कुडा लेणी
मुरुड-जंजिऱ्यापासून जवळच असणाऱ्या कुडा येथील लेणी आसपासच्या निसर्गसौंदर्यामुळे पर्यटकांना आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यशैलीमुळे प्राचीन इतिहासाच्या अभ्यासकांना आकर्षित करतात. मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईपासून १३० कि.मी. अंतरावर आणि माणगावच्या आग्नेयला २१ कि.मी. अंतरावर असणारे कुडा हे रायगड जिल्ह्यातील एक शांत खेडेगाव आहे. येथे समुद्रकिनाऱ्याजवळ असणाऱ्या एका टेकडीमध्ये २६ कोरीव गुंफांचा समूह आहे आणि येथून अरबी समुद्राचे होणारे नितांतरम्य दर्शन लेण्यांची शोभा अधिकच वाढविते.
इ.स. तिसऱ्या शतकात निर्माण केलेल्या काही निवडक बौद्ध लेण्यांमध्ये कुड्याचा समावेश केला जातो. या लेण्यांची पहिली नोंद १८४८ सालची सापडते. परंतु त्यानंतरदेखील अनेक वर्षे ही लेणी फारशी प्रसिद्ध नव्हती. याचे कारण म्हणजे तेथे जाण्याकरिता राजापुरी येथील खाडी ओलांडून जावे लागते. आता दळणवळणाची साधने उपलब्ध झाली असून मुंबई ते कुडा बस चालू झाल्याने या ठिकाणाला भेट देणे अधिक सोयीचे झाले आहे. ही लेणी मांदाडपासून अगदी जवळ आहेत. मांदाड म्हणजे रोमन लेखकांनी उल्लेखिलेले मॅंडागोरा बंदर होय. या ठिकाणी झालेल्या उत्खननात सुमारे २००० वर्षांपूर्वीची खापरे आणि विटा सापडल्या आहेत. सातवाहन साम्राज्यातील महाभोजांच्या मांदव घराण्याचे हे प्रमुख केंद्र असावे असे मानले जाते. कुडा येथील लेणी दोन टप्प्यात कोरली असून क्रमांक १ ते १५ ही लेणी खालच्या स्तरात तर क्रमांक १६ ते २६ ही लेणी वरच्या स्तरात आहेत. ही सर्व लेणी बौद्धांच्या हीनयान पंथाशी संबंधित आहेत, ज्यामध्ये स्तूपपूजा प्रचलित होती. बुद्धप्रतिमा इ.स. सहाव्या शतकामध्ये स्थापिल्या गेल्या.
कुड्याच्या २६ गुहांपैकी ४ चैत्यगृहे आहेत. यांचे निरीक्षण केले असता क्रमशः होत गेलेला विकास दिसून येतो. येथील भिंतींवर आणि खांबांवर असणारे शिलालेख दात्यांची (दान देणाऱ्यांची) माहिती देतात. येथील क्रमांक १ चा चैत्य पुढील विकास दाखवितो, ज्यामध्ये आपल्याला मंडप, अंतराळ आणि स्तूप असलेले गर्भगृह या भागांनी युक्त मंदिर पहावयास मिळते. स्तूपयुक्त गर्भगृहाला लागून कोरलेले अंतराळ हे येथे आढळणाऱ्या स्थापत्यशैलीतील नवे वैशिष्ट्य आहे. अंतराळामध्ये भिंतींलगत बसण्याकरिता ओटे केलेले दिसून येतात. व्हरांड्याच्या आतील बाजूस कोरलेल्या लेखात सुलसदत आणि उतरदत यांचा मुलगा शिवभूती याने हे दान दिल्याची नोंद सापडते. सदर लेण्याचा दाता शिवभूती आणि त्याची पत्नी नंदा हे दोघेही सदगेरी विजय याचा पुत्र महाभोज मांदव खंदपालित याच्याकडे लेखक म्हणून कामाला होते. विशेष म्हणजे स्वतः दात्यानेच हा लेख कोरला आहे. त्यामुळेच की काय, लेखातील अक्षरे प्रयत्नपूर्वक आकर्षक आणि सुबक वळणाची काढली असावीत. चैत्य क्र. ६ हा येथील सर्वात शेवटी कोरला गेलेला, सर्वात मोठा आणि सर्वात चांगला चैत्य असून तो योग्य प्रकारे, काम अर्धवट न सोडता पूर्णत्वाला नेला आहे. कुडा येथील शिल्पांच्या ठेवणीवरून ती सातवाहनकालीन असावीत असे अनुमान करता येते. ही शिल्पे कार्ले येथील शिल्पांपेक्षा किंचित ओबडधोबड, मात्र कान्हेरीच्या (चैत्य क्र. ३) तुलनेत उजवी आहेत.
चार चैत्यांव्यतिरिक्त कुडा येथे एक मंडप आणि एकवीस विहार आहेत. मध्यभागी चौरसाकृती सभागृह अथवा मोकळी जागा आणि चारही बाजूंना खोल्या अशा प्रकारच्या प्राचीन विहारांपेक्षा कुडा येथील विहार पूर्णपणे भिन्न आहेत. यामागचे कारणही स्पष्ट आहे. पाश्चात्य जगतासोबत असणाऱ्या व्यापारात झालेली घट, त्यामुळे आलेले राजकीय अस्थैर्य आणि अर्थव्यवस्थेत झालेली घसरण या सर्वांचा परिणाम म्हणून अशा प्रकारच्या गुहा कोरण्याकरिता आवश्यक आश्रयदाते उपलब्ध होणे दुरापास्त झाले. यामुळे पुढील बाजूस व्हरांडा असणाऱ्या एक किंवा दोनच खोल्या आणि मागील भिंतीत ध्यानाकरिता एक खोली असणारे छोटे विहार बनविले जाऊ लागले. अशा विहारांमध्ये कोणतीही सजावट नसे. सातवाहन काळातील मिणमिणत्या वैभवाचे जणू मूक साक्षीदार म्हणजे कुडा लेणी आहेत, असे निश्चित म्हणता येते. अरबी समुद्राचे विहंगम दर्शन घडविणाऱ्या कुडा येथील लेण्यांना पर्यटकांनी जरुर भेट द्यावी.
कसे जाल : सर्वात जवळचा विमानतळ मुंबई येथे असून कोकण रेल्वेच्या रोहा स्टेशनपासून २४ कि.मी. अंतरावर कुडा हे गाव आहे. एखादे भाड्याचे प्रवासी वाहन अथवा स्वतःचे वाहन घेऊन कुडा येथील लेण्यांना भेट देणे सर्वात सोयीचे ठरते. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या गाड्या मुरुडपर्यंत दररोज जातात, जे कुड्यापासून सुमारे २४ कि.मी. अंतरावर आहे.
- विलास सागवेकर