रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

फेसबुक ने सांगितले आम्ही युजर्सचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी बदल केले

फेसबुकवरील डेटा चोरीसंदर्भात केंद्र सरकारने पाठवलेल्या नोटीसवर अखेर फेसबुकने उत्तर दिले आहे. आम्ही युजर्सचा डेटा सुरक्षित राहावा, यासाठी अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत, असे उत्तर फेसबुकने दिले आहे. तर केंब्रिज अॅनालिटिका या कंपनीने अद्याप केंद्राला प्रतिसाद दिलेला नाही.
 
केंब्रिज अॅनालिटिका या ब्रिटिश कंपनीने अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत फेसबुकवरील युजर्सचा डेटा चोरल्याचे समोर आले होते. या कंपनीने गैरमार्गाने ८.७ कोटी फेसबुक युजर्सची माहिती गोळा केली होती. यामुळे फेसबुकच्या अडचणी वाढल्या होत्या. डेटा चोरीच्या प्रकरणामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आणि फेसबुकच्या विश्वासार्हतेला तडा गेला.
 
केंद्र सरकारने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात फेसबुक आणि केंब्रिज अॅनालिटिका या कंपनीला नोटीस बजावली होती. युजर्सची माहिती फुटू नये, यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांचा तपशील सरकारने मागितला होता. या नोटीसला उत्तर देण्यासाठी फेसबुकला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. अखेर फेसबुकने केंद्र सरकारला उत्तर दिले आहे. फेसबुकने नेमक्या काय उपाययोजना राबवल्या आहेत, याचा तपशील समजू शकलेला नाही. पण ‘आम्ही युजर्सचा डेटा सुरक्षित राहावा, यासाठी अनेक बदल केले आहेत’, असे फेसबुकने ईमेलमध्ये म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले.