रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 26 मार्च 2019 (16:51 IST)

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी वैशाली यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, लोकवर्गणी गोळा करत निवडणूक लढवणार

यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघातून  प्रहार संघटनेच्या उमेदवार व साहित्य संमेलनात शेतकरी वर्गाच्या व्यथा स्पष्टपणे मांडणाऱ्या  वैशाली येडे यांनी उमेदवारी अर्ज  दाखल केला आहे.  प्रहार कार्यकर्त्यानी रक्तदान करून त्यांचा अर्ज दाखल केला आहे , वैशाली येडे च्या प्रचारासाठी झोळी फिरवून लोकवर्गणी गोळा करणार असल्याचे सांगितले आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे यांना प्रहार जनशक्ती पक्षाने यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेस निवडणूक आयोगाने नुकतीच प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता दिली. त्यानंतर शेतकऱ्यांचा आवाज संसदेपर्यंत पोहोचवण्यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील व्यक्तीलाच उमेदवारी मिळावी, या भूमिकेतून आमदार बच्चू कडू यांनी वैशाली येडे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पक्षाने दिली होती. वैशाली येडे यांच्या पतीने सात वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यांना दोन मुले असून त्यांच्याकडे तीन एकर शेती आहे. त्या सध्या कळंब तालुक्यातील राजूर येथे अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करतात. 
 
यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे. या मतदारसंघासाठी आज (दि. 25) शेवटच्या दिवशी 26 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आतापर्यंत 37 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहे. 
 
नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी 18 मार्च रोजी दोन उमेदवारांनी, 20 मार्च रोजी दोन उमेदवारांनी, 22 मार्च रोजी 7 उमेदवारांनी आणि शेवटच्या दिवशी 25 मार्च रोजी 26 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. आतापर्यंत 37 उमेदवारांनी एकूण 51 नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.