शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By अभिनय कुलकर्णी|

कलावतींची माघार दुर्देवी- तिवारी

कलावती बांदुरकर यांनी यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा मतदारसंघातून ऐन वेळी माघार घेतल्याने आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या विधवांसाठी हाती घेतलेल्या लढ्याची पिछेहाट झाली आहे, अशी खंत कलावतीला निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार्‍या विदर्भ जनआंदोलन समितीने व्यक्त केली आहे. कलावती यांनी माघार घेतल्यामुळे आपल्याला मोठा धक्का बसल्याचे समितीने म्हटले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील सहा हजार विधवांच्या कल्याणासाठी लढण्याचा आणि सामाजिक सेवेत स्वतःला वाहून घेण्याचा निर्धार व्यक्त करून राजकीय रिंगणात उतरलेल्या कलावती यांनी अशा रीतीने माघार घ्यायला नको होती. त्यांच्या माघारीच्या निर्णयाने आपली निराशा झाली आहे, असे समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी म्हणाले. निवडणुकीत विजयी होणे किंवा पराभूत होणे हा आमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा नव्हताच. कलावती यांची निवडणूक रिंगणातील उपस्थिती आवश्यक होती. कारण, आजच्या लोकशाही व्यवस्थेत कुठलाही लढा राजकीय क्षेत्रात सक्रिय राहूनच समर्थपणे देता येतो. आम्हाला कलावती यांच्याकडून हीच अपेक्षा होती, असे तिवारी म्हणाले.

कलावती यांना मदत करणार्‍या सुलभ इंटरनॅशनलने तिच्यावर दबाव का आणावा, राजकारण हे कलावतीसारख्या सामान्य महिलेचे क्षेत्र नाही, असे या संस्थेला का वाटावे, याचे उत्तर आपल्याला आप मिळालेले नाही,असे सांगत कलावती यांच्या जागी रिंगणात उतरलेल्या बेबीताई बैस यांच्याकडून आम्हाला खूपच अपेक्षा आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या विधवांना न्याय मिळवून देण्यासाठी हा लढा आता त्या लढतील, अशी आशा तिवारी यांनी यावेळी व्यक्त केली.