गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By वार्ता|

दिग्गजांचे भवितव्य ठरणार दुसर्‍या टप्प्यात

राज्यात दुसर्‍या टप्प्यातील मतदान २३ एप्रिलला होत असून त्यासाठीचा प्रचार आज समाप्त झाला. या टप्प्यात २५ मतदारसंघात मतदान होत असून अनेक 'हेवीवेट' नेत्यांचे भवितव्य २३ तारखेला ठरणार आहे.

या टप्प्यात कोकणातील दोन, मराठवाड्यातील पाच, उत्तर महाराष्ट्रातील आठ, पश्चिम महाराष्ट्रातील दहा मतदारसंघात मतदान होईल. तीन कोटी ७७ लाख ५९ हजार मतदार ३७७ उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. राज्याचे तीन माजी मुख्यमंत्री, अनेक पक्षांचे बडे नेते व काहींचे सगेसोयरे यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होईल. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय उर्जा मंत्री सुशीलकुमार शिंदे, अल्पसंख्याक खात्याचे मंत्री ए.आर. अंतुले यांचा समावेश आहे.

याशिवाय माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे (बीड), शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे (बारामती), माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितीश (रत्नागिरी), माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले (सातारा), संभाजी राजे (कोल्हापूर) हे प्रमुख उमेदवार आहेत.

या टप्प्यात सर्वाधिक उमेदवार बहूजन समाज पक्षाचे (२५) आहेत. यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे १४, भाजपचे १३, कॉंग्रेसचे दहा, समाजवादी पक्षाचे तीन, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक, दोन्ही कम्युनिस्ट पक्षांचे प्रत्येकी एक असे पक्षीय उमेदवार आहेत.

या टप्प्यातील नऊ मतदारसंघात १६ पेक्षा जास्त उमेदवार आहेत. त्यामुळे तिथे इलेक्ट्रॉनिक मशीन्स जास्त लागणार आहेत. सर्वांधिक म्हणडे ३६ उमेदवार पुण्यात आहेत. उस्मानाबादमध्ये २५, औरंगाबाद, जालना, रावेर येथे १९ उमेदवार आहेत. लातूर, मावळमध्ये १८, बारामती व शिरडीमध्ये १७ उमेदवार आहेत.

राज्यात पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानाला तीव्र उन्हाचा फटका बसला होता, दुसर्‍या टप्प्यावरही उन्हाचा परिणाम जाणवेल असे वाटते आहे. पहिल्या टप्प्यात जेमते ५४ टक्के मतदान झाले होते.