पंजाबला आज दिल्लीचे खडतर आव्हान
गतविजेत्या मुंबईविरुध्दच्या रोमांचक विजयाने पंजाबचे मनोबल वाढलेले असेल. मात्र आता कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरलेल्या या संघाचा मार्ग सोपा नसणार आहे. कारण आज (मंगळवारी) आयपीएलच्या सामन्यात त्यांना गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या दिल्लीशी भिडावे लागणार आहे.
स्पर्धेत सर्वाधिक धावसंख्या करणारे सलामीवीर फलंदाज लोकेश राहुल व मयंक अग्रवाल यांच उपस्थितीनंतरही पंजाबला अनेक सामन्यांमध्ये विजयासाठी संघर्ष करावा लागला आहे. ख्रिस गेलच्या यशस्वी पुनरागनामुळे सलामीवीरांवरील दबाव कमी झाला आहे. विशेषकरून राहुल आता अधिक मोकळेपणाने खेळू शकेल. निकोलस पुरनने आपण काय करू शकतो, हे दाखवून दिले आहे. मात्र त्याने सामना जिंकून देणारी खेळी केलेली नाही. फलंदाजाच्या रूपात ग्लेन मॅक्सवेलवर दबाव वाढत आहे. मात्र तो उपयुक्त फिरकीपटू म्हणून सिध्द झाला आहे. दिल्लीविरुध्दच्या सामन्यात त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे दिल्लीचा संघ यंदा स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ बनला आहे. शनिवारी चेन्नईविरुध्द त्यांनी रोमांचक विजय नोंदवल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला असेल. पृथ्वी शॉ काही सामन्यांमध्ये शुन्यावर बाद झाला आहे. तो मोठी खेळी खेळण्यासाठी उत्सुक असेल तर शिखर धवनला सूर गवसला आहे. दिल्लीने नऊपैकी सात सामन्यांमध्ये विजय नोंदवला आहे. अक्षर पटेलने अष्टपैलू कामगिरी केली आहे तर दिल्लीने उत्कृष्ट गोलंदाजीसह दाखवून दिले आहे की, ते की धावसंख्येचाही बचाव करू शकतात. पंतच्या अनुपस्थितीत संधी मिळालेल्या अजय रहाणेला प्रभाव पाडण्यासाठी फारसा वेळ शिल्लक राहिलेला नाही. दोन्ही संघातील मागील सामना सुपरओव्हरमध्ये पोहोचला होता. त्यामुळे दिल्लीपेक्षा पंजाबचा संघ असे पुन्हा घडू नये यासाठी प्रार्थना करत असेल.
सामन्याची वेळ
संधकाळी 7.30 वाजता