शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2020
Written By
Last Modified: शनिवार, 19 सप्टेंबर 2020 (11:55 IST)

IPL 2020 : कोव्हिड-19 संकटादरम्यान खेळाडूंसमोर मोठी अडचण कोणती?

IPL 2020- कोरोना व्हायरसच्या (coronavirus)साथीमुळे IPL साठी खबरदारीचे सर्व उपाय लागू करण्यात आलेले आहेत. यामध्ये खेळाडूंना सुरक्षित अशा बायो-बबलमध्ये ठेवण्यापासून इतर प्रकारच्या उपाययोजनांचा समावेश आहे.कोव्हिड-19 संकटादरम्यान खेळाडूंसमोर इतर अनेक अडचणी असणार आहेत. अबु धाबी, शारजा आणि दुबई या तीन शहरांमधलं उष्ण व दमट वातावरण खेळाडूंसाठी अडचणीचं ठरणार आहे. खेळाडूंना या भागात अनेक ठिकाणी 40 अंश सेल्सियसपेक्षाही जास्त तापमानात खेळावं लागणार आहे.
 
या अडचणींचा उल्लेख रॉयल चॅलेंजर्सचा स्टार खेळाडू एबी डिव्हिलियर्स याने ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हीडिओत केला आहे.
 
डिव्हिलियर्स म्हणाला, "प्रामाणिकपणे सांगायचं तर या प्रकारच्या परिस्थितीत खेळण्याचा मला अनुभव नाही. इथं प्रचंड ऊन आहे. या वातावरणामुळे मला जुलै महिन्यात खेळलेल्या एका कसोटी सामन्याची आठवण येत आहे. त्या सामन्यात विरेंद्र सेहवागने आमच्याविरुद्ध त्रिशतक ठोकलं होतं. आयुष्यात त्यापेक्षा जास्त उष्णतेचा अनुभव आम्हाला कधीच आला नव्हता."
 
संयुक्त अरब अमिरातीमध्ये बऱ्याच काळापासून एका स्पोर्ट्स चॅनलमध्ये काम करत असलेले ज्येष्ठ पत्रकार नीरज झा तिथल्या अडचणींबाबत सांगतात, "इथं तापमान 40 डिग्रीपेक्षा जास्त असतं. सोबतच स्टेडियमबाहेरील वाळूच्या मैदानांमुळे जास्त अडचण होते.
 
वाळूतील उष्णतेमुळे आजूबाजूच्या परिसरातील उष्णताही प्रचंड वाढते. या परिस्थितीशी जुळवून घेणं, खेळाडूंसाठी(IPL 2020) मोठं आव्हान असणार आहे.उष्णतेसोबतच समुद्रकिनाऱ्यावर ही शहरं असल्यामुळे याठिकाणी आर्द्रतेची पातळीही जास्त असते. तिन्ही शहरांमध्ये आर्द्रतेची पातळी 70 टक्के असू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या परिस्थितीत खेळाडूंना डिहाड्रेशन होण्याचा धोका आहे.