जोडतोड आणि माघारी... कुठे दबाव तर कुठे आवाहन
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आणि अर्जांच्या छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता सर्वच राजकीय पक्षांचे नेते वेगळ्याच कामाला लागले आहेत. हे काम आहे बंडखोरी म्हणून अपक्ष रिंगणात उतरलेल्यांना एकतर विनंती करून किंवा दबाव आणून माघार घेण्यास भाग पाडण्याचे !या कामात पहिली बाजी मारली ती शिवसेनेने. या पक्षाचे नाराज शेखर सावरबांधे यांचे मन वळविण्यात आणि त्यांना उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडण्यासाठी उद्धव ठाकरे यांची शिष्टाई यशस्वी ठरली होती. त्यानंतर भाजप नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांनाही बर्यापैकी यश आल्याचे चित्र आहे. गिरीश व्यास अणि मोहन मते यांची मतपरिवर्तन करण्याचे भाजपने रविवारी प्रयत्न केले असून, व्यास आणि मते यांची माघार घेण्याची शक्यता बळावली आहे. रा. स्व. संघाच्या नेत्यांनीही या बंडखोरीची दखल घेत, बंडखोर स्वयंसेवकांना बोलावून माघार घेण्याच्या सूचना केल्या आहेत. सोबतच कार्यकर्त्यांच्या बैठकाही सुरू झालेल्या आहेत. आगामी काळ हा प्रचाराचा असल्याने प्रचाराची रणनीती कशी असावी, यावरही कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांशी सल्लामसलत करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.