शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जानेवारी 2021 (19:48 IST)

मकर संक्रांती निबंध मराठीत

भारत देशात लागोपाट सणवार लागलेलं आहे. येथील लोकांना सणाचा अत्यंत उत्साह असून प्रत्येक मोसम नवीन परंपरा आणि खाद्य पदार्थांच्या सुवासाने दरवळलेला असतो. म्हणूनच भारत देशाला सणांचा देश असे म्हटले जाते. भारतात विविध प्रकारचे सण उत्साहाने साजरे केले जातात. मुख्य म्हणजे देशातील सर्व सण विविध धर्माचे आणि जातीचे लोक सोबत आनंदाने साजरे करतात. येथील साजरा केल्या जाणार्‍या सणांमुळेच सर्वांमध्ये एकताची भावना दिसून येते. या सर्व सणांमध्ये मकर संक्रांती हा सण हिंदू धर्माचा प्रमुख सण आहे.
 
संक्रांत म्हणजे मार्ग क्रमून जाणे अर्थात जेव्हा सूर्य धनु राशीमधून म्हणजेच त्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत मार्ग क्रमण होत असते आणि तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांति हा सण साजरा केला जातो. त्यामुळे सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरु होते. म्हणूनच याला उत्तरायण देखील म्हणतात. याच बरोबर दिवस हळू – हळू मोठा होतो आणि रात्र छोटी होऊ लागते.
 
भारतात साधरणपणे दरवर्षी १४ जानेवारी किंवा १५ जानेवारी रोजी मकर संक्रांति साजरा केला जातो. जानेवारी महिन्यात येणारा या पहिल्या सणाला दक्षिण भारतात पोंगल या नावाने साजरा करतात तर पंजाब हरयाणा येथे आदल्या दिवशी याच प्रकारे लोहरी साजरी केली जाते. मकर संक्रांति हा सण आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटक मध्ये संक्रांति या नावाने ओळखला जातो. तर आसाम मध्ये बिहुच्या रुपात आनंदाने साजरा केला जातो.
 
या बद्दल वेगवेगळ्या कथा प्रचलित आहे-
फार वर्षांपूर्वी लोकांना त्रास देणारा संकासूर नावाचा एक राक्षस होता. त्याला मारणे अवघड होते. म्हणून देवीने संक्रांतीचे रूप धारण करून संकासूराला ठार मारले आणि सगळ्या लोकांना सुखी केले.
 
पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान सूर्यदेव आपल्या मुलाला शनीला भेटायला त्यांच्या घरी जातात. शनी मकर राशीचे देव आहे म्हणून ह्याला मकरसंक्रांती देखील म्हणतात.
 
महाभारत युद्धाचे महान योद्धा आणि कौरवांच्या सैन्याचे सेनापती गंगापुत्र भीष्म पितामह यांना इच्छा मृत्यूचा आशीर्वाद मिळाला होता. अर्जुनाचे बाण लागल्यावर या दिवसाचे महत्त्व जाणून आपल्या मृत्यूसाठी त्यांनी या दिवसाची निवड केली होती. भीष्मांना माहित होते की सूर्य दक्षिणायन झाल्यावर माणसाला मोक्षाची प्राप्ती होत नाही आणि माणसाला मृत्युलोकात पुन्हा जन्म घ्यावा लागतो. महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा सूर्य उत्तरायण झाले तेव्हा भीष्म पितामहने आपले प्राण सोडले.
 
धार्मिक मान्यतेनुसार संक्रांतीच्या दिवशी आई गंगा स्वर्गातून राजा भागीरथाच्या मागे-मागे मुनी कपिल ह्यांच्या आश्रमातून होत गंगासागर मध्ये पोहोचली. पृथ्वीवर अवतरण झाल्यावर राजा भागीरथ ह्यांनी गंगेच्या पावित्र्य पाण्याने आपल्या पूर्वजांचे तर्पण केले होते. या दिवशी गंगासागर येथे नदीच्या काठी भव्य मेळाव्याचे आयोजन केले जाते.
 
आई यशोदाने अपत्यप्राप्तीसाठी याच दिवशी उपवास केले होते. या दिवशी बायका, तीळ आणि गूळ इतर बायकांना वाटतात. असं म्हणतात की तिळाची उत्पत्ती भगवान विष्णू पासून झाली होती. म्हणून ह्याचा प्रयोग पापाने मुक्त करतो. तिळाचा वापर केल्याने शरीर निरोगी राहतो आणि शरीरात उष्णता राहते.
 
तीन‍ दिवसीय सण
भारतात मकर संक्रांती हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी म्हणून साजरी करतात. तर मकर संक्रातीच्या दुसर्‍या दिवशी करिदिन साजरा करतात.
 
संक्रातीला तीळ मिश्रित पाण्याने स्नान केले जाते. या दिवसापासून दिवस हा तिळा – तिळाने मोठ होत जातो. या दिवशी विवाहित महिला सुगाडांमध्ये बोरे, ओंबी, हरभरे, तीळ भरुन देवाला अर्पित करतात. हळद कुंकुचे आयोजन करुन आवा लुटणे अर्थात सुवासिनी एकमेकांना भेटवस्तू देतात.
 
तिळगूळ आणि दानाचे महत्त्व
मकर संक्रांति या सणाच्या दिवशी तीळ आणि गुळाचे अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी आपल्या जीवनातील कडवटपणा दूर करण्यासाठी एकमेकांना तिळगुळ दिले जातात आणि गोड गोडा बोलावे असे म्हटलं जातं.
 
तिळगुळ घ्या आणि गोड – गोड बोला. याचा अर्थ भूतकाळातील कडू आठवणीना विसरून जीवनात गोडवा भरायचा हा उद्देश्य असतो. आरोग्याच्या दृष्टीने देखील  या सणाला खूप महत्व असते. तिळगुळाचे सेवन केल्याने शरीरात उष्णता निर्माण करण्याचे कार्य करतात. या दिवशी दान देण्याचे खूप महत्तव असल्याचे सांगितले जाते. यामागील दुसर्‍यांना मदत करत राहावी असा उद्देश्य असावा.
 
पतंगबाजी आणि मजा
मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवून लोक आनंद साजरा करतात. या दिवशी पतंग उडवण्याची प्रथा आहे. हे देखील आरोग्यच्या दृष्टीने योग्य ठरतं कारण कवळ्या उन्हात पतंग उडवली जाते.

मकर संक्रांती हा प्रेम, स्नेह आणि नात्यांमध्ये गोडावा टिकून राहावा असा गुणांचा सण आहे.