शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By वेबदुनिया|

विदर्भात सरासरी ५० ते ५२ टक्के मतदान

महाराष्ट्राच्या ११ व्या विधानसभेसाठी मंगळवारी विदर्भातील ६२ मतदारसंघात उत्साहात मतदान पार पाडले. काही तुरळक घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. विशेषतः गडचिरोली, गोंदिया या नक्षलग्रस्त जिल्ह्यात मतदानावर बहिष्कार घालण्याच्या नक्षलवाद्यांच्या धमक्यांना भीक न घालता मतदारांनी उत्साहात मतदान केले.

विदर्भात सर्वत्र सरासरी ५० ते ५२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून गोंदिया जिल्ह्यात ५५ से ६० तर गडचिरोली जिल्यात ६० ते ६५ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान आज नक्षलवाद्यांनी आणलेल्या अडथळ्यांमुळे २२ मतदान केंद्रावर मतदान होऊ शकले नसून येत्या दोन दिवसात या मतदारसंघात फेरमतदान होण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यात गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १७ पोलीस शहीद झाल्याची घटना आणि दोन दिवसांनी गडचिरोली-गोंदिया मार्गावर पेरुन ठेवलेले भुसुरूंग या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत काय होणार याकडे सार्‍या देशाचे लक्ष लागले होते. गत दोन दिवसात या परिसरात मतदानावर बहिष्कार टाकण्याची पत्रके नक्षलवाद्यांनी फेकल्याने परिस्थितीचे गांभीर्य अधिकच वाढले होते. या पार्श्वभूमीवर आज या दोन्ही जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आज सकाळपासून जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकीच्या काही घटना घडल्या.

आज सकाळी एटापल्ली तालुक्यातील कसनासूर मतदान केंद्रावरील पोलिसांना दोनदा गोळीबार करावा लागला. याशिवाय चामोर्शी तालु्रयातील विकासपल्ली, धानोरा तालु्रयातील सावरगाव, चवेला आणि खांबतळा तसेच अहेरी तालु्रयातील किश्तापूर येथेही पोलीसांना गोळीबार करावा लागला. गडचिरोली-गोंदिया मार्गावरील कोरची तालु्रयातील म्हसेली येथे नक्षलवाद्यांनी सकाळी १०.३० च्या सुमारास मतदान केंद्रावर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरात गोळीबार केला. ही चकमक सुमारे तीन तास चालली. सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही.

गडचिरोली जिल्ह्यातील तीन मतदार संघातील एकूण २२ मतदान केंद्रांवर विभिन्न कारणांमुळे आज मतदान होऊ शकले नाही. यात काही ठिकाणी नक्षलवाांनी आणलेले अडथळे आणि त्यामुळे कर्मचारी मतदान केंद्रापर्यंत न पोहोचल्यामुळे मतदान घेता आले नाही. यात अहेरी विधानसभा क्षेत्रातील हिंदा, चंद्रा, मांढरा, भूजोक, मन्नेराजाराम (३ मतदान केंद्रे) बामनपल्ली, किएर, पोटमी (२ मतदान केंद्रे), कांदोडी आणि देवदा, आरमोरी विधानसभा क्षेत्रातील सातपुती, जामतारा, मोहगाव, भगवानपुर, दोडकी, मरकीकसा, दवंडी आणि गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील ढेकणी आणि विकासपल्ली या मतदानकेंद्रांचा समावेश आहे. या मतदान केंद्रांवर येत्या २ ते ३ दिवसात मतदान घेतले जाईल अशी माहिती शासकीय सूत्रांनी दिली.

गडचिरोली वगळता विदर्भातील इतर जिल्ह्यात मतदानाची अंदाजे सरासरी खालील प्रमाणे राहिली. नागपूर-५५, वर्धा-६०, चंद्रपूर-६०, भंडारा-६५, गोंदिया-६५, बुलढाणा-६०, अकोला-४२, अमरावती-६०, वाशिम-४२, यवतमाळ-५६ टे.

विदर्भातील ११ जिल्ह्यात तुरळक प्रचार वगळता कोणतीही अप्रिय घटना घडल्याचे वृत्त नाही. शहरी भागात झोपडपट्टया, मध्यमवर्गी वसत्यामध्ये मतदानाचा उत्साह दिसत होता. त्यातुलनेत उधभु्र वस्त्यांमध्ये मतदानाचा जोर कमी राहिला. मतदारांची नावे यादीत न सापडल्यामुळे अनेक मतदारांना एका केंद्रावरून दुसर्‍या केंद्रावर सैरावैरा पळावे लागताना दिसत होते. काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये गडबड असल्यामुळे मतदान थांबवावे लागण्याच्या घटनाही घडल्या.

दक्षिण-पश्चिम, नागपूर मतदार संघातील नरेंद्रनगर परिसरातील हरिभाऊ वानखेडे हायस्कूल मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजता इलेक्ट्रॉनिक मशीन बंद राहिल्यामुळे अनेक नागरिकांना परत जावे लागले. ८.३० वाजता मशीन सुरू झाल्यावरच तिथे मतदान सुरू झाले. मतदानाच्या दरम्यान शाब्दिक वादावादी वगळता कुठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.