सचिन अहिर शिवसेना प्रवेश, अजित पवार जयंत पाटील यांचे मत हे मत केले व्यक्त
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे मुंबईमध्ये राष्ट्रवादीला हा मोठा धक्का बसला असून मुंबईचे राजकारण तापले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाविषयी भाष्य केले आहे. अजित पवार म्हणतात की काही लोकांना आमदार न झाल्यास राजकारणच करता येत नाही, त्यामुळे ते असा निर्णय घेतात, असं अजित पवार यांनी याविषयी बोलताना म्हटले. त्याचबरोबर त्यांनी अहिर यांना टोला देखील लगावला. याचबरोबर राजकारणात हे काही नवीन नाही, अशा गोष्टी घडतच असतात असे देखील त्यांनी बोलताना म्हटले. त्याचबरोबर आपल्याला या प्रकरणाची जास्त माहिती नसून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जास्त सांगू शकतील, असे देखील ते म्हणाले.
सचिन अहिर जाण्याने पक्षावर कोणताही परिणाम झालेला नाही – आ.जयंत पाटील
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सचिन अहिर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मात्र त्यांच्या जाण्याने पक्षावर कोणताही परिणाम झालेला नाही, अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी दिली. अहिर हे पक्षात त्यांच्या तरूणपणापासून कार्यरत होते. अल्पकाळातच ते विधानसभा त्यापुढे मंत्री व विविध जबाबदाऱ्या पवारसाहेबांनी त्यांना दिल्या. त्यांच्या मतदारसंघात अनेक अडचणी असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला असावा, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले. अहिर यांच्या जाण्याने पक्षात दुख असले तरी संकटात व लढाईच्या वेळी जो बरोबर राहतो त्याचाच कस लागतो, अशा शब्दात पाटील यांनी चिमटा देखील काढला. याप्रसंगी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांकडून सर्व मार्गांचा अवलंब होत असल्याचे दिसत आहे. राज्यातील सरकारदेखील वेगवेगळ्या आमदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबईतील सर्व पदाधिकारी बळी पडले नाहीत, अशी ग्वाही पदाधिकाऱ्यांनी दिली असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.