नाशिक जिल्ह्यातील लोकसभा मतदार संघ रिपोर्ट
नाशिक : भारत निवडणूक आयोगाकडून लवकरच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदार संघांवर अक दृष्टीक्षेप
नाशिक जिल्ह्यात लोकसभेकरिता 20-दिंडोरी, 21-नाशिक व 02-धुळे (अंशत:) हे मतदार संघ समाविष्ट होतात. 20-दिंडोरी लोकसभा मतदार संघामध्ये 113-नांदगाव, 117 कळवण, 118-चांदवड, 119-येवला, 121-निफाड, 122-दिंडोरी हे विधानसभा मतदार संघ समाविष्ट होतात. 20-दिंडोरी लोकसभा मतदार संघ अनुसूचित जमातीकरिता राखीव असून सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 65.66 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजविला होता.
21-नाशिक लोकसभा मतदार संघामध्ये 120-सिन्नर, 123 नाशिक पूर्व, 124-नाशिक मध्य, 125-नाशिक पश्चिम, 126-देवळाली व 127-इगतपुरी हे विधानसभा मतदार संघ समाविष्ट होतात. सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदार संघामध्ये 59.43 टक्के मतदारांनी मतदानाचा अधिकार बजविला होता.
02-धुळे लोकसभा मतदार संघामध्ये नाशिक जिल्ह्यातील 114-मालेगाव मध्य, 115-मालेगाव बाह्य व116- बागलाण हे 3 विधानसभा मतदार संघ समाविष्ट आहेत.
भारत निवडणूक आयोगाकडील अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी जलज शर्मा हे नाशिक व धुळे लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. तर अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधी हे दिंडोरी लोकसभा मतदार संघाकरिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. तसेच प्रत्येक विधानसभा मतदार संघाकरिता भारत निवडणूक आयोगाकडील अधिसूचनेनुसार सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी निश्चित करण्यात आले आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मान्यतेने सदर पदावरील बहुतांश अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.
एकंदरीत भारत निवडणूक आयोग यांचेकडील मार्गदर्शक सूचनांनुसार बदल्यानंतर नाशिक जिल्ह्यात बहुतांश निवडणूक संबंधित कामकाजाकरिता अधिकारी नियुक्त करण्यात आलेले असून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 करिता नाशिक जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांचे नेतृत्वाखाली सज्ज आहे.
Edited by: Ratnadeep Ranshoor