शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By विकास शिरपूरकर|

राणे घेणार देशमुखांसाठी लातूरला सभा!

विधानसभा निवडणुकीच्‍या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून असून मतदानाची तारखि जशी जवळ येत आहे, तसे सर्वच पक्ष जोरात प्रचाराला लागले असून एरवी एकमेकांकडे पाठ करून असलेले विलासराव देशमुख व नारायण राणे आणि अजित पवार व सुरेश कलमाडी या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या चार दिग्गज नेत्यांची आज दिलजमाई झाली आहे.

कधीकाळी देशमुख यांना सतत पाण्यात पाहणार्‍या राणे यांनी लातूर मतदारसंघातून काँग्रेसतर्फे निवडणूक लढवित असलेले विलासराव देशमुखांचे पुत्र अमित देशमुख यांच्या प्रचारार्थ सभा घेण्याची इच्छा व्यक्त केली. विलासराव देशमुखांनीही मोठ्या मनाने राणे यांना होकार दिला.

विशेष म्हणजे राणे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीला देशमुख यांची भेट घेऊन दोघांमधील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला होता. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात महसूल मंत्रालयाचा कार्यभार सांभाळत असलेल्या राणेंचा देशमुखांशी छत्तीसचा आकडा होता. व्हिडिओकॉनला दिलेल्या जमिनीच्या व्यवहारासंदर्भात राणे यांनी देशमुखांवर जाहीररित्या गंभीर आरोप केले होते.

तर दुसरीकडे पुण्याचे पालकमंत्री, तथा राष्‍ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काँग्रेसचे खासदार सुरेश कलमाडी यांच्या येथील निवासस्थानी स्नेहभोजनास उपस्थित राहून अनेकांना सुखद धक्का दिला. एवढेच नव्हे, तर आजपर्यंत एकमेकांचे हाडवैरी असलेल्या पवार व कलमाडी यांनी मतभेद विसरून एकत्र प्रचार करण्याची तयारीही दर्शविली. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खुद्द राकाँचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आदेश असतानाही अजित पवार यांनी कलमाडींच्या प्रचाराकडे पाठ फिरविली होती, एवढे त्या दोघांमधील संबंध विकोपाला गेले होते.