शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By वेबदुनिया|
Last Modified: मुंबई - , सोमवार, 28 सप्टेंबर 2009 (18:12 IST)

युतीचे आर्थिक निकषांवर आरक्षणाचे सुतोवाच

शिवसेना - भाजपा युतीने विजयादशमीच्या मुहूर्तावर विधानसभा निवडणूकीसाठी आपला वचननामा जाहीर केला. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी संयुक्तपणे या वचननाम्याचे प्रकाशन केले. विशेष म्हणजे या वचननाम्यात आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. याशिवाय शेतकर्‍यांसाठी विशेष पॅकेज, राज्यभर स्वस्त व मुबलक वीज पुरविण्याचे आश्वासन, रास्त किंमतीत जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करण्याचे आश्वसनही युतीच्या वचननाम्यातून देण्यात आले आहे.

काँग्रेस आघाडी सरकारचे विविध विभागातील अपयश ठळकपणे उद्धृत करीत, महाराष्ट्राचा संपूर्णपणे कायापालट करण्याचा संकल्प युतीच्या नेत्यांनी यावेळी जाहीर केला. शेतकर्‍यांच्या आत्महत्या, महागाई, वीजटंचाई इ. समस्यांबाबत जनसामान्यांचे मत मागवून हा वचननामा तयार करण्यात आला आहे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. हा जाहीरनामा नसून वचननामा आहे असेही उद्धव यांनी नमूद केले.

राज्याची राजधानी मुंबईसाठी देखील विविध योजनांची खैरात युतीच्या नेत्यांनी केली. बांद्रे - वरळी सागरीपुलाप्रमाणेच वर्सोवा - नरीमन पॉइंट असा सागरी मार्ग तयार करण्याचे महत्वाकांक्षी आश्वासन भाजपा प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी यावेळी दिले. धारावीमधील झोपडपट्टी मालकांना किमान ४०० चौ. फुटांची घरे देण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिले. मुंबईतील झोपडपट्टी, बी.डी.डी. चाळी तसेच अन्य जुन्या चाळींच्या विकासाकरीता विशेष योजना राबविण्यात येतील असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सध्या मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या मेट्रो रेल्वे, मोनोरेल, उड्डाणपुल प्रकल्प सारख्या प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्या रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठी अधिक एफएसआय करून देण्याचे आश्वासनही युतीच्या वचननाम्यात देण्यात आले आहे.

शेतकर्‍यांची थकित कर्जमाफी, सावकारांवर कठोर कारवाई, कृषीउत्पन्नाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी यंत्रणा उभारणी, सेझ साठी शेतजमिनी संपादीत न करणे, शेतकर्‍यांच्या फायासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञाचा वापर इ. अनेक आश्वासनेही युतीच्या वचननाम्यात देण्यात आली आहेत. मुलींना पदवीपर्यंत शिक्षण, येत्या पाच वर्षात संपूर्ण महाराष्ट्र साक्षर करण्यासाठी प्रयत्न, १ लाख रिक्त जागांवर शिक्षकभरती, शालेय शिक्षणात व्यवसायिक विषयांचा अंतर्भाव, खाजगी शाळांच्या फीवाढीवर सरकारी अंकुश, आयटीआय या औद्योगिक शिक्षण संस्थेचे नूतनीकरण इ. वचने देखील युतीच्या नेत्यांनी दिली आहेत.

वचननामा प्रकाशनाच्या वेळी मनसेवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी, मनसेला मते म्हणजे काँग्रेसला मते या मताचा पुनरूच्चार केला. राज्याच्या अधोगतीला काँग्रेस आघाडीचे सरकारच जबाबदार असल्याचे सांगत उद्धव यांनी मतदारांना या सरकारला घरचा रस्ता दाखविण्याचे आवाहन केले. तिकीट नाकारलेले अनेक उमेदवार हे फितूर होणार असल्याचे आधीच माहीत असल्याचा दावा ठाकरे यांनी केला. शेतकर्‍यांना रस्त्यावर आणणार्‍या काँग्रेस आघाडी सरकारवर टीका करताना गोपीनाथ मुंडे यांनी मतदारांना,
युतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.

मुंबईतील चाटे कोचिंग क्लासेस या प्रसिद्ध ट्युशन क्लास चेनचे मालक प्रा. मच्छिंद्र चाटे यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला.