गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By भाषा|

पंतप्रधान आणि मी? शक्य नाही- पवार

'र्‍हदयात महाराष्ट्र व नजरेसमोर राष्ट्र' ठेवणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नजरेसमोर अगदी आताआतापर्यंत असलेले पंतप्रधानपदाचे स्वप्न अखेर दिवास्वप्नच ठरले आहे. खुद्द पवारांनीच त्याची कबुली सीएनएन-आयबीएनला दिलेल्या मुलाखतीत दिली.

पवारांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न जगजाहिर होते. यावेळी त्यांनी स्वतःच तशी इच्छा प्रकटही केली होती. साहेबांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, कार्यकर्तेही प्रयत्नाला लागले होते. त्यासाठी 'ह्रदयात महाराष्ट्र व नजरेसमोर राष्ट्र' अशी घोषणाही देण्यात आली. पण दिल्लीतील सत्तेच्या साठमारीत पंतप्रधानपदाचे वीस-बावीस उमेदवार असल्याचे लक्षात येताच, हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे, ही बाब लक्षात आली आणि पवारांनीच या स्पर्धेतून माघार घेऊन टाकली.

आम्ही जेमतेम चाळीस जागांवर लढत आहोत. आणि त्यातून निवडून येणार्‍या खासदारांच्या तुटपुंज्या बळावर पंतप्रधानपद मिळवता येणार नाही, हे स्पष्ट आहे असे सांगून, महत्त्वाकांक्षा ही वेगळी गोष्ट आहे आणि प्रत्यक्षातली परिस्थितीही काही वेगळीच आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. अर्थात हे सांगताना या पदाची आपल्याला महत्त्वाकांक्षा आहेच हे सांगायला ते विसरले नाहीत.

मध्यंतरी अ. भा. अण्णा द्रमुकच्या प्रमुख जयललिता यांनी पवारांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता. यासंदर्भात विचारले असता, जयललितांनी केवळ आपल्यात पंतप्रधान म्हणून काम करण्याची क्षमता असल्याचे म्हटले होते. त्यांना यापेक्षा काही वेगळे म्हणायचे नव्हते, असे स्पष्टीकरण पवारांनी दिले. त्याचबरोबर निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेची चावी डाव्यांकडेच असल्याने युपीएला त्यांचीच मदत घ्यावी लागले, असेही त्यांनी सांगितले.

युपीए व त्यांच्या घटक पक्षांचा डाव्या पक्षांशी चांगला सहयोग होता. म्हणूनच आम्ही त्यांच्या सहकार्याने बहुमताचा आकडा गाठू शकलो होतो, याची आठवण त्यांनी करून दिली.

निवडणुकीनंतर युपीएला लालू, पासवान व मुलायम यांचा पाठिंबा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.