांगी लोकांची मोट बांधू शकत असाल तसंच वेळव्यवस्थापनात वाकबगार असाल तर ते योग्य शब्दात सांगणं आवश्यक आहे. मी अमूक करतो एवढं, त्रोटक सांगण्याऐवजी उदाहरणांच्या माध्यमातून ते स्पष्ट करायचं. याचे चार घटक असतात.
 
स्टार म्हणजे सिच्युएशन, टास्क, अॅक्शन, रिझल्ट. ( परिस्थिती, आपल्या समोरील काम, कृती आणि परिणाम)
 
1. सिच्युएशन म्हणजे परिस्थिती. एखादं टास्क दिलेलं असेल किंवा सादरीकरण असेल.
 
2. टास्क म्हणजे जी गोष्टी तुम्हाला साध्य करायची आहे.
 
3. अॅक्शन म्हणजे कृती आराखडा.
 
4. रिझल्ट- तुमच्या परिणामकारक कृतीमुळे अपेक्षित निकाल कसा मिळू शकला.
 
प्रत्येक घटकाबाबत बोलताना नेमक्या शब्दात मांडा. उदाहरणार्थ तुम्ही अवघड परिस्थितीत घेतलेल्या निर्णयामुळे तुम्हाला पुरस्कार मिळाला का?
 
फंडरेझिंग करताना सर्वाधिक रक्कम तुमच्यामुळे गोळा झाली का? तुमच्या चांगल्या वागण्यामुळे ग्राहक पुन्हा तुमच्याकडे आला का? तुमच्या सौजन्यशील वागण्यामुळे नव्या सदस्यांना टीममध्ये यावंसं वाटतं का? तुम्ही फरक घडवून आणलात हे दाखवण्यासाठी हा सगळा खटाटोप.
 
संदर्भानुसार स्वत:बद्दल किती माहिती द्यायची हे ठरतं. सीव्हीमध्ये तुमच्या गुणकौशल्यांबद्दल लिहायला मर्यादित जागा असू शकते. मुलाखतीदरम्यान बोलताना तुम्ही सविस्तरपणे सांगू शकता.
 
सीव्ही असो किंवा मुलाखत- पुरेशी माहिती द्या जेणेकरून तुमच्या कुवतीबद्दल समोरच्या मंडळींना अंदाज येईल. पण अतिशयोक्ती करू नका.
 
मी हे कसं करायचं?
हे करण्यासाठी तुमचा डिजिटल पोर्टफोलिओ तयार करा. तुम्ही आजवर कुठे कुठे काम केलंय, काय यश मिळवलंय, तुमच्या कामाची पुरस्काराने दखल घेतली आहे का ते सगळं यात येऊ द्या. यावर तुम्ही लगेच काम करू शकता.
 
तुमच्या कामाची वर्ड फाईल, पीडीएफ, इमेज हे तुम्ही कोलाज करुन मांडू शकता. तुम्हाला आता लगेच कुठे सीव्ही द्यायचा असेल तरी तुमच्या कामाचं दस्तावेजीकरण करणं कधीही चांगलं.
 
जेणेकरून तुम्ही आजवर जे काम केलंय तसंच आताच्या कंपनीत जे जे काम करताय ते एकगठ्ठा तुमच्यासमोर राहील.
 
सीव्ही लिहिताना तुम्ही याची लिंक देऊ शकता, मुलाखतीदरम्यान याचा संदर्भ देऊन लिंक पुरवू शकता.
 
स्टार प्रणालीद्वारे कौशल्यं सादर करणं
 
डिजिटल पोर्टफोलिओ संदर्भात काम करणाऱ्या 'अपस्किल मी' यांच्याशी बीबीसी बिटसाइजने संवाद साधला. त्यांनी, स्वत:ला परिणामकारकरीत्या कसं सादर करावं याची काही उदाहरणं त्यांनी आम्हाला दिली.
 
संवाद अत्यंत महत्त्वाचा
स्टार मेथड प्रत्यक्षात कशी वापरायची याचे एक उदाहरण आपण पाहू.
 
समंथा शनिवारी एका रिटेल स्टोअरमध्ये पार्ट टाईम काम करते. यासाठी 'कम्युनिकेशन स्किल' म्हणजेच संवाद कौशल्य उत्तम असणं अत्यावश्यक आहे.
 
समजा समंथा एका रिटेल चेनच्या मॅनेजरच्या मुलाखतीसाठी गेली आणि तिला विचारलं की एखादी कठीण परिस्थिती तुम्ही कशी हाताळली हे आम्हाला सांगा.
 
तिच्यासाठी स्टार मेथड कशी कामी येते ते पाहूया.
 
सिच्युएशन ( परिस्थिती)
रिटेल स्टोअरसाठी मी शनिवारी काम करते. एकदा एक नाराज आणि रागावलेली महिला दुकानात आली. तिला एक विशिष्ट वस्तू हवी होती. ती वस्तू आमच्या स्टॉकमध्ये नव्हती. तिला ती वस्तू खरेदी करायची होती.
women career
टास्क
वस्तू आमच्याकडे नाही हे त्या महिलेला सांगायचं होतं, त्याचवेळी तिला शांत करत ती वस्तू अन्य कोणत्या मार्गे तिच्यापर्यंत पोहोचवू शकतो हे पाहायचं होतं. तिच्यासाठी ती वस्तू महत्त्वाची आहे हे समजून घेणं आवश्यक होतं.
 
अॅक्शन
ती वस्तू मिळावी यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन हे मी त्या महिलेला सांगितलं. मी आता काय काय करणार आहे ते तिला सांगितलं.
 
आमच्या अन्य स्टोअर्समध्ये ती वस्तू शिल्लक आहे का ते चेक केलं. ती वस्तू ऑनलाईन मागवता येईल का तेही पाहिलं. नशिबाने आमच्या अन्य दुकानात ती वस्तू उपलब्ध होती. मी त्यांना ती वस्तू या महिलेकरता राखून ठेवायला सांगितलं.
 
रिझल्ट
 
त्या ग्राहक महिलेला ती वस्तू दुपारी आमच्याच अन्य दुकानात मिळाली. पुढच्या आठवडयात त्यांनी आमच्या दुकानात येऊन माझे आभार मानले.
 
तिने माझ्याबद्दल सकारात्मक फीडबॅक माझ्या मॅनेजरला दिला. मॅनेजरने मला एम्प्लॉयी ऑफ द मंथ पुरस्काराने मला गौरवलं.
 
थोडक्यात तिने एका प्रसंगातून या कामासाठी आपल्याडे कोणती कौशल्यं आहेत ते सांगितलं.
 
प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ( प्रश्नांची उकल करणे)
संवाद कौशल्य उत्तम असणे ही तर एक चांगलीच गोष्ट आहे पण आपण कठीण परिस्थितीत निर्णय कसे घेतो, हे सांगता येणे देखील महत्त्वाचे आहे. स्टार पद्धत वापरून आपण हे कसे करू शकतो हे आपण पाहू.
 
जेमी आणि त्याचे सहकारी 'ड्यूक ऑफ एडिनबर्ग' पुरस्कार सोहळ्यासाठी निघाले पण ते वाटेत हरवले. ग्रुपचा लीडर या नात्याने जेमीला यातून सगळ्यांना सुरक्षित ठिकाणी आणणं ही जबाबदारी होती. त्याने नेमकं काय केलं हे सांगितलं.
 
सिच्युएशन
ड्यूक ऑफ एडिनबर्ग पुरस्कारासाठी जाताना मी आणि माझी टीम मार्ग चुकलो आणि भरकटलो.
 
टास्क
टीम लीडर या नात्याने आम्ही सगळे सुरक्षित आहोत याची जबाबदारी माझ्यावर होती. नकाशा शोधून त्यानुसार पुन्हा योग्य ठिकाणी परतणं आवश्यक होतं. परतीचा सुरक्षित मार्ग कोणता हेही पाहणं आवश्यक होतं.
 
अॅक्शन
मी टीमला एकत्र केलं आणि आता पुढे आपण काय करणार आहोत ते सांगितलं. नकाशाद्वारे मी परतीचा मार्ग त्यांना समजावून सांगितला. बॅकअप पर्याय म्हणून ज्या मार्गाने जातोय त्यावर रस्त्याच्या बाजूला दगड ठेवायला सांगितले.
 
रिझल्ट
मी आणि माझी टीम सुरक्षितपणे योग्य ठिकाणी पोहोचलो. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यामुळे मला संयमाचं महत्त्व कळलं. टीम म्हणून आमची एकजूट घट्ट झाली. प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्याने माझा सन्मान करण्यात आला.
 
असे अनेक प्रसंग तुमच्या देखील करिअरमध्ये किंवा दैनंदिन आयुष्यात आले असतील. तेच प्रसंग योग्य शब्दांत तुम्हाला मांडायचे आहेत.
 
टीमवर्क (सांघिक वृत्ती)
करिअरमध्ये आणखी एक महत्त्वाचं सॉफ्टस्किल आहे ते म्हणजे टीमवर्क. कदाचित तुम्ही एकटे खूप चांगलं काम करू शकत असाल पण टीमसोबत तुम्ही कसे काम करता हे देखील तपासलं जातं.
 
अशा प्रोफाइलसाठी जर तुम्ही अर्ज केला असेल तर स्टार पद्धत कशी वापरायची हे आपण पाहू. मानसिक आरोग्यासंदर्भात जागरुकतेसाठी निधी उभारणीसाठी कीरन आणि त्याच्या मित्रांनी चॅरिटी इव्हेंट आयोजित केला होता.
 
कीरनने टीमला एकत्र आणलं. प्रत्येकाची आवड आणि कौशल्यं ओळखून त्यांना कामं वाटून दिली. जेव्हा कोणाला गरज लागेल तेव्हा सगळे एकमेकांना मदत करतील हे पाहिलं. त्याने टीमवर्क कसं निर्माण केलं ते पाहूया.
 
सिच्युएशन
 
मला आणि माझ्या मित्राला चॅरिटी इव्हेंट आयोजित करायचा होता. यातून पैसे जमा करायचे होते.
 
टास्क
सगळा कार्यक्रम नीट व्हावा यासाठी आम्ही छोटी छोटी कामं वाटून घेतली.
 
अॅक्शन
आम्ही एक यादीच तयार केली. कोणतं काम कोणाला करायला आवडेल हे सांगितलं. त्यानुसार कामांचं वाटप केलं. ते लिहून काढलं. एखाद्याला काही गरज लागली तर सपोर्टला एक माणूस उपलब्ध करुन दिला.
 
रिझल्ट
चॅरिटी इव्हेंट उत्तम झाला. डोनेशनचं जे टार्गेट होतं त्यापेक्षा आम्ही जास्त रक्कम गोळा करू शकलो. आमची ताकद काय ते लक्षात आलं. आम्ही अनेक नव्या गोष्टी शिकलो. आम्ही एकत्र कामाचा आनंद लुटला.
 
इनोव्हेशन ( कल्पकता)
झाहराचे आजोबा शहरातल्या एका गर्दीभरल्या रस्त्यावर कॉफीशॉप चालवतात. पण चांगलं मार्केटिंग नसल्याने त्यांचे ग्राहक कमी होत चालले होते.
 
झाहराने इनोव्हेटिव तंत्राचा अवलंब केला. तिने सोशल मीडिया पेज सुरू केलं.
 
सिच्युएशन
आजोबांचं कॉफीशॉप चांगलं चालत नव्हतं. त्या दुकानात काय काय मिळतं हे ग्राहकांपर्यंत पुरेसं पोहचलंच नव्हतं.
 
टास्क
कॉफीशॉपबद्दल ब्रँड अवेअरेनस वाढीस लागावा, नवे ग्राहक यावेत विशेषत: वीकेंड ब्रंच मेन्यूसाठी याकरता ते गरजेचं होतं.
 
अॅक्शन
बाकी कॉफीशॉप्स, हॉटेल्स सोशल मीडिया पेजद्वारे आपलं मार्केटिंग करतात हे मला समजलं होतं. यंग ऑडियन्सपर्यंत पोहोचण्याचा तो उत्तम मार्ग होता.
 
मी कॉफीशॉपचे फोटो घेतले, आमच्याकडे मिळणाऱ्या पदार्थांचे चांगले फोटो घेतले. कॉफीशॉपचा एक नवा लोगो तयार केला. कॉफीशॉपचं सोशल मीडिया पेज तयार केलं.
 
त्यावर सगळं कंटेट अपलोड केलं. स्पेशल डील इव्हेंट आयोजित केला जेणेकरून कॉफीशॉप ऑनलाईन सेवाही देतं हे कळू शकेल.
 
रिझल्ट
सोशल मीडिया पेजला भरभरुन प्रतिसाद मिळाला. ब्रांचची ऑर्डर 50 टक्क्यांनी वाढली. सेल्स 60 टक्क्यांनी वाढला.
 
आजोबांनी कॉफीशॉपची सगळी सोशल मीडिया हँडल्स मलाच चालवायला दिली. या प्रोजेक्टमुळे मला वेगळाच आत्मविश्वास मिळाला. पुढच्या प्रोजेक्टसाठी आणखी नवं काय करता येईल यासाठी मेंदूला खाद्य मिळालं.
 
क्रिएटिव्हिटी (सर्जनशीलता)
फॅशन डिझायनर होणं हे रियाचं स्वप्न होतं. शाळेतल्या करिअर डे दिनी तिने एका प्रसिद्ध फॅशन डिझायनरचं भाषण ऐकलं. आपलीही मिनी फॅशन लाईन असावी असं तिला वाटलं. तिने काय केलं पाहूया.
 
सिच्युएशन
मला फॅशन डिझायनरला व्हायचं आहे. फॅशन इंडस्ट्रीबद्दल मला कुतूहल आहे. फॅशन डिझायनरच्या भाषणाने मी प्रेरित झाले. माझ्या क्रिएटिव्ह आयडिया मला लोकांसमोर मांडायच्या आहेत.
 
टास्क
मी स्वतचा टीशर्ट लाईन सुरू केली जेणेकरुन मला काम करतानाचा अनुभव मिळेल. पोर्टफोलिओ करेन तेव्हा या कामाचा उल्लेख करता येईल.
 
अॅक्शन
मी डिझायन्स तयार केले आणि फीडबॅक विचारला. कुठल्या गोष्टी लोकप्रिय आहेत ते जाणून घेतलं. माझं मटेरिअल विकत घेईल असा रिटेलर शोधला. माझं शिवण कामाचं कौशल्य कामी आणून टीशर्ट तयार केले. विविध आकारांचे टीशर्ट तयार झाले. माझ्या ब्रँडबद्दल कळावं यासाठी मी सोशल मीडिया पेज तयार केलं. जेणेकरून आणखी ग्राहक टीशर्ट खरेदी करतील.
 
रिझल्ट
मी शिल्लक टीशर्ट ऑनलाईन विकू शकले. काही ग्राहकांनी कस्टमाईज्ड टीशर्टसाठी ऑर्डर दिली. क्रिएटिव्ह गोष्टी करताना आनंद मिळतो. मला एक करिअरचा पर्याय खुला झाला. फॅशन मध्येच करिअर करावं हा विचार पक्का झाला.
 
वरील विविध उदाहरणांवरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपलं कौशल्यं सादर करण्यासाठी, त्यांची मांडणी करण्यासाठी नेमकं काय सांगायचं. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल तरी सुद्धा ही पद्धत लागू होते.
 
तुम्ही मोजकेपणाने बोलू शकला तर तुमच्याविषयीचा आदर द्विगुणित होऊन तुम्हाला ती नोकरी मिळू शकते.
Published By -Smita Joshi