दुसर्या टप्प्यासाठी गुरूवारी मतदान
लोकसभा निवडणुकीच्या दुसर्या टप्प्यासाठी गुरूवारी (ता. २२) बारा राज्ये व केंद्र शासित प्रदेशातील १४० मतदारसंघात मतदान होत आहे. १९ कोटी ४८ लाखांहून अधिक मतदार २०४१ उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. या टप्प्यात महाराष्ट्रातील २५, आंध्र प्रदेशातील २०, उत्तर प्रदेशातील १७, मध्य प्रदेशातील १३, बिहारमधील १३, आसाममधील ११, ओरीसातील ११, झारखंडमधील ८, गोव्यातील २, त्रिपुरातील २ व जम्मू-काश्मीरमधील एका जागेसाठी मतदान होईल. मणिपुरच्या एका जागेसाठी आज मतदान झाले. दुसर्या टप्पयात जार्ज फर्नांडिस (मुजफ्फरपुर), राहुल गांधी(अमेठी), सुषमा स्वराज (विदिशा), शरद पवार (माढा), सुप्रिया सुळे (बारामती), रामविलास पासवान, (हाजीपुर) लालू प्रसाद यांचे मेव्हणे साधु यादव ( पश्चिम चंपारण), विनय कटियार (आंबेडकरनगर), गोपीनाथ मुंडे (बीड), सुरेश कलमाडी ( पुणे), प्रकाश झा (पश्चिम चंपारण) यांचे भवितव्य ठरेल. दुसर्या टप्प्यात सर्वाधिक उमेदवार बहूजन समाज पक्षाचे आहेत. १२२ उमेदवार या पक्षाचे आहेत. कॉंग्रेसचे ११७, भाजपचे ११३, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे २३, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे १७, राष्ट्रीय जनता दलाचे १५ व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ९ उमेदवार आहेत.