मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By

अष्टागर

एक किंवा दोन दिवस जोडून सुटी आलीकी कुठे फिरायला जायचं हा प्रश्न सर्वांनाच भेडसावत असतो. त्यासाठी अष्टागराची सहल हा एक उत्तम पर्याय आहे.
 
अलिबाग किंवा श्रीबाग यांच्याभोवती पसरलेल्या परिसराला अष्टागर म्हणतात. यात अलिबाग, आष्टी, नागाव, चौल, रेवदंडा ही गावे येतात. मुंबईहून अलिबागला जाण्या‍करिता करावयाचा प्रवास गेट वे ऑफ इंडिया येथून मांडव्याला जाणार्‍या कॅटरमरानने सुरू करायचा. गेट वे ते मांडवा हा समुद्रप्रवास एक वेगळाच आनंद देऊन जातो. मांडवा जेट्टीहून बसने अलिबाग, कॅटरमरानच्या अर्थात बोटीच्या भाड्यातच मांडवा- अलिबाग प्रवास समाविष्ट आहे.
 
अलिबागला पोहोचल्यावर आपली अष्टा‍गराची सफर सुरू होते. भर अरबी समुद्रात उभा असलेला कुलाबा किल्ला अष्टागराचा स्वामी आहे. प्रथम कुलाबा किल्ल्याला भेट द्यावी. समुद्राला भरती असेल तर बोटीने जावे. ओहोटी असेल तर घोडागाडीचा पर्याय उपलब्ध आहे. मऊशार काळ्या वाळूतून चुबुक चुबुक चालतही किल्ल्यावर जाता येते. फक्त भरती ओहोटीच्या वेळा सांभाळाव्यात.
 
शिवरायांच्या आणि नंतर आगर्‍यांच्या ताब्यात असलेल्या कुलाबा किल्ल्याला भेट दिल्यावर अलिबाग गावात यावे. अलिबागमध्ये वैद्यकीय चुंबकीय वेधशाळा, उमा महेश्वर मंदिर, बालाजी मंदिर तसेच कान्होजी आंग्रे यांची समाधी आणि वाडा आहे.
 
अलिबाग दर्शन आटोपले की चौलमार्गे, रेवदंड्याकडे निघावे. ‍अलिबागमध्ये खासगी टॅक्सी, सहा आसनी रिक्षा असा उत्तम पर्याय पर्यटकांना उपलब्ध आहे. वाटेतील टूमदार गावे, मंदिर, नारळी पोफळीच्या वाड्या ओलांडून नागाव चौलमार्गे रेवदंड्यात यावे.
 
येथे पोर्तुगीजकालीन किल्ला, इमारती, तटबंदी, तोफगोळे, चैपल, 7 मजली टॉवर अवश्य पाहावा. त्यांनतर गणपती मंदिर पाहून कोर्लई बघावे. त्यांनतर रेवदंडा- चौल-आष्टी मार्गे परत अलिबागला यावे आणि गट वे ऑफ इंडियामार्गे मुंबईला परतावे.
 
दुसरा पर्याय कोर्लईहून नांदगावमार्गे मुरूडला येऊन शिवकालीन पद्मदुर्ग पाहावा नंतर गाडीमार्गे मुंबईला यावे.
 
-म. अ. खाडिलकर