गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. जन्माष्टमी
Written By
Last Updated : मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (08:19 IST)

'दहीहंडी' महत्व आणि इतिहास

श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मोठ्या उत्साहात गोकुळाष्टमी म्हणजे कृष्ण जन्म दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने गोपाळकाला किंवा दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. दहीहंडी का साजरी केली जाते याबद्दल जाणून घ्या- 
 
बाळगोपाळ श्रीकृष्णाच्या जन्मानिमित्ताने दहीहंडी मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जाते. श्रीकृष्णाला बालपणी दही, दूध, लोणी या पदार्थांची आवड होती. कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे यासाठी यशोदा दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवत असे पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहचण्यात यशस्वी होत असे. यासाठी त्याचे, मित्र त्याला मदत करत असत. या घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो.
 
दहीहंडीच्यावेळी तरुण एक संघ तयार करून त्यात सहभागी होतात. विविध मंडळे या उत्सवादरम्यान उंचावर दह्याने भरलेली हंडी (छोट्या आकाराचे मडके) लावतात. ही हंडी तरुणांची विविध मंडळे फोडण्याचा प्रयत्न करतात. हा एक प्रकारचा खेळ आहे. ज्यात बक्षिसही दिले जाते. यावेळी ‘गोविंदा आला रे’ च्या घोषणांनी आजूबाजूचा परिसर दुमदुमून जातो. भारतातील विविध ठिकाणे वेगवेगळ्या धार्मिक परंपरेनुसार दहीहंडी साजरी करण्यात येते.
 
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचे आयोजन केले जाते. या दिवशी मातीच्या मडक्यात दही, लोणी, मिठाई, फळे इत्यादी भरुन एका उंच ठिकाणी हे मडके टांगले जाते. हंडी फोडण्यासाठी विविध तरुण मंडळी प्रयत्न करतात. दहीहंडी फोडण्यासाठी विविध मंडळातील तरुण एक दुसऱ्याच्या पाठीवर चढून मानवी मनोरा तयार करतात. या मनोऱ्याच्या सर्वात वरच्या थरावर असतो त्याला गोविंदा म्हणतात. तो सर्व थर पार करता आपला तोल सांभाळत हंडी फोडतो. हंडी फोडणाऱ्या मंडळांना विविध भेटवस्तू देऊन गौरविण्यात येते. मुलांप्रमाणेच मुली देखील धाडस दाखवून थरांवर थर लावून हंडी फोडतात.
 
श्रीकृष्णाने काजमंडळात गायी चारताना स्वत:ची व सवंगड्यांच्या घरून आणलेल्या शिदोर्‍या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला करुन सर्वांसह भक्षण करत असे. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्‍या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली.