गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By
Last Modified: मंगळवार, 15 जानेवारी 2019 (16:02 IST)

देव तिळी आला

पृथ्वीवर राहणार प्रत्येक प्राण्याला, जीवाला गरज आहे ती, फक्त आणि फक्त प्रेमाची, प्रेमाने जग जिंकता येतं म्हणतात ना, खरंच आहे. परवा मी एकाच्या घरी गेलो असता मला तिथं एक सुंदर चित्र पाहायला मिळालं. त्यात एका जंगलात, एका ऋषींसमोर, त्यांच्या आजूबाजूला अनेक प्राणी होते. ते आपल्या शेजारी फिरतायेत, याची जाणीवही त्या ऋषींच्या चेहर्‍यावर चित्रकाराने दाखवली नव्हती. वाघ, सिंह, कुत्रा मोर, हत्ती, साप असे वन्य प्राणी तेथे विहार करत होते. असं कसं श्रम आहे? असंच मला वाटलं. असं होऊ शकतं? किंवा त्या चित्रकाराची ती प्रतिभाशक्ती असावी. मी त्या घरातील एका वृद्ध माणसाला विचारलं, काका असं हे चित्र का? त्यावर ते काका म्हणाले, अहो हिच तर आपली संस्कृती आहे. हे चित्र पुरातन आहे, ऋषी शांडिल्ययांची महती सांगणारा हा समूह आहे. ते सर्व प्राण्यांना आपल्या संगतीत वाढवायचे. माणसांनी कसं वागायचं हे दर्शविणारा चित्रपट लक्षणीय आहे.
 
आपण 'सण' साजरे करणामागे हाच तर अर्थ आहे. सर्वांना प्रेमाने राहाता यावे, प्रेमाने बोलता यावे. संत म्हणतात, 'दसरा दिवाळी तोचि माझा सण। सखे हरिजन भेटतील॥' असाच सण म्हणजे 'मकर संक्रांत'. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. तो पर्वकाळ म्हणजे 'संक्रमण' म्हणजेच 'मकर संक्रांत' हा सण. एका वर्षात सूर्य या राशीतून जातो म्हणजे सूर्याची बारा संक्रमणे होतात. मकर आणि कर्क ही संक्रमणे महत्त्वाची मानली गेली आहेत, कारण पौषातले 'मकर' संक्रमण हे  'उत्तराणायचा' व आषाढातले 'कर्क' संक्रमण दक्षिणायणाचा' आरंभ करतात. जगात प्रेम वाढवणे याअर्थी संक्रमण होय. भारतीय सर्वच सण स्नेहाचा, प्रेमाचा एक आविष्कारच ठरतात. आता तुकाराम महाराज या सणाचे वर्णन करतात, ते पाहा.
'देव तिळी आला। गोडे गोड जीव झाला॥1॥ 
साधला हा पर्वकाळ। गेला अंतरीचा मळ॥2॥
पापपुण्य गेले। एका स्नानेचि खुंटले॥3॥ 
तुका म्हणे वाणी। शुद्ध जनार्दन जनी॥4॥'
 
तीळ हे स्नेहाचे, प्रेमाचे, भक्तीचे प्रतीक मानले आहे, तो स्निग्ध आहे. 'देव तिळी आला, म्हणजे देव आच बोलण्यात, सहवासात, प्रेमात आला. आमच्या भक्तीच्या आधीन झाला! तृप्त झाला! 'जना' मध्येच जनार्दनाची वस्ती आहे. प्रेम  वाटा प्रेम च मिळेल. आणि या प्रेम संवर्धनात दुःखाची नुसती चाहूलही नाही. म्हणूनच आपण म्हणतो 'तीळ-गूळ घ्या   गोड बोला'नुसती तिळाची स्निग्धता नको तर, गुळाची गोडीही हवीं! गूळ गोडवा वाढवतो.' आणि तीळ स्नेह सगळ्यांबरोबरी घ्यावे। जीवन करावे कृतार्थ. असेच शिकविणारा हा संक्रांतीचा सण आहे. 'संक्रांत' हा शब्द काहीजण वाईट या अर्थानेही वापरतात. परंतु त्यांनी हे लक्षात ठेवायला हवे की, वाईटातून चांगले निर्माण करण्याची ताकद या 'संक्रांती'तच आहे. तुमचा विचार तुमचे आयुष्य बदलतो त्यामुळेच संतांनी विचारांना सुविचारांमध्ये नेण्याचे आवाहन केले आहे. हे सणच नसते तर चांगुलपणाची शिकवण देण्याचे कार्य खुंटले असते. सणांकडे पाहाताना प्रेमाने पाहा आणि प्रेमच मिळेल आणि प्रेमच सर्वांना द्या!
 
भारतामध्ये सर्वच ठिकाणी हा सण उत्साहात साजरा करतात. नेपाळमध्ये हा सण दहा दिवसांचा असतो. थायलंड, लाओस, म्यानमार या देशातही हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. प्रेम संवर्धन हीच संस्कृती असणार्‍या आपल्या भारत देशाला, जगात अजून तरी प्रेमानेच पाहिले जाते. प्रेमाने जग जिंकता येतं म्हणतात ना, ते हेच! तीळ-गूळ घ्या आणि गोड गोड बोला.
 
विठ्ठल जोशी