मंगळवार, 15 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2020
Written By
Last Modified: सोमवार, 21 सप्टेंबर 2020 (10:40 IST)

चुकीच्या व्यक्तीला दिला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार

अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेला सामना, विजयासाठी शेवटच्या षटकांत हव्या असलेल्या धावा, फलंदाजांनी फटकेबाजी असा उत्कंठावर्धक माहोल प्रेक्षकांना आयपीएलच्या तेराव्या हंगामातील दुसऱ्याच सामन्यात पहायला मिळाला आहे. दुबईच्या मैदानावर रंगलेल्या दिल्ली विरुद्ध पंजाब सामन्यात, दिल्लीने सुपरओव्हरमध्ये बाजी मारली पंजाबला विजयासाठी १५८ धावांचं आव्हान दिलेलं असताना, दिल्लीने अखेरच्या षटकांत सामना बरोबरीत राखण्यात यश मिळवलं. निर्धारित वेळेत सामना बरोबरीत सुटल्यामुळे सामन्याचा निकाल सुपरओव्हरवर गेला.
 
आयपीएलच्या इतिहासातली ही दहावी सुपरओव्हर ठरली. कगिसो रबाडा ने भेदक मारा करत पंजाबच्या दोन फलंदाजांना माघारी धाडत अवघ्या २ धावा दिल्या. त्यामुळे विजयासाठी आवश्यक असलेल्या ३ धावा सहज पूर्ण करत दिल्लीने सामन्यात बाजी मारली. या सामन्यामध्ये दिल्लीने विजय मिळवल्यानंतर मार्कस स्टॉयनीसला समानावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) ने सामन्याच्या पंचांना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार द्यायला हवा, असा उपरोधक टोला ट्विटवरुन लगावला आहे.
 
सेहवाग कोणत्या निर्णयावर संतापला?
पंजाब धावांचा पाठलाग करत असताना १८ व्या षटकात क्रिस जॉर्डन (Chris Jordan) ने काढलेल्या दोन धावांपैकी एक धाव पंचांनी शॉर्ट रन म्हणजे फलंदाजाने बॅट पूर्णपणे क्रिजमध्ये न टेकवल्याने ग्राह्य धरली जाणार नाही असं जाहीर केलं. मात्र रिप्लेमध्ये जॉर्डनने क्रिजच्या आतमध्ये बॅट टेकवल्याने दिसत होते. त्यामुळेच याच रिप्लेच्या स्क्रीनशॉर्टमधील बॅट क्रिजमध्ये टेकवल्याचा फोटो पोस्ट करत सेहवागने नाराजी व्यक्त केली आहे. “मला आजच्या समन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटलेला नाही. ज्या पंचांनी ही धाव शॉर्ट रन घोषित केली त्यांना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार द्यायला हवा. हा शॉर्ट रन नव्हता. आणि याच एका धावेचा फरक नंतर पडला,” असं ट्विट सेहवागने केलं आहे.