शुक्रवार, 24 ऑक्टोबर 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. मंगळ देव
Written By

मंगळ ग्रह मंदिरात पक्षांची मांदियाळी

food and water available to the birds at Mangalgraha Mandir
वर्षभर पक्षांना मिळतात सिझनल फळे, दाना-पाणी
अमळनेर :  खान्देश म्हटलं म्हणजे वर्षभरातून किमान आठ महिने तप्त ऊन …! या उन्हात सकल मानवजातीसह पशुंचीही लाही लाही होते. पक्षी तर अन्नपाण्यावाचून मरणासन्न होतात.या पार्श्वभूमीवर येथील मंगळ ग्रह सेवा संस्थने बाराही महिने पक्षांच्या पाणी आणि खाद्यांची सोय केली आहे. सर्व प्रकारचे धान्य व पक्षांना आवडणारी फळे या ठिकाणी उपलब्ध आहेत. परिणामी उन्हाळ्यात सहजासहजी कोठेही न दिसणारेपक्षी आता मंदिरात रहिवास करू लागले आहेत.
 
मंदीर परिसरात भरपूर झाडे आहेत. झाडांवर मंदिर व्यवस्थापनाने मडकी बांधलेली आहेत. या मडक्यांमध्ये पक्षी अंडी घालतात आणि प्रोजोत्पादन करतात. पक्षांसाठी सर्वत्र सुरक्षितता आहे. त्यामुळे पक्षांना कोणतेही प्रकारची इजा पोहोचत नाही. फळझाडांना पक्षांव्यतिरिक्त कोणीही हात लावत नाही. त्यामुळे पक्षांची अत्यंत सुमधुर किलबिल मंदिरात ऐकावयास मिळते. त्यामुळे मंगळ ग्रह मंदिर पक्षांसाठीही मोठे आकर्षक व विसाव्याचे ठिकाण ठरवू लागले आहे.
 
संगोपनासाठी जनजागृती
पक्षांचे संरक्षण व संवर्धनासाठी मंगळ ग्रह सेवा संस्था केवळ स्वतःच प्रयत्न करीत नाही तर ते यासंदर्भात सोशल मीडिया ,माहिती पुस्तक व डिजिटल माध्यमांद्वारे सतत व्यापक जन जागृती करीत आहे. त्याचा परिणाम म्हणून अनेक पक्षीप्रेमी भाविक तथा पर्यटक मंदिर व्यवस्थापनाला येऊन भेटतात, पक्षाना काय खाद्य द्यावे ? कसे खाऊ घालावे ? त्यांना साठी पाणी कुठे व कसे ठेवावे? पक्षांनी अंडी घालून प्रजोत्पादन करावे म्हणून काय केले पाहिजे?या संदर्भात देखील मंदिर प्रशासनाकडून पक्षी प्रेमींना माहिती दिली जाते.
 
या पक्षांच्या हे वास्तव्य
दयाळ, पांढऱ्या छातीची गानकोकिळा, बुलबुल, सातभाई, कोतवाल, राखी वटवट्या, भारतीय दयाळ, कवडी मैना, वंचक, पांढऱ्या छातीची खंड्या ,सूर्यपक्षी, भांगवाडी मैना, कोकीळा,पोपट याशिवाय असंख्य चिमण्या ,कावळे, खबूतर असे काही पक्षी आहेत. ज्यांची अद्याप ओळख पटलेली नाही, अश्याही अनेक पक्षांच्या जाती या मंदिरात आढळून येतात.