पुण्यात एकाच दिवशी बाजूबाजूला ठाकरे बंधूंची सभा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा बुधवार, ९ ऑक्टोबर रोजी पुण्यातील अलका टॉकिज येथे होणार आहे. तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचीही जाहीर सभा त्याच दिवशी पिंपरी येथे होणार आहे. त्यामुळे एकाच दिवशी पुण्यात बाजूबाजूला ठाकरे बंधूंची सभा पडणार आहे. राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेला मैदान उपब्ध होत नसल्याचे चित्र होते. त्यामुळे अलका टॉकिज चौकात सभेला संमती दिली जावी, अशी मागणी पुणे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली होती.
विधानसभा निवडणुकीसाठी मनसेच्या प्रचाराचा नारळ फोडण्याची शुभारंभाची सभा कसबा मतदारसंघात होणार आहे. त्यासाठी मनसेने टिळक रोड व शनिवार पेठ भागातील रमणबाग शाळेकडे परवानगी मागितली होती. मात्र ही परवानगी देण्यात आली नाही. सरस्वती विद्या मंदिर मैदानासाठीचा अर्ज करण्यात आला होता, मात्र ते मैदान उपलब्ध होत नाही. पावसाळ्यामुळे डेक्कन या ठिकाणी नदीपात्रात सभा घेता येणार नाही, असेही मनसेच्या पदाधिकार्यांना कळवण्यात आले होते.