मुंबईत लस उपलब्ध नसल्याने आज लसीकरण होणार नाही
मुंबईत लस उपलब्ध नसल्याने आज लसीकरण होणार नाही. मुंबई महानगरपालिकेनं अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. लस नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच लसीकरण केंद्र आणि वेळापत्रकाविषयी पुढील सूचना देऊ, असंही सांगण्यात आलं आहे.
मुंबईतही करोना रुग्ण संख्येत कमालीची घट होत आहे. ६९२ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६८० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. बरे झालेल्या रुग्णांची एकूण आकडा ६ लाख ९६ हजार १०५ इतका झाला आहे. बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण हे ९६ टक्के आहे. सध्या मुंबईत ८ हजार ३५१ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण दुप्पटीचा वेग हा ७१६ दिवसांवर पोहोचला आहे. २३ जून ते २९ जूनदरम्यान कोविड रुग्ण वाढीचा दर हा ०.००९ टक्के इतका होता. करोना रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेनं लादलेल्या कठोर निर्बंधामुळे गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे.
देशात मंगळवारी ३६ लाख ५१ हजार ९८३ नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. त्यापैकी २७ लाख ४२ हजार ६३० नागरिकांनी करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ९ लाख ९ हजार ३५३ इतकी आहे. त्यामुळे आता लस घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्या ३३ कोटी २८ लाख ५४ हजार ५२७ वर पोहोचली आहे.