संक्राचीचा उत्सव हा स्नेहबंधनाचा
संक्रांत हा परस्परातील स्नेह वृद्धिंगत करण्याचा सण. हा स्नेहभाव तिळातिळाने वाढत जावा आणि त्यातील गोडी गुळाप्रमाणे टिकून राहावी हाच तर या सणामागील मुख्य उद्देश. अलीकडे कमालीच्या स्वार्थी आणि आत्मकेंद्री वागण्याकडील कल वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत तर संक्रांतीचे महत्त्व विशेषत्वाने समोर येते. त्यामुळे आपापसातील बंधुभाव, प्रेम वाढवणारा हा सण प्रत्येकाने आनंदाने, उत्साहाने साजरा करायला हवा.नववर्षाचे उत्साहात आणि आनंदात स्वागत करताना काही नवे संकल्प ऊराशी बाळगले जातात. त्यात इतरांविषयी स्नेहभाव वृद्धिंगत करण्याचा विचार अनेकांच्या मनात असतो. तो प्रत्यक्ष आणण्यासाठी संक्रांतीसारखा सुमुहूर्त तो कोणता? नव्या वर्षाच्या सुरुवातीस हा सण येण्यामागेही असाच उद्देश असू असतो. जीवनाच्या वाटचालीत कुटुंबीयांप्रमाणेच स्नेही, मित्र-मैत्रिणी, नातलग, परिचित, हितचिंतक यांची साथ मोलाची ठरते. पुढे नवनव्या ओळखीतून हे विश्व विस्तारत राहते; परंतु आपल्याकडून कधी तरी, कोणी तरी कळत नकळत दुखावले जाण्याचीही शक्यता असते. काही वेळा एखाद्या व्यक्तीबद्दल अकारण गैरसमजही निर्माण होतात. यातील कोणत्याही एका कारणाने परस्परसंबंधात, नात्यात कटूता येते. ती संपवण्याची उत्तम संधी संक्रांतीच्या रूपाने लाभते. हा परस्परातील स्नेह वृद्धिंगत करण्याचा सण. हा स्नेहभाव तिळातिळाने वाढत जावा आणि त्यातील गोडी गुळाप्रमाणे टिकून राहावी हाच तर या सणामागील मुख्य उद्देश. अलीकडे कमालीच्या स्वार्थी आणि आत्मकेंद्री वागण्याकडील कल वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत तर संक्रांतीचे महत्त्व विशेषत्वाने समोर येते. त्यामुळे आपापसातील बंधुभाव, प्रेम वाढवणारा हा सण प्रत्येकाने आनंदाने आणि उत्साहाने साजरा करायला हवा.
या संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने काही बाबी लक्षात घ्यायला हव्यात. मुख्यत्वे स्वरात गोडवा असेल तरच गाणे गोड होते. या न्यायाने स्वभावात गोडवा असेल तर वाणी मधूर आणि लाघवी होते हे लक्षात घ्यायला हवे. भावनेत गोडवा असेल तर शब्दांचे फटकारेही गोड वाटतात. गोडवा स्वयंभू आहे. ते कुठलेही संस्कार न झालेले दैवी वरदान आहे. एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वातच कमालीचा गोडवा असतो. त्याचे अस्तित्वही वातावरणात उत्साह निर्माण करणारे ठरते. गोडवा मधासारखा आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे त्याचे माधुर्य चाखत राहिले तरी फरक पडत नाही. अर्थात, काळानुसार, बदलत्या परिस्थितीनुसार गोडी कमी-जास्त होते. पण त्यातील गोडवा आहे तसाच राहतो. संक्रांतीला तीळगुळाचे विशेष महत्त्व असण्यामागे आणखीही कारणे आहेत. या दिवसात शिशिर-पौषातील कडक थंडीमुळे शरीर रुक्ष झालेले असते. शरीरातील रक्तप्रवाहदेखील गारठय़ाने प्रभावित झालेला असतो. रक्ताभिसरण मंद झालेले असते. अशा वेळी स्निग्ध आणि उष्ण असे तीळ आणि मधूर तसेच उष्ण असा गूळ यांच्या मिश्रणाने तयार केलेला लाडू अमृताप्रमाणे काम करतो. आपल्या संस्कृतीत निसर्गाची आणि सणाची किती कुशलतेने सांगड घातली आहे, हे पाहून नवल वाटल्याशिवाय राहात नाही. ऋतूमानानुसार वेगवेगळे रोग होण्याची शक्यता असते. त्यावर गुणकारी ठरणारी औषधी वनस्पती, फळे वगैरे निसर्ग त्या ऋतूत निर्माण करतो. सणावारांच्या माध्यमातून हे सृष्टीतील नैसर्गिक रोगप्रतिकारक खाद्य आपसूकच माणसाच्या पोटात जाते. त्यादृष्टीने विचार करायचा तर थंडीच्या दिवसात शुष्क झालेल्या शरीरासाठी स्निग्ध तीळ आणि मधुर गुळाशिवाय दुसरे आणखी कोणते योग्य औषध असू शकते, असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. निसर्ग आणि माणसाचे अतूट नातेही या सणाच्या निमित्ताने पहायला मिळते.