शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019 (16:05 IST)

भाजपात होत असलेल्या इतर पक्षातील नेत्यांच्या प्रवेशावर शिवसेनेची जोरदार टीका

भाजपमध्ये सध्या जोरदार प्रवेश सुरु आहे. अनेक नेते आमदार, नगरसेवक हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. नुकतेच अनेक नेत्यानी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावर भाजपचा मित्र पक्ष आणि राज्यातील सर्वात मोठा असलेल्या शिवसेनेने पुन्हा भाजपवर टीका केली आहे. दैनिक सामना मधून भाजवर उपरोधकरित्या टीका करण्यात आली आहे. शिवसेनेच्या सामना या मुखपत्राच्या अग्रलेखात 'धर्मशाळेतून पक्क्या घरात' असं म्हणत भाजपाच्या मेगाभरतीला चिमटे काढण्यात आलेत.  काय आहे सामनाच्या लेखात वाचा काय म्हणत आहे शिवसेना :
 
भारतीय जनता पक्ष म्हणजे काही धर्मशाळा नाही, असे बाणेदार वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. भाजपमध्ये सध्या जी मेगा भरती सुरू आहे, त्या भरतीसंदर्भात जे प्रश्न उठत आहेत, त्यावर मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला हे बरे झाले. मुख्यमंत्र्यांनी अत्यंत स्पष्टपणे जाहीर केले आहे की, भाजप म्हणजे काही धर्मशाळा नाही, जिथे कुणीही उठावे आणि यावे. हा जनतेचा पक्ष आहे. जे चांगले काम करतात त्यांचे स्वागत आहे. येणाऱयांचे कार्य, कर्तृत्व आणि स्थान पाहूनच पक्षात प्रवेश दिला जात आहे, असे मुख्यमंत्री सांगतात तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवायलाच हवा. म्हणजे आता काँग्रेस-राष्ट्रवादीसारख्या पक्षांतून जे लोक घेतले आहेत त्यांचे कार्य, कर्तृत्व आणि चारित्र्य चमकदार असल्याचे प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. धर्मशाळेत पर्यटक, मुसाफीर यांची तात्पुरती व्यवस्था असते. जाता येताना धर्मशाळेच्या ओटय़ावर एखादा मुसाफीर पथारी पसरतो व पुढच्या प्रवासाला निघून जातो. भाजप म्हणजे तात्पुरते ‘बूड’ टेकवून पुढे निघून जाण्याची व्यवस्था नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीसारखे पक्ष मधल्या काळात धर्मशाळाच झाल्या. त्या धर्मशाळेतील बरेच लोक भाजपच्या पक्क्या आणि कायमस्वरूपी घरात आले व मुख्यमंत्र्यांनी त्यांना घराच्या चाव्या देण्याचा कार्यक्रम पार पाडला. राष्ट्रवादीचे
 
तालेवार नेते
 
मधुकर पिचड, त्यांचे आमदार पुत्र वैभव पिचड, सातारचे राजे शिवेंद्रराजे भोसले, नवी मुंबईचे आमदार संदीप नाईक, मुंबईचे आमदार कालिदास कोळंबकर, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ व इतर बरेच लोक भाजपमध्ये आले. हा प्रवेश सोहळा म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या ‘महाजनादेश यात्रे’ची खरी सुरुवात आहे. हे चित्र तसे गमतीचे आहे. भाजपमध्ये प्रवेश करताना म्हणे आमदार कोळंबकरांचे डोळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या आठवणीने पाणावले व त्यांना टी.व्ही. कॅमेऱयासमोरच हुंदके फुटले. कोळंबकर हे शिवसेनेत आमदार व मंत्री होते. ते शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेले व आता भाजपवासी झाले. शिवसेना सोडून मोठा कालखंड लोटला आहे. कोळंबकर विधानसभेची जी जागा लढवत आहेत ती ‘युती’मध्ये शिवसेनेच्या वाटय़ाला आहे. त्यांना शिवसेनाप्रमुखांविषयी इतकाच जिव्हाळा होता तर त्यांनी शिवसेनेची वाट धरायला हवी होती. त्यामुळे त्यांचे अश्रू कुणालाही विचलित करू शकत नाहीत. विरोधी आमदारांची कामे सत्ताधारी होऊ देत नाहीत म्हणून पक्ष बदलायचे या सबबी आता जुन्या झाल्या. अकोल्यात पिचड पिता-पुत्रांनी तोच विचार मांडला. नाईकांचेही तेच आणि चित्रा वाघ यांचे पती लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात अडकल्याने त्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला. वाघ यांच्या पतींवरील
 
भ्रष्टाचार व लाचलुचपतीचे आरोप
 
मागे घेऊ व त्यांना ‘पद्म’ पुरस्काराने सन्मानित करू, अशी घोषणा सरकारने केल्याचे आम्ही तरी वाचलेले किंवा ऐकलेले नाही. पिचड यांनी तर स्पष्ट सांगितले की, ‘देश ज्या बाजूला आहे, महाराष्ट्र ज्या बाजूला आहे, त्या बाजूला गेले पाहिजे हा आमचा मार्ग आहे.’ राधाकृष्ण विखे पाटील यांनीच हा मार्ग दाखवल्याचे गुपितही पिचडांनी फोडले आहे. मुख्यमंत्री म्हणतात की, भाजप म्हणजे धर्मशाळा नाही. भाजप हा एक तत्त्व, नीतिमत्ता, पारदर्शक विचारांचा पक्ष आहे. भाजप संघाला आणि संघटनेला महत्त्व देतो. राजकारणात काही गोष्टी अपरिहार्य ठरतात, पण ‘रंगुनी रंगात साऱया रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱया पाय माझा मोकळा’ असे अनेकदा वागावे लागते. फडणवीस यांनी सर्व गुंते सोडवून स्वतःला मोकळे ठेवले.