महाराष्ट्रात केवळ 35 टक्के मतदान
लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यात आज मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर निरुत्साह दिसून आला. वाढत्या तापमानामुळेही अनेकांनी मतदानाला जाणे टाळले. 12 राज्यांमध्ये सर्वात कमी 35 टक्के मतदान महाराष्ट्रात झाले. दुपारी तीन वाजेपर्यंत महाराष्ट्रात 35 टक्के, ओरिसात 40, कर्नाटकात 40, आसाममध्ये 48 टक्के मतदानाची नोंद झाली. लोकसभा निवडणुकीच्या दुसर्या टप्प्यासाठी बारा राज्य व केंद्रशासित प्रदेशातील 140 मतदारसंघात मतदान होत असून 19 कोटी 48 लाखांहून अधिक मतदार 2041 उमेदवारांचे भवितव्य ठरवतील.या टप्प्यात महाराष्ट्रातील 25 ,आंध्रप्रदेशातील 20 , उत्तर प्रदेशातील 17 , मध्य प्रदेशातील 13, बिहारमधील 13, आसाममधील 11, ओरीसातील 11, झारखंडमधील 8,गोव्यातील 2 ,त्रिपुरातील व जम्मू-काश्मीरमधील एका जागेसाठी मतदान होईल. दुसर्या टप्पयात जार्ज फर्नांडिस (मुजफ्फरपूर), राहुल गांधी (अमेठी), सुषमा स्वराज (विदिशा), शरद पवार (माढा), सुप्रिया सुळे (बारामती), रामविलास पासवान, (हाजीपूर) लालू प्रसाद यांचे मेव्हणे साधु यादव ( पश्चिम चंपारण), विनय कटियार (आंबेडकरनगर), गोपीनाथ मुंडे (बीड), सुरेश कलमाडी (पुणे), प्रकाश झा (पश्चिम चंपारण) आदी दिग्गज उमेदवारांचे भवितव्य जनताजनार्धन ठरवणार आहे. दुसर्या टप्प्यात सर्वाधिक उमेदवार बहूजन समाज पक्षाचे आहेत. 122 उमेदवार या पक्षाचे आहेत. कॉंग्रेसचे ११७, भाजपचे 113, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 23, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे १७, राष्ट्रीय जनता दलाचे 15 व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 9 उमेदवार आहेत.