गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 7 मे 2024 (12:59 IST)

मतदानानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित दादांच्या घरी

supriya sule
लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजे आज 7 मे 2024 मंगळवारी बारामती मतदारसंघावरही मतदान होत आहे. ही जागा राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय आहे कारण येथून शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे आणि सून म्हणजे अजित पवार यांची बायको सुनेत्रा पवार निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे येथील संपूर्ण राजकारण गुंतागुंतीचे झाले असून मतदारांचाही चांगलाच गोंधळ झाल्याचे बघायला मिळत आहे.
 
दरम्यान एक मोठी घटना म्हणजे मतदान झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे त्यांचे बंधू अजित पवार यांच्या घरी पोहोचल्या. त्या अजित पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार यांच्या कन्या सुनेत्रा पवार या येथून राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत.
 
सुप्रिया सुळे त्यांच्या काटेवाडी येथील घरी पोहोचल्या. दरम्यान सुप्रिया सुळे अजित दादांच्या घरी काकूंना भेटायला गेल्याचं म्हटलं जात आहे. मतदानानंतर सुप्रिया सुळे यांनी आशादेवी पवार यांची भेट घेतली. सुप्रिया ताई पवारांच्या बंगल्यात अवघ्या 10 मिनिटेच थांबल्या होत्या. बाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की मी आशा काकींना नमस्कार करायला आले होते. काकी आवर्जून मतदानाला आल्या, हे खूप जबाबदारीचं काम असतं आणि आशा काकी या त्यांची जबाबदारी म्हणून मतदानाला आल्याचे मला आनंद वाटला. त्यांनी रुटीनप्रमाणे काकीचा आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचे सांगितले. घरातील वरिष्ठ लोकांचे आशीर्वाद नेहमीच घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
इकडे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यावेळी अजित पवार घरी नव्हते. अशात अजित दादा आणि सुप्रिया सुळे यांची भेट झालेली नाही.
 
बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. सुप्रिया सुळे या 2009, 2014 आणि 2019 मध्ये तीनदा येथून खासदार झाल्या आहेत. शरद पवार यांच्याशी फारकत घेतल्यानंतर अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना या जागेवरून सुप्रिया यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे.