रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. मंगळ देव
Written By
Last Modified: रविवार, 22 जानेवारी 2023 (14:00 IST)

पाच वर्षांत देशासह विदेशातील तब्बल ५९ हजार २०० वाहनांना लागले स्टिकर्स, अमळनेर येथील मंगळग्रह मंदिराची भाविकांकडून होतेय कुतूहलपूर्वक विचारणा

अमळनेर: येथील श्री मंगळग्रह मंदिराची ओळख देशासह संपूर्ण विश्वातील भाविकांना व्हावी, या उद्देशाने मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे मंदिरात दर्शनासह विविध पूजा, अभिषेकांसाठी येणाऱ्या चारचाकी, दुचाकी वाहनांना मंदिराचा लोगो असलेले स्टिकर गेल्या पाच वर्षापासून लावले जात आहे. आजवर देशासह विदेशातील तब्बल ५९ हजार २०० वाहनांना हे स्टिकर लावले गेले आहे. त्यामुळे देशभरासह विदेशातीलही अनेक वाहनांवर दृष्टी टाकल्यास मंगळग्रह मंदिराचा लोगो हमखास दिसून येत असल्याचे चित्र आहे.

मंगळदोष निराकरणासाठी  हजारो भाविक मोठ्या संख्येने मंगळग्रह मंदिरात होमहवन, अभिषेक व दर्शनासाठी येत असतात. महाराष्ट्रासह देशभरातील व अन्य राज्यांतील भाविकांना येथील मंगळग्रह देव व मंदिराची माहिती व्हावी, यासाठी गत पाच वर्षांपूर्वी मंगळग्रह सेवा संस्थेने दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांना मंगळग्रह मंदिराचा लोगो असलेले स्टिकर लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

देशभरासह विदेशातील वाहनचालकांना स्टिकरचे आकर्षण
२०१८ मध्ये मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे येथे येणाऱ्या प्रत्येक वाहनाला मंदिराचा लोगो असलेले स्टिकर लावले जात आहे. यामध्ये  स्टिकरचा आकार, रंग तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांना स्टिकर लावण्यासाठीची जागा निश्चित करून घेण्यात आलेली आहे. त्यामुळे गत पाच वर्षांत मुंबई, नाशिक, पुणे, दिल्लीसह राजस्थान, जयपूर, मध्य प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांसह दर्शन, पूजा विधींसाठी विदेशातून मंदिरात आलेल्या भाविकांनी आपापल्या वाहनांना स्टिकर लावले आहेत.
 
काय आहे स्टिकर्सचे वैशिष्टय?
मंगळग्रह देवतेला लाल रंग प्रिय असल्याने मंदिराचा गाभाराही लाल रंगातच आहे. मंगळग्रह  शिवपुत्र असल्याने मंदिराजवळ चंद्रकोर व सूर्य भगव्या रंगात आहे. मंदिराचे ठिकाण अचूकपणे लक्षात यावे, यासाठी लोगोखाली मंदिराचे नाव व ठिकाण दिलेले आहे. मंदिर परिसरात पार्क केलेल्या प्रत्येक वाहन चालक व मालकाच्या पूर्व परवानगीने मंदिराचे सेवेकरी स्टिकर लावतात. त्यासाठी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत येथील सेवेकरी विनाशुल्क मंदिराचे स्टिकर लावण्याचे सेवाकार्य करतात. लोेेगोसह स्टिकर बनविण्यासाठी मंगळग्रह सेवा संस्थेला दोन महिने लागले. ऊन, वारा, पाऊस या काळातही स्टिकर खराब होऊ नये, यासाठी संपूर्ण दक्षता घेण्यात आली आहे. त्यासाठी दोन वर्षांची कालमर्यादा देण्यात आली आहे.
 
* सारथी ठरतोय मंगळाचा प्रचारक
दर मंगळवारी ७ ते ८ हजार दुचाकी, ३ ते ४ हजार चारचाकी वाहने मंदिर परिसरातील पार्किगमध्ये थांबतात. त्यामुळे अनेक भाविक गाडीला स्टिकर लावून घेत असल्याने संबंधित वाहन कुठेही असले, तरी चालकाला मंगळग्रह मंदिराची माहिती व पत्ता विचारून मंदिरापर्यत पोहोचतात.
 
(कोट)
अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात दर्शन, पूजा, विधींसाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी येथे आलेल्या प्रत्येक वाहनाला मंदिराचा लोगो असलेले स्टिकर लावले जाते. आतापर्यंत हजारो वाहनांना स्टिकर लागले आहेत. भविष्यात लोगोची कुणालाही नक्कल अर्थात कॉपी करता येऊ नये, यासाठी लोगो अधिकृत नोंदणीसाठी संबंधित विभागाकडे पाठविला आहे.

- डिगंबर महाले
अध्यक्ष, 
मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर