मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019 (08:40 IST)

राज्यात ऐकून ६०.४६ टक्के मतदान, शहरात मतदानाची अनास्था, तर दोघांचा मृत्यू

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी शांततेत व सुरळीतपणे मतदान झाले असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे 60.46 टक्के मतदान झाले. तसेच सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अंदाजे 64.25 टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या निवडणुकीत शहरात एकूणच मतदारांनी मतदानासाठी अनास्था दाखवली असून मतदान कामात असतांना दोघांचा मृत्यू झाला आहे.
 
यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, शिरीष मोहोड आदी उपस्थित होते. 
 
राज्यातील विधानसभा मतदानाची आकडेवारी सांगताना श्री. सिंह म्हणाले की, या विधानसभा निवडणुकीत 288 मतदारसंघासाठी मतदारांनी उत्साहाने मतदान केले. मतदार यादीत नावे नसल्याची कोणतीही तक्रार आली नाही.
 
राज्यात सर्वाधिक मतदान करवीर मतदारसंघात 83.20 टक्के झाले. त्याखालोखाल शाहूवाडी 80.19, कागल 80.13 टक्के, शिराळा 76.78 टक्के तर रत्नागिरी 75.59 टक्के मतदान झाले. सर्वात कमी मतदान कुलाबा विधानसभा मतदारसंघात 40.20 टक्के इतके झाले. तर उल्हासनगरमध्ये 41.20 टक्के, कल्याण पश्चिममध्ये 41.93 टक्के, अंबरनाथमध्ये 42.43 टक्के, वर्सोवा 42.66 टक्के आणि पुणे कँटोन्मेंटमध्ये 42.68 टक्के मतदान झाले.
 
जिल्हानिहाय टक्केवारी पुढील प्रमाणे
 
अहमदनगर 64.93 टक्के, अकोला 56.88 टक्के, अमरावती 59.33, औरंगाबाद 65.06, बीड 68.03, भंडारा 66.35, बुलढाणा 64.41, चंद्रपूर 63.42, धुळे 61.90, गडचिरोली 68.59, गोंदिया 64.06, हिंगोली 68.67, जळगाव 58.60, जालना 67.09, कोल्हापूर 73.62, लातूर 61.77, मुंबई शहर 48.63, मुंबई उपनगर 51.17, नागपूर 57.44, नांदेड 65.40, नंदुरबार 65.50, नाशिक 59.44, पालघर 59.32, परभणी 67.41, पुणे 57.74, रायगड 65.90, रत्नागिरी 58.59, सांगली 66.63, सातारा 66.60, सिंधुदुर्ग 64.57, सोलापूर 64.23, ठाणे 47.91, उस्मानाबाद 62.21, वर्धा 62.17, वाशिम 61.33 आणि यवतमाळ जिल्ह्यात 63.09 टक्के मतदान झाले.
 
इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन
 
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी प्रत्यक्ष वापरात 1 लाख 12 हजार 328 बॅलट युनिट (बीयु), प्रत्येकी 96 हजार 661 इतक्या कंट्रोल युनिट (सीयु) आणि व्हीव्हीपॅट मशिन्स होत्या. तर राखीव 24 हजार 625 बीयु, 21 हजार 277 सीयु आणि 28 हजार 992 व्हीव्हीपॅट ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी आज प्रत्यक्ष मतदानाचे दिवशी प्रारुप मतदान घेतले असता त्यात 3 हजार इव्हीएम- व्हीव्हीपॅट मशिन्स (522 बीयु, 949 सीयु आणि 1 हजार 974 व्हीव्हीपॅट) नादुरूस्त झाल्या. तर प्रत्यक्ष मतदानाच्या काळात सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्यात 4 हजार 69 इव्हीएम- व्हीव्हीपॅट यंत्रे ज्यामध्ये 665 बीयु (0.59%), 596 सीयु (0.62%) आणि 3 हजार 437 व्हीव्हीपॅट (3.56%) नादुरुस्त झाल्या.
 
प्रारुप मतदानाच्या वेळी तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी नादुरुस्त झालेली इव्हीएम व्हीव्हीपॅट त्वरीत दुरुस्त करण्यात / बदलण्यात आल्या. त्यामुळे मतदानप्रक्रियेवर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही.
 
इव्हीएम संदर्भात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 152, शिवसेना 89 व इतर 120 अशा एकूण 361 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त तक्रारी संबंधीत जिल्हाधिकारी कार्यालयास कार्यवाहीसाठी त्वरीत पाठविण्यात आलेल्या आहेत.
 
मतदानाची वैशिष्ट्ये :-
 
महाराष्ट्रात झालेल्या मतदानाची वैशिष्ट्ये थोडक्यात पुढीलप्रमाणे आहेत :-
 
⦁ पुणे जिल्ह्यातील 215-कसबापेठ मतदारसंघामध्ये, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पथदर्शी प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) म्हणून प्रथमच ‘बार कोडींग’चा वापर करण्यात आला.
 
⦁ दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी एकूण 5 हजार 435 इतकी मतदान केंद्रे वरच्या मजल्यावरुन तळ मजल्यावर स्थलांतरित करण्यात आली. त्यामुळे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मतदान करण्यामध्ये कोणतीही अडचण निर्माण झाली नाही.
 
⦁ अतिवृष्टी झाल्यामुळे 259-कराड उत्तर मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 31 या केंद्राचे स्थलांतर मतदानाच्या आदल्यादिवशी करण्यात आले.
 
⦁ काल दिनांक 20 ऑक्टोबर रोजी दिवसा व रात्री महाराष्ट्राच्या मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्र या भागात पाऊस झाला. उस्मानाबाद, लातूर, जालना, परभणी आणि सातारा येथे मुसळधार पाऊस झाल्याने काही ठिकाणी पोलिंग पार्टीच्या दळणवळणामध्ये अडचण निर्माण झाली होती. मात्र पोलिंग पार्टी वेळेवर कर्तव्याच्या ठिकाणी दाखल झाल्या आणि मतदान सुरळीतपणे पार पाडण्यात आले.
 
⦁ रायगड व पालघर जिल्ह्यामध्ये रुग्णालयातील रुग्णांसाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.
 
⦁ विशेषत: शहरी भागांमध्ये मतदारांनी तसेच सेलेब्रिटीजनी अतिशय उत्साहामध्ये भाग घेऊन मतदान केले.
 
⦁ शहरी भागांमध्ये, सुट्टयांचे दिवस असूनही, मतदानाचे प्रमाण चांगले राहिले आहे.
 
आदर्श आचारसंहिता (एमसीसी) :-
 
आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांवर संनियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एफएसटी (1567), एसएसटी (1660), व्हीएसटी (1092) इतकी पथके नेमण्यात आली होती. या व्यतिरिक्त दक्ष नागरिकांना आचारसंहिता भंगाची प्रकरणे नोंदविण्यासाठी आयोगाने सी- व्हिजिल हे अँड्रॉईड ॲप उपलब्ध करुन दिले होते.
 
माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (एमसीएमसी) :-
 
राजकीय पक्षांच्या  व उमेदवारांच्या जाहिराती प्रमाणिकरण करण्यासाठी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हास्तरावर उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली  माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (मीडिया सर्टिफिकेशन अँण्ड मॉनिटरिंग कमिटी) स्थापन करण्यात आली आहे.
 
वरील दोन्ही समितीच्या निर्णयाविरुद्ध अपिल करण्याकरिता  मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समिती समोर आजच एक पेड न्यूज संदर्भातील अपील दाखल झाले आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. एकच अपील प्राप्त झाले आहे हे पाहता वरील दोन्ही समित्यांनी त्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडल्या आहेत, असे स्पष्ट होत आहे.
 
सोशल मिडिया मॉनिटरिंग
 
पोलीस विभागाच्या सायबर शाखेअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या समितीमार्फत सोशल मिडियाचे निवडणूक आदर्श आचारसंहितेच्या दृष्टीने मॉनिटरिंग करण्यात आले.
 
जप्तीची प्रकरणे (सीझर्स) :-
 
आतापर्यंत आयकर विभाग, अबकारी विभाग, पोलीस यांनी एकूण रुपये सदुसष्ट कोटी बावन्न लाख (67.52) इतकी रोख रक्कम, रुपये चौप्पन्न कोटी पन्नास लाख (54.50) रकमेचे सोने, रुपये तेवीस कोटी एकवीस लाख (23.21) रकमेचे मद्य व रुपये वीस कोटी पंच्याहत्तर लाख (20.75) मादक पदार्थ, याप्रमाणे एकूण रुपये एकशे पासष्ट कोटी नव्यान्नव लाख (165.99) इतक्या रकमेचा मुद्देमाल जप्त केला आहे. आचार संहितेच्या उलंघनाबाबत 2124 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच याव्यतिरिक्त Prohibition Act, Food & Drugs Act या कायद्याखाली 11506  इतके गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
 
मतदार यादी :-
 
सन 2019 या वर्षी होणारी निवडणूक विचारात घेऊन जानेवारी, 2018 पासून मतदार यादी शुद्ध व अद्ययावत (Pure & Update) करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत.  मतदारांमध्ये जागृती निर्माण करणे आणि त्यांचा सहभाग वाढविणे याकरिता ‘स्वीप’अंतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात आले. त्याचा खुप चांगला परिणाम झाला. व लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 (8,85,65,547) च्या तुलनेत विधानसभा निवडणूक - 2019 मध्ये मतदारांची संख्या 8,98,39,600 इतकी झाली. म्हणजेच मतदारांची संख्या 2,74,053 ने वाढली.
 
दिव्यांग मतदार :-
 
भारत निवडणूक आयोगाने यावेळी दिव्यांग मतदारांसाठी 'सुलभ निवडणूका' (Accessible Elections) हे घोषवाक्य जाहीर केले होते. याअंतर्गत दिव्यांग मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी करण्यासाठी आणि त्यांना मतदान करणे सुलभ व्हावे याकरिता मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले होते. त्याचे चांगले फलित म्हणून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 मध्ये 3,09,233 इतके दिव्यांग मतदार होते परंतू यावेळी सुमारे तीन लाख शहाण्णव हजार सहाशे त्र्याहत्तर (3,96,673) इतक्या दिव्यांग व्यक्तींची मतदार म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. म्हणजेच सुमारे 90 हजार नवीन दिव्यांग  मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.
 
मतदान केंद्र :
 
यावेळी एकूण शहाण्णव हजार सहाशे ऐकसष्ठ (96,661) इतक्या मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. सन 2014 च्या तुलनेत यावेळी मतदान केंद्रांच्या संख्येमध्ये एकूण आठ हजार एकशे एकसष्ठ (8,161) इतकी वाढ झाली आहे. तसेच आताच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदान केंद्रांमध्ये सखी मतदान केंद्र-352, आदर्श मतदान केंद्र-288 दिव्यांग मतदान केंद्र-106 व वेब कास्टिंग-10013 याही मतदान केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे.
 
निवडणूक कर्मचारी :-
 
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याकरिता सुमारे सात लाख पन्नास हजार (7,49,374) इतक्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे एक लाख चार हजार (1,04,000) इतक्या पोलीसांची नियुक्ती करण्यात आली होती. याप्रमाणे सुमारे साडे आठ लाख (8,50,000) इतके कर्मचारी या  निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आले होते.
 
गडचिरोली जिल्ह्यामध्ये 69-अहेरी या मतदार संघासाठी नियुक्त करण्यात आलेले एक पोलीस अधिकारी श्री. बापू पांडू गावडे (वय 45 वर्षे ) यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना हेलिकॉप्टरने चंद्रपूर येथील शासकीय इस्पितळात दाखल करण्यात आले होते. पंरतु उपचारादरम्यान दुपारी 1-30 वाजता मृत्यू झाला. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मतदारसंघात निवडणूक कर्तव्यावर असलेले शिक्षक श्री. सर्जेराव भोसले यांचा ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.
 
तसेच ठाणे येथील नुतन शाळा, रामबाग या ठिकाणी बंदोबस्तावर नेमण्यात आलेल्या श्री. जयराम तरे (बक्कल नंबर 5352) वय 48 वर्षे यांना ह्रदयविकाराच्या झटका आल्यामुळे त्यांना वेळीच इस्पितळामध्ये दाखल करण्यत आले. आता त्यांच्या जीवावरील धोका टळलेला आहे.