प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लढणार?
वंचित बहुजन आघाडीची स्थापना करून राज्य पिंजून काढणारे व काँग्रेस-राष्ट्रवादीशी अंतर राखून असलेले भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीला दुसरा धक्का दिला आहे. आंबेडकर यांनी आगामी लोकसभा निवडणूक सोलापूरमधून लढण्याचा निर्णय घेतला आहे. तसे झाल्यास त्यांची टक्कर काँग्रेसचे संभाव्य उमेदवार व ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याशी होणार असून त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे.
अकोला येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी तसे संकेत दिले. 'मी आजतरी सोलापुरातून लढण्यावर ठाम आहे. उद्याचे सांगता येणार नाही,' असेही त्यांनी यावेळी सांगितले. आंबेडकरांच्या या वक्तव्यामुळे संभ्रम कायम आहे. ते अकोला आणि सोलापूर अशा दोन्ही मतदारसंघांतून लढू शकतात, असेही बोलले जात आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएशी युती करून बहुजन वंचित आघाडी स्थापन केली आहे. त्यांच्या सभांना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ही वंचित बहुजन आघाडी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतांचे विभाजन करण्याची शक्यता असल्याने प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आणण्याच्या जोरदार हालचाली सुरू होत्या. मात्र, लोकसभेच्या 12 जागा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राज्यघटनेच्या चौकटीत आणण्याची अट घालून त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची गोची करून टाकली. असे असतानाही काँग्रेस-राष्ट्रवादीने आंबेडकरांचे मन वळवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला होता. प्रकाश आंबेडकरपूर्वी खासदार असलेल्या अकोल्याची जागा सोडण्याची तयारीही दाखवण्यात आली होती. मत्र, आता त्यांनी सोलापूरमधून लढण्याची तयारी केल्याचे समजते. आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग सोलापुरात असल्याचे मानले जाते. हे लक्षात घेऊनच भारिपने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. सोलापूरमधून काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे हे निवडणूक लढवणार आहेत. मागील वेळेस मोदी लाटेत शिंदे यांचा पराभव झाला होता. यावेळी पुन्हा ही जागा काँग्रेसच्या खात्यात येईल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांना होता. मात्र, अचानक आंबेडकरांचे नाव पुढे आल्याने काँग्रेसच्या चिंतेत भर पडली आहे.