सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By

अलिबागच्या उत्तरेला सागरी दुर्ग

- प्रमोद मांडे
 
अलिबागच्या उत्तरेला पाच - सहा कि.मी. अंतरावर सागरकिनारी थळ हे लहानसे गाव आहे. हा परिसर थळ-वायशेत प्रकल्पामुळे बराच प्रसिद्धीस आलेला आहे. थळच्या सागरात दोन बलदंड सागरी दुर्ग उभे आहेत. खांदेरी आणि उंदेरी अशी त्यांची नावे आहेत. या जल दुर्गांना भेट देण्यासाठी आवर्जून वेळ काढावा लागतो.
 
अलिबाग हे गाव मुंबई - पणजी या महामार्गाला उत्तम प्रकारे जोडलेले असल्यामुळे गाडी मार्गाने पुण्या-मुंबई जाण्यासाठी खाजगी वाहनांचीही सोय होते. 
 
थळ पासून खांदेरी किल्ल्याला जाण्यासाठी होडीची सोय होवू शकते. येथील मच्छीमारी करणार्‍या होडी या साठी मिळतात. त्यांच्याशी अगोदर संपर्क केल्यास आपली गैरसोय टळू शकते. अन्यथा अव्वाच्या सव्वा आर्थिक भार आपल्यावर पडू शकतो.
 
थळच्या किनार्‍यावर पूर्वी थळचा लहानसा किल्ला होता. हा किल्ला खांदेरी व उंदेरी या जल दुर्गावर लक्ष ठेवून असे. आज मात्र या किल्ल्याचे काही अवशेषच शिल्लक राहिले आहेत.
 
खांदेरी उंदेरीची बेटे ही मुंबई आणि मुरुडाच्या जंजिरा यांच्या मध्ये असल्यामुळे अतिशय महत्त्वाची होती. ही बेटे ताब्यात घेऊन त्यावर जलदुर्ग बांधल्यास मुंबईकर इंग्रज आणि जंजिरेकर सिद्यी यांच्यामध्ये चांगलीच पाचर मारता येईल हे हेरून शिवाजीराजांनी खांदेरीचा किल्ला बांधायला घेतला महाराजांच्या या बेताचा सुगावा लागताच इंग्रजांनी खांदेरी बेटावर आमचा हक्क असल्याचे कारण पुढे करून येथे किल्ला बांधण्याला विरोध केला. इंग्रजांना पोर्तृगिजांकडून मुंबई मिळाली होती. त्याच बरोबर खांदेरी आणि उंदेरी म्हणजे हेन्री आणि केनरी ही बेटेही मिळाल्याचा त्यांचा दावा होता. 
 
महाराजांनी खांदेरी बांधण्याची महत्त्वाची जोखीम मराठी आरमाराचा अधिकारी असलेल्या मायनाक भंडारीवर सोपवली. मायनाक यांनी आपल्या कडव्या साथीदारांच्या साहाय्याने ती जबाबदारी स्वीकारली. एकशे पन्नास सहकारी आणि चार तोफांसहीत मायनाक खांदेरी बेटावर दाखल झाले. इ.स. १६७९ च्या जुलै मध्ये ऐन पावसाळ्यात खांदेरीचे बांधकाम सुरू झाले. इंग्रजांनी आपल्या आरमारासहीत येवून त्यांना आडकाठी करण्याचा प्रयत्न केला. मायनाय यांनी इंग्रजांना न जुमानता काम चालू ठेवले. खांदेरीचे बांधकाम करणारे कामकरी इंग्रजांचा हल्ला परतवून लावण्यासाठी प्रसंगी धारकरी होत. इंग्रजांचा विरोध मोडून काढत मायनाक यांनी खांदेरीचा जलदुर्ग उभा करून स्वराज्यातील जलदुर्गांची मजबुती फळी उभी केली. 
 
देरीला जाण्यासाठी होडीतून निघाल्यावर डावीकडे उंदेरीचा जलदुर्ग दिसतो. साधारण तासाभरात आपण खांदेरीला पोहोचतो. खांदेरी बेटावर दोन उंचवटे आहेत. या दोन उंचवट्याच्या बेचक्यांमध्येच धक्का आहे. या धक्क्यावरच आपल्याला उतरावे लागते.
 
खांदेरीच्या या दोन टेकड्या मधली सपाटीची जागा आत घेऊन सभोवताली संपूर्ण तटबंदी बांधण्यात आली आहे. किल्ल्याचा दरवाजा मात्र नष्ट झाला आहे. मधल्या दोन टेकड्यांमुळे गडाचे दोन भागात विभाजन झाले आहे. आपण डावीकडील वाट चालू लागल्यावर आपल्याला एक खडक लागतो. या खडकावर दगड आपटल्यास यातून धातूसारखा नाद करणारा आवाज येतो. येथून जवळच पीराचे ठाणे आहे. याच मार्गाने पुढे गेल्यावर लहान व मोठा मनोरा लागतो. या भागात आग्या वेताहाचे ठाणे आणि पाण्याचे हौद आहेत. खांदेरीच्या तटबंदीवर गाड्यांवर ठेवलेल्या तोफा आहेत. तटबंदीला जागोजाग बुरूज आहेत. तटबंदीचे काम रचीव पद्धतीने केलेले असल्याने दोन चिर्‍याच्या मध्ये दर्जा भरलेला नाही. तसेच तटबंदीच्या बाहेरील अंगाला मोकळे चिरे टाकून दिले आहेत. त्यामुळे सागराच्या लाटांचा जोर कमी होतो. त्यामुळे मुख्य तटबंदीला कसलीही इजा पोहोचत नाही. भिंतीबाहेरच्या मोकळ्या चिर्‍यावर नेहमीच सागराचा मारा चालू असतो त्यामुळे या चिर्‍यावर नेहमीच सागराचा मारा चालू असतो त्यामुळे या चिर्‍यावर कोरल मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. पायाला सागराचे खारेपणी लागताच आग होते. त्यामुळे पोहोचू शकत नाही. हे वेगळे तंत्र येथील बांधकामामध्ये पाहायला मिळते.
 
खांदेरीच्या गडफेरीमधे वेताळ मंदिर, हनुमान मंदिर बुद्ध मंदिर, क्रॉस, पीर अशी अनेक श्रद्धास्थाने पाहायला मिळतात.
 
शिवरायांचे अजोड तंत्र आणि मायनाक भंडारीचे अजोड साहस आपल्याला चकीत करते. मायनाकाला सलाम करूनच आपण परतीच्या वाटेला लागतो.