1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. महाशिवरात्री
Written By
Last Modified: गुरूवार, 11 मार्च 2021 (11:45 IST)

महाशिवरात्रीला काय करावे, शिवपूजेची वैशिष्ट्ये, जप करण्याचे महत्त्व

Mahashivratri
llॐनमः शिवायll
माघ कृष्ण त्रयोदशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी उपवासाचे व्रत करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसर्‍या दिवशी व्रताची सांगता केली जाते. महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नैमित्तिक कथा आहे.
 
’महाशिवरात्री’ म्हणजे काय ?
पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असे म्हणतात. 
 
महाशिवरात्रीचे व्रत का करावे ? 
शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधि-अवस्थेत जातो. शिवाची समाधि-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्त्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे कात करावे.
 
व्रत आचरण्याची पद्धत व विधी 
उपवास, पूजा व जागरण ही या काताची तीन अंगे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त रहावे. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, असे विधान आहे. त्यांना `यामपूजा’ असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्त्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहातात. तांदुळाच्या पिठाचे १२ दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. पारण्याला जंगमभोजन घालावे. जंगमांच आशीर्वाद घेऊन काथासमाप्ती करावी.
 
शिवपूजेची वैशिष्ट्ये 
१ शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात.
२. शिवाच्या पूजेत हळद-कुंकू वापरत नाहीत; मात्र भस्म वापरतात. 
३. शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात.
४. शिवाक्षाला तांदुळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहातात. 
५. शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात.
 
महाशिवरात्रीला शिवाचानामजप करण्याचे महत्त्व 
महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरता शिवतत्त्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा `ॐ नम: शिवाय’ हा नामजप जास्तीतजास्त करावा.
 
सप्तकोटीशु मंत्रेशु शिवपंचाक्षर मंत्र श्रेष्ठ
॥ॐ नमःशिवाय॥
रात्रीच्या या चार पूजा विशेष आहेत
रात्रीच्या चारी प्रहराचा पूजेत पहिल्या प्रहरात जलाचा व दुधाचा अभिषेक,
 दुसरया प्रहरात दहीचा अभिषेक व तिसरया प्रहरात तुपाचा अभिषेक, आणि चौथ्या प्रहरात मधाचा अभिषेक करावा.